डॉक्टरकीत दडलेला कलाकार

By Admin | Published: September 16, 2015 03:02 AM2015-09-16T03:02:33+5:302015-09-16T10:02:35+5:30

काही कलाकार स्वत:मधील छंद जपत डॉक्टरकीची प्रॅक्टिस करतात, तर काही अपघाताने अभिनय, गाणे, नृत्याच्या क्षेत्रात येतात. याही कलाकारांचं तसंच काहीसं झालं आहे.

Doctor left in the doctor | डॉक्टरकीत दडलेला कलाकार

डॉक्टरकीत दडलेला कलाकार

googlenewsNext

- मृण्मयी मराठे

काही कलाकार स्वत:मधील छंद जपत डॉक्टरकीची प्रॅक्टिस करतात, तर काही अपघाताने अभिनय, गाणे, नृत्याच्या क्षेत्रात येतात. याही कलाकारांचं तसंच काहीसं झालं आहे. करायचं होतं एक... केलं भलतंच आणि करतायत तिसरंच काहीतरी. पण यामुळे अनेक डॉक्टर आपल्या मराठी इंडस्ट्रीला मिळाले आहेत हे मात्र नक्की!

सध्या शाळांमध्ये अशी परिस्थिती आहे की, लहान मुलांपासून ते अगदी कॉलेज गोर्इंग स्टुडंट्सपर्यंत सर्वच जण एखाद्या रेसमध्ये घोडा धावतो त्याप्रमाणे पहिला नंबर मिळवण्यासाठी धावत असतात. मात्र करिअर करण्याची क्षेत्रे ठरलेली... ती म्हणजे एक तर डॉक्टर नाहीतर इंजिनीअर. मुलांसह पालकही ही दोन क्षेत्रे म्हणजे आयुष्यातील सर्वांत उच्च पदावर पोहोचल्यासारखे या क्षेत्रांकडे पाहतात. अनेक जण या पदव्या मिळवतातही, पण खरी इच्छा म्हणा किंवा त्यांचे नशीब म्हणा... त्यांना वेगळीकडेच कुठेतरी घेऊन जाते; आणि त्यांच्या आयुष्याची भरभराट होते! या सगळ्या वर्णनानंतर
‘३ इडियट्स’मधील आर. महादेवनने साकारलेल्या फरहान कुरेशीची भूमिका डोळ्यांसमोर नाही आली तरच नवल. जो वडिलांच्या आग्रहाखातर इंजिनीअरिंगला जातो खरा, मात्र प्रगती करतो ती फोटोग्राफीमध्ये. आता म्हणाल... असं फक्त चित्रपटातच घडू शकतं... खऱ्या आयुष्यात मुश्कीलच. पण अशी अनेक उदाहरणं आज आपल्यासमोर आहेत... म्हणजे अगदी आपल्या कुटुंबातील एक भाग आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणारं नाही. हो... कारण या मंडळींना आपण अगदी रोज टेलिव्हिजन किंवा कार्यक्रमांतून भेटत असतो. आता हेच पाहा ना... गोमू संगतीनं म्हणणारे डॉ. काशिनाथ घाणेकर; चोरनी, किशन कन्हैया, मवाली अशा अनेक हिंदी तर सिंहासन, पिंजरा, सामना अशा एकसो एक दर्जेदार मराठी चित्रपटांत दिसलेले डॉ. श्रीराम लागू, सामना चित्रपटाचे तर घाशीराम कोतवाल नाटकाचे दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, अलीकडेच पूर्णविराम घेतलेल्या ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतील नाना म्हणजेच डॉ. गिरीश ओक, ‘आयुष्यावर बोलू काही’चे हजारोंवर कार्यक्रम करीत दमलेल्या बाबाची कहाणी सांगणारे डॉ. सलील कुलकर्णी, सध्या ‘मंडळ भारी आहे’ असं म्हणत महाराष्ट्रभरातील कार्यकर्त्यांमध्ये चुरशीची स्पर्धा घडवून आणणारा डॉ. अमोल कोल्हे आणि ‘‘रोज हसत राहा’’ असं म्हणणारा आयुर्वेदिक डॉक्टर नीलेश साबळे...
हे सगळे मुळात डॉक्टर असले तरी सध्या अभिनय, अँकरिंग, गायक, संगीतकार म्हणून कार्यरत आहेत; आणि अशी अनेक नावे सांगता येतील.

मी संगीत क्षेत्राकडे कधीही प्रोफेशन म्हणून पाहिलं नाही. पण डॉक्टर झाल्यावर मला प्रॅक्टिस आणि गाणं एकत्र करायला जमत नव्हतं. त्यामुळे तेव्हा असा विचार केला की, मी संगीताशिवाय राहू शकत नाही आणि दोन्ही प्रोफेशन एका जन्मात पूर्ण करू शकत नाही; आणि माझ्या मते आपण जे शिकतो ते सारखा वापर करायलाच लागतो असं वाटत नाही. त्यामुळे मला ज्या गोष्टीचं वेड आहे आणि मी जास्त काय एन्जॉय करतो तर संगीत... म्हणून हे क्षेत्र निवडलं. परिस्थितीपेक्षाही पुराचं पाणी जसं वाहून नेतं तसं आपण आपल्या आवडत्या क्षेत्राकडे वाहत जातो. - सलील कुलकर्णी, गायक, संगीतकार

डॉक्टरची एक सीट फुकट घालवली हे खरं
असलं तरी आत्म्याची उन्नती आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास ही आपल्या देशाची शिक्षणाची दोन महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. पण आज ही उद्दिष्टे मागे पडून केवळ जास्तीतजास्त पैसा कसा मिळवता येईल, एवढंच बघितलं जातं आणि त्यातही मेडिकल हे पैसा मिळवण्याचं उत्तम क्षेत्र आहे, असं अनेक जण मानतात. या क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात जाताना रिस्क फॅक्टर निश्चितच असतो; पण माझी त्यामागे दोन कारणं होती. एक म्हणजे मला तो मुद्दा खोडून काढायचा होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे अभिनय हे असं क्षेत्र आहे, जिथे सर्व प्रकारचे रोल साकारता येतात. कारण लहानपणापासूनच मला कधी कंडक्टर, कधी वकील, तर कधी शिक्षक व्हावंसं वाटायचं.
- डॉ. अमोल कोल्हे, अभिनेता

Web Title: Doctor left in the doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.