मराठी नाटकांच्या तारखा चित्रपटांना देऊ नका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 09:44 IST2025-01-12T09:43:29+5:302025-01-12T09:44:02+5:30
नाट्यगृहांमध्ये मराठी चित्रपट दाखवायला हवा की नाही, हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

मराठी नाटकांच्या तारखा चित्रपटांना देऊ नका!
- प्रशांत दामले, अभिनेते
नाट्यगृहांमध्ये मराठी चित्रपट दाखवायला हवा की नाही, हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. नाटक आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांचे आपापले वेगळे अस्तित्व आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात जसा चित्रपटांचा मोलाचा वाटा आहे, तसाच नाटकांचाही महत्त्वाचा वाटा आहे. मराठी चित्रपटाला पडदे मिळत नसल्याने ते जास्तीत जास्त सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होत नाहीत ही मुख्य समस्या आहे. त्यामुळे नाट्यगृहांमध्ये चित्रपट दाखविण्याचा उपाय चांगला आहे. फक्त मराठी नाटकांना दिलेल्या तारखा काढून त्या मराठी चित्रपटांना देऊ नका. कारण हे दोन्ही वेगवेगळे व्यवसाय आहेत, तर तिमाहीला नाट्यगृहांचे वाटप करण्यात येते. त्यानुसार निर्मितीसंस्थांना आपल्या नाटकाचा प्रयोग करण्यासाठी तारीख मिळते. तारखांचे वाटप झाल्यानंतर उरलेल्या तारखा चित्रपटांना द्यायला हरकत नाही, पण नाटकांना दिलेल्या तारखा त्यांच्यावर दबाव आणून मराठी चित्रपटांना देऊ नका हे माझे म्हणणे आहे.
नाट्यगृहामध्ये चित्रपट दाखविल्याचा व्यावसायिकदृष्ट्या किती फायदा होईल हा नंतरचा मुद्दा आहे. नाट्यगृहात का होईना, पण मराठी चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचविणे हे अंतिम ध्येय आहे. चित्रपट चालतात की नाही किंवा किती व्यवसाय करतात हा नंतरचा भाग आहे. मुळात कोणताही निर्माता आपला चित्रपट चित्रपटगृहात लागावा यासाठी पैशांची गुंतवणूक करतो. पण, त्याला चित्रपटगृहच न मिळणे हे चुकीचे आहे. त्यामुळे जिथे मराठी नाटक नसेल तिथे मराठी चित्रपट दाखवायला हरकत नाही, पण उद्या नाट्यगृहांमध्ये ५० टक्के नाटकाला आणि ५० टक्के चित्रपटांना आरक्षण द्यायचे म्हणाल तर तसे होणार नाही. कारण नाट्यगृहात चित्रपट दाखविता येऊ शकतात, पण आम्ही चित्रपटगृहात जाऊन नाटक करू शकत नाही. नाटकासाठी आवश्यक असणाऱ्या गरजा केवळ नाट्यगृहच पूर्ण करू शकतात. त्यामुळे नाट्यगृहाचे प्राधान्य मराठी नाटकालाच राहायला हवे. नाटकांच्या बिझी शेड्यूलमधून एखादा प्रयोग मोकळा असेल, तर चित्रपट लावायला काहीच प्रॅाब्लेम नाही.
मुंबईमध्ये फार नाट्यगृहे उपलब्ध नाहीत. साहित्य संघ मंदिरमध्ये सिनेमे दाखवता येऊ शकतात. तिथे प्रेक्षक जातील की नाही हा पुढचा मुद्दा आहे. मराठी चित्रपटांना चित्रपटगृहे मिळत नाही हे रडगाणे थांबवायचे असेल तर जे नाट्यगृह उपल्बध असेल तिथे चित्रपट लावता आला पाहिजे. चांगला चित्रपट असेल तर प्रेक्षक कुठेही जाऊन बघतील. यशवंत नाट्यसंकुलामध्ये महिन्याला ६० ते ७० प्रयोग होतात. वीकेंड आणि सुट्ट्यांखेरीज इतर दिवशीही प्रयोग होतात, पण इथे सकाळच्या प्रयोगांची वेळ मोकळी असते. त्यावेळी चित्रपट लावता येऊ शकतात. प्रथमत: कोणत्याही निर्मात्याला आपला चित्रपट नाट्यगृहात का होईना, पण लागल्याचा आनंद मिळणे गरजेचे आहे. यश मिळणे न मिळणे हे चित्रपटावर अवलंबून असते, पण हे सर्व मराठी नाटकाच्या पोटावर पाय आणून करणे मुळीच अपेक्षित नाही.