'वर येऊ नका मी एकटा सांभाळेन…', मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्यावर आधारीत 'मेजर'चा टीझर पाहून अंगावर येईल काटा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 03:51 PM2021-11-03T15:51:48+5:302021-11-03T15:52:14+5:30
शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्यावर आधारीत असलेला चित्रपट 'मेजर' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
कोरोनाच्या संकटामुळे गेल्या बऱ्याच महिन्यांपासून थिएटर बंद होते. मात्र आता थिएटर सुरू झाले असून आता पुन्हा एकदा चित्रपटगृहात चित्रपट पाहण्याची मज्जा प्रेक्षकांना लुटता येणार आहे. आता लवकरच शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्यावर आधारीत असलेला चित्रपट मेजर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता अदिव शेषने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अभिनेता अदिव शेषने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा टीझर शेअर केला आहे. या टीझरची सुरुवात 'वर येऊ नका मी एकटा त्यांना सांभाळेन', या संवादाने होते. हा टीझर शेअर करत त्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे. यावेळी अदिवने जो व्हिडीओ शेअर केला आहे, त्यात आपल्याला बिहाइन्ड द सीन दाखवण्यात आले आहेत. हा चित्रपट २६/ ११ हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या आयुष्यावर आधारीत आहे.
हा टीझर पाहिल्यानंतर अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. मेजर हा चित्रपट ११ फेब्रुवारी २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
'मेजर' हिंदी, तेलुगू आणि मल्याळम या भाषेत होणार प्रदर्शित
मेजर या चित्रपटात अदिवी शेषसोबत प्रकाश राज, सई मांजरेकर, रेवती आणि शोभिता मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशिकिरण टिक्का यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती ही महेश बाबूच्या जीएमबी एंटरटेन्मेंट आणि सोनी पिक्चर्स यांनी केली आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू आणि मल्याळम या भाषेत प्रदर्शित होणार आहे.