फोटोतील या अभिनेत्रीला ओळखलंत का?, रुपेरी पडद्यावर बनणार देशातील पहिली शेफ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 07:08 PM2022-04-19T19:08:00+5:302022-04-19T19:08:37+5:30
Tarla Movie: मोठ्या पडद्यावर भारतातील पहिली होम शेफ तरला दलाल यांची प्रेरणादायी कथा पाहायला मिळणार आहे.
बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी (Huma Qureshi) मोठ्या पडद्यावर भारतातील पहिली होम शेफ तरला दलाल (Tarla Dalal) यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं नाव 'तरला' (Tarla) असून यातील हुमा कुरेशीचा लूक सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. या पोस्टरवरील लूकमध्ये हुमा कुरेशीला ओळखणं कठीण झालं आहे.
दिवंगत शेफ तरला आणि तिच्या जीवनावर हा बायोपिक बनवण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना निर्माती अश्विनी अय्यर तिवारी म्हणाल्या, “तरलाची कथा केवळ एक प्रतिष्ठित शेफ असण्यापेक्षा खूप काही आहे. ही एका काम करणाऱ्या आईची कथा आहे जिने एकट्याने भारतातील शाकाहारी स्वयंपाकाचा चेहरामोहरा बदलून टाकला आणि अशा अनेक घरगुती स्वयंपाकी आणि स्टार्टअप्सना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा केला.
हुमा कुरेशीने सांगितले की, 'तरला दलाल मला माझ्या बालपणीची आठवण करून देते. माझ्या आईने त्यांच्या पुस्तकाची एक प्रत स्वयंपाक घरात ठेवली होती आणि माझ्या शाळेच्या टिफिनसाठी ती अनेकदा त्यांच्या पाककृती वापरून पाहत असे. मी आईला तरला यांचे घरी बनवलेले मँगो आईस्क्रीम बनवायला मदत केली आहे. तो काळही मला प्रकर्षाने आठवतो. या भूमिकेने मला माझ्या बालपणीच्या गोड आठवणींमध्ये परत आणले आहे आणि ही प्रेरणादायी भूमिका साकारण्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी रॉनी, अश्विनी आणि नितेश यांची खूप आभारी आहे.
तरला दलाल एक भारतीय खाद्य लेखक, आचारी, कूकबुक लेखक आहेत आणि कूकिंग शोचे होस्ट देखील त्यांनी केले आहेत. २००७ मध्ये पाककौशल्य श्रेणीत पद्मश्री पुरस्कार मिळविणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या. अशा परिस्थितीत बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच एखाद्या शेफची जीवनकहाणी पडद्यावर आणली जात आहे.