विनोदाला रहस्याची रंजक डूब !
By Admin | Published: January 10, 2016 03:05 AM2016-01-10T03:05:53+5:302016-01-10T03:05:53+5:30
दिगंबर नाईक हा इरसाल नट नाटकातल्या भूमिकेत वावरताना अख्खा रंगमंच आपल्या कवेत घेतो आणि जर त्याच्यातल्या कलेला प्रचंड वाव मिळणारी संहिता त्याच्या हातात आली, तर तो रंगभूमीवर
- राज चिंचणकर
नाटक : कट टू कट
दिगंबर नाईक हा इरसाल नट नाटकातल्या भूमिकेत वावरताना अख्खा रंगमंच आपल्या कवेत घेतो आणि जर त्याच्यातल्या कलेला प्रचंड वाव मिळणारी संहिता त्याच्या हातात आली, तर तो रंगभूमीवर अक्षरश: ‘सुटतो’. त्याचा हा मुक्त वावर केवळ त्यालाच नव्हे, तर त्या नाटकालाही आगळे परिमाण मिळवून देतो. ‘कट टू कट’ या नाटकात त्याने त्याच्या सहकलावंतांना सोबतीला घेत, हाच कित्ता गिरवला आहे. परिणामी, विनोदाला रहस्याची डूब देणारे हे नाटक रंजक झाले नसते, तरच नवल होते.
लेखक प्रवीण शांताराम यांची ही संहिता हलक्याफुलक्या विनोदाच्या अंगाने तर जाणारी आहेच, परंतु त्याचबरोबर त्यांनी तिला एका रहस्याचा तडकाही दिला आहे. धमाल करत या नाटकाचा टेम्पो जसजसा वर चढत जातो, तसतशी नाटकातली रंगतही वाढत जाते. मोहन, त्याची बायको आशा आणि त्याचे वडील अण्णा यांचे हे कुटुंब आहे. अण्णा हे ज्येष्ठ समाजसेवक आहेत, तर मोहन कुठे तरी नोकरी करतोय. सर्व काही सुरळीत सुरू असताना नाटकाला कलाटणी मिळते, ती यात एकामागोमाग एन्ट्री घेणाऱ्या आणि तंतोतंत मोहनसारख्याच दिसणाऱ्या काही व्यक्तिरेखांची! ही आगंतुक पात्रे या कुटुंबात येत राहतात आणि सतत सस्पेन्स निर्माण करत उत्कंठा ताणून धरतात. अण्णांच्या जीवावर कुणीतरी टपलेले असणे, हा यातला सस्पेन्स आहे आणि त्याचा उलगडा हे नाटक करत जाते.
हे नाटक मंचित करताना प्रभाकर मोरे या दिग्दर्शकाच्या हाती एक रंगतदार संहिता तर होतीच, पण दिगंबर नाईक याच्यासारखा नटही त्यांच्या हाती होता. परिणामी, रंगमंचावर धुमाकूळ घातला जाणारच, या अपेक्षेला योग्य प्रमाणात खत घालत दिग्दर्शकाने यातले नाट्य तशाच पद्धतीने रंगमंचावर मांडले आहे. वेगवान पळापळ ही या नाटकाची गरज आहे आणि दिग्दर्शकाने त्यानुसार हे नाटक अक्षरश: पळवले आहे. विचार करायला उसंतही मिळणार नाही, असा वेग या नाटकाने राखला आहे. साहजिकच, कंटाळवाण्या क्षणांपासून नाटक लांब राहिले आहे, पण नाटकातल्या काही प्रसंगांची लांबी कमी करणे आवश्यक होते. पोलीस स्टेशनचा प्रसंग हे याचे उदाहरण ठरू शकेल. हा प्रसंग गमतीदार आहे. मात्र, तो थोडा आवरता घेतला असता, तर त्यातली गंमत अधिक वाढली असती.
मोहन आणि इतर व्यक्तिरेखा साकारत दिगंबर नाईक याने पंचरंगी धमाल उडवली आहे. अचूक टायमिंग राखत केलेली संवादफेक आणि उत्तम देहबोलीच्या साहाय्याने त्याने रंगवलेल्या यातल्या प्रत्येक पात्राची एन्ट्री टाळी घेणारी ठरते. आशाची भूमिका सविता हांडे यांनी ठसक्यात रंगवली आहे. दिगंबर नाईक याच्यासारखा नट समोर असूनही सविताने त्यांच्या व्यक्तिरेखेचे अस्तित्व जोरदार ठसवले आहे. सुरेश चव्हाण यांनी अण्णा चांगले रंगवले आहेत. मयूर पवार याचा सूर्यकांतच्या भूमिकेतला लवचीकपणा वाखाणण्याजोगा आहे. तृषाली चव्हाणने साकारलेली उषा लक्षात राहते. प्रभाकर मोरे, हरेश मयेकर, कमलाकर बागवे या कलावंतांची योग्य साथ नाटकाला आहे. अंकुश कांबळी यांचे नेपथ्य चांगले असले, तरी संहितेच्या दृष्टीने विचार करता, त्यातला भपका कमी हवा होता. संगीत, वेशभूषा आणि रंगभूषा नाटकाला पूरक आहे. शुभानन आर्ट्सने रंगभूमीवर आणलेल्या या नाटकाने विनोद व रहस्याची अचूक पेरणी करत मनोरंजनाची बाजू भक्कम केली आहे.