Drishyam : ‘दृश्यम’मधील गायतोंडेला लोक करायचे शिवीगाळ..., कमलेश सावंतने सांगितला ‘त्या’ रात्रीचा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 10:32 AM2022-12-08T10:32:51+5:302022-12-08T10:33:36+5:30
Drishyam, Kamlesh Sawant : दृश्यम’ आणि ‘दृश्यम 2’ या चित्रपटातील सगळ्या कलाकारांनी दमदार अभिनय केला. सगळ्यांच्याच वाट्याला प्रचंड कौतुक आलं. अपवाद फक्त गायतोंडेचा.
अजय देवगणच्या ‘दृश्यम’चा (Drishyam) पहिला पार्ट 2015 मध्ये रिलीज झाला होता. हा सिनेमा, या सिनेमाची कथा आणि सिनेमाची स्टारकास्ट सगळंच लोकांना भावलं होतं. नुकताच या सिनेमाचा दुसरा पार्ट अर्थात ‘दृश्यम 2’ रिलीज झाला. या दुसऱ्या पार्टलाही लोकांनी डोक्यावर घेतलं. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत या सिनेमानं 190 कोटींची कमाई केली.
‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम 2’ या चित्रपटातील सगळ्या कलाकारांनी दमदार अभिनय केला. सगळ्यांच्याच वाट्याला प्रचंड कौतुक आलं. अपवाद फक्त गायतोंडेचा. होय, पोलिस अधिकारी गायतोंडेची भूमिका साकारणारा मराठमोळा अभिनेता कमलेश सावंत (Kamlesh Sawant ) याच्या वाट्याला मात्र कौतुकापेक्षा अधिक तिरस्कार आला.
एका मुलाखतीत कमलेश सावंत याबद्दल बोलला.‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने ‘दृश्यम’मधील गायतोंडे साकारल्यानंतरचा अनुभव सांगितला. तो म्हणाला, ‘दृश्यममध्ये मी साळगावकर कुटुंबाला मारहाण केली होती. माझ्या भूमिकेमुळे प्रेक्षक प्रचंड संतापले होते. अनेकांनी मला निर्दयी ठरवलं होतं. काही लोकांनी दृश्यममध्ये मी रंगवलेला गायतोंडे पाहून माझं मनापासून कौतुक केलं. पण त्यापेक्षा अधिक माझ्या वाट्याला लोकांचा तिरस्कार आला. मला आठवते, झी टॉकीजने मध्यंतरी यासंदर्भात एक पोस्ट केली होती. खऱ्या आयुष्यात जर तुम्हाला गायतोंडे भेटला तर तुम्ही काय कराल? असा प्रश्न या पोस्टमध्ये विचारण्यात आला होता. यावर पहिली कमेंट होती, नाईस परफॉर्मन्स. दुसरी कमेंट होती, बाहेर भेटला तर त्याला कुत्र्यासारखा मारेल. अन्य एक कमेंट तर भयंकर होती. मी तुझ्या...मध्ये गाय छाप तंबाखू भरेल. पुढच्या कमेंट्स मी वाचूच शकलो नाही. एकदा रात्री मला एक अनोळखी कॉल आला. मी सहसा अनोळखी कॉल्स घेत नाही. पण त्या रात्री घेतला. गायतोंडेची भूमिका तूच साकालीस का? असं त्या कॉलवरच्या माणसाने पलीकडून मला विचारलं. मी ‘हो’ म्हटलं आणि त्याने मला आई बहिणीवरून शिवीगाळ सुरू केली. अखेर मी त्याला ब्लॉक केलं. त्यानंतर मला असे अनेक कॉल्स आले. अर्थात हीच खरी माझ्या कामाची पोचपावती आहे,’ असं मी मानतो.
‘दृश्यम 2’मध्ये मी असेल याची खात्री नव्हती...
‘दृश्यम 2’मध्ये मी असेल याची मला खात्री नव्हती. ओरिजनल मल्याळम पार्ट 2 मी बघितला नव्हता. पण माझ्या मित्राने पाहिला होता. पार्ट 2मध्ये तुझं पात्र नाही, असं त्याने मला सांगितलं होतं. त्यामुळे हिंदी ‘दृश्यम 2’मध्ये मी नसणार, असं मला वाटलं होतं. त्यामुळे को-प्रोड्यूसर संजीव जोशींनी मला ऑफिसात बोलावलं, तेव्हा मला काही कळायला मार्ग नव्हता. मला इथे का बोलावलं, असा प्रश्न मी जाताच त्यांना केला. यावर संजीव हसले. क्या बात कर रहे हैं कमलेश जी. दृश्यम पार्ट 1 के आर्टिस्ट मुझे फोन करके पूछ रहे है की वो सीक्वल में है कि नहीं और आप पूछ रहे हैं कि आपको क्यों बुलाया है, असं ते मला म्हणाले.
‘दृश्यम 2’ चांगलाच गाजला आहे. याच भागात ‘दृश्यम 3’चेही संकेत देण्यात आले आहेत.