प्रेक्षकांची अभिरुची हरवतेय?
By Admin | Published: August 10, 2015 02:14 AM2015-08-10T02:14:03+5:302015-08-10T02:14:03+5:30
‘नाटकाने प्रेक्षकांचे केवळ मनोरंजनच केले नाही, तर प्रेक्षकांची अभिरुची वृद्धिंगत करण्यातही मोलाची भूमिका बजावली आहे. अभिनयाचे बाळकडू कलाकाराला मिळते ते रंगभूमीवरच
‘नाटकाने प्रेक्षकांचे केवळ मनोरंजनच केले नाही, तर प्रेक्षकांची अभिरुची वृद्धिंगत करण्यातही मोलाची भूमिका बजावली आहे. अभिनयाचे बाळकडू कलाकाराला मिळते ते रंगभूमीवरच. कलाकार घडविण्याची ती एक शाळा नव्हे, तर तो अभिनयाचा एक संस्कार असल्याच्या जाणिवेतून असंख्य कलाकार आजही व्यस्त आयुष्यात रंगभूमीला प्राधान्य देताना दिसतात... ही नाट्यकला जिवंत राहावी ही जशी कलाकारांची नैतिक जबाबदारी आहे, तसेच कलाकारांना किंवा त्यांच्या अभिजात कलाकृतीला मान देणे हे प्रेक्षकांचेदेखील कर्तव्य आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये याच विश्वासार्हतेला तडा पोहोचविला जात आहे. यामुळे कलाकार आणि रसिक यात काही अंशी अंतर पडू लागले आहे. नाटक सुरू झाल्यानंतर मोठमोठ्याने बोलणे, शेरेबाजी करणे, सांगूनही मोबाइल खणखणत राहणे, फोनवर बोलणे, मोबाइलच्या प्रकाशात एसएमएस किंवा व्हॉटस् अॅप करीत राहणे याचा नाट्यकलाकारांना त्रास तर होतोच, पण दर्दी प्रक्षकांचाही रसभंगही होतो. मात्र याचे साधे सोयरसुतकही त्यांना नसल्याने कलाकारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. एकेकाळी जी नाटके केवळ प्रेक्षकांच्या अभिरुचीवर तग धरून असायची.... त्याच प्रेक्षकांमुळे आज नाट्यसंस्कृतीला छेद बसत आहे, अशा प्रकारची एक मानसिकता कलाकारांमध्ये निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे प्रेक्षकांची अभिरुची हरवत चालली आहे का, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. याबद्दलचे काही अनुभव रंगकर्मींनी ‘सीएनएक्स’शी बोलताना शेअर केले. - नम्रता फडणीस
नाटकांमध्ये अनेकदा असे अनुभव आले आहेत. कित्येकदा जोडपी पहिल्या चार रांगांमध्येच प्रेमाचे चाळे करीत बसतात, त्यामुळे आम्हाला डिस्टर्ब होते. कधीतरी तर हुल्लडबाजी करणारे ठरवून येतात आणि धुडगूस घालतात. तर कधी वेळ जात नाही, म्हणून नाटकाला येऊन बसतात, पण माझ्या मते जे प्रेक्षक खरोखरच कलाकारांवर प्रेम करतात त्यांच्याकडून असे प्रकार कधीच घडत नाहीत. असे घडते तेव्हा चूक कलाकार किंवा नाट्य मंडळाची असते. विनंती वा परिस्थिती सांगितल्यावर जो समजून घेतो तोच खरा प्रेक्षक. - शरद पोंक्षे, अभिनेता
‘माझ्यावर असे प्रसंग केवळ दोनदाच आले आहेत. पण त्यासाठी सर्वच प्रेक्षकांना दोष देता येणार नाही. नाटकांवर प्रेम करणारा प्रेक्षकवर्ग हा वेगळाच असतो. अनेकदा नाटक सुरू झाल्यानंतरही मोबाइल सायलेंटवर ठेवले जात नाहीत. एक काळ असा होता, की प्रेक्षक सलग सहा-सहा तास तल्लिनतेने नाटक पाहायचे. पण आज व्हॉटस् अॅपने त्यांच्या अभिरुचीवर गदा आणली आहे. जिथे कायद्याचा बडगा दाखविला जातो तिथेच लोक नियम पाळतात. इतर वेळेस विनंती करण्याव्यतिरिक्त काहीही करू शकत नाही. - चिन्मय मांडलेकर, अभिनेता
नाटकांमध्ये असे अनुभव अनेक कलाकारांना आले आहेत, त्याबद्दल अनेकदा नाराजीचा सूरही व्यक्त झाला आहे, मात्र तरीही परिस्थिती सुधारलेली नाही आणि सुधारेल असेही वाटत नाही़ मला असे कधी अनुभव आलेले नाहीत. पण जर आले तर त्याच क्षणी मी नाटक बंद करेन. इथे मला प्रेक्षकांची जास्त कीव करावीशी वाटते, कुणी प्रेक्षक मोठ्याने बोलणे, शेरेबाजी करणे असे प्रकार करीत असतील तर त्रास देणाऱ्यांना सुज्ञ प्रेक्षकांनीच धडा शिकविला पाहिजे, असे मला नेहमीच वाटत असते़ - जितेंद्र जोशी, अभिनेता