MIFF 2022: डच डॉक्युमेंट्री ‘turn your body to the sun’ ठरला सर्वोत्कृष्ट माहितीपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 14:09 IST2022-06-06T14:09:07+5:302022-06-06T14:09:53+5:30
MIFF 2022: अलिओना व्हॅन डेर हॉर्स्ट दिग्दर्शित 'टर्न युवर बॉडी टू द सन' या डॉक्युमेंट्रीमध्ये दुसऱ्या महायुद्धात नाझींनी पकडलेल्या तातार वंशाच्या सोव्हिएत सैनिकाची कहाणी दाखवण्यात आली आहे.

MIFF 2022: डच डॉक्युमेंट्री ‘turn your body to the sun’ ठरला सर्वोत्कृष्ट माहितीपट
17 वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (Mumbai International Film Festival) नुकताच पार पडला. वरळीतील नेहरु सेंटर येथे मोठ्या दिमाखात या सोहळ्याची सांगता झाली. या सोहळ्यामध्ये अनेक चित्रपट, लघुपटांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. यामध्येच एका सोव्हिएत युद्धकौद्याची कथा सांगणाऱ्या turn your body या डच डॉक्युमेंट्रीला प्रथम पारितोषिक मिळालं. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या या पारितोषिकांचे राज्यपाल भगतसिंग कोषारी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. या पारितोषिकांचे स्वरूप सुवर्ण शंख, प्रमाणपत्र आणि 10 लाख रुपये रोख असे आहे.
अलिओना व्हॅन डेर हॉर्स्ट दिग्दर्शित 'टर्न युवर बॉडी टू द सन' या डॉक्युमेंट्रीमध्ये दुसऱ्या महायुद्धात नाझींनी पकडलेल्या तातार वंशाच्या सोव्हिएत सैनिकाची कहाणी दाखवण्यात आली आहे. ही डॉक्युमेंट्री पाहत असताना प्रत्येक प्रेक्षक प्रत्येक क्षणाला भारावून जात होता. त्या सैनिकांची दैनंदिनी, सार्वजनिक नोंदी आणि या नोंदीच्या आधारावर त्याची लेक सना त्याचा शोध घ्यायला निघते. या संपूर्ण डॉक्युमेंट्रीचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यामुळेच त्याला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळालं.
"दुसऱ्या महायुद्धातील एका सैनिकाची कथा प्रत्येक प्रेक्षकाला विचार करायला भार पाडेल या प्रमाणे चित्रपट निर्मात्यांनी तिची मांडणी केली आहे. त्यामुळे अभिलेखीय सामग्रीचा नाविन्यपूर्ण वापर हा अतिशय संवेदनशील आहे आणि त्याची सिनेमॅटिक ट्रीटमेंट उत्कृष्ट आहे", असं आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या परिक्षकांनी म्हटलं.
दरम्यान, मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022 च्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, आयर्लंड, इटली, नेदरलँड, पनामा, दक्षिण कोरिया आणि ब्रिटनमधील 18 डॉक्युमेंटरी चित्रपट होते. तर, शॉर्ट फिक्शन प्रकारात मल्याळी चित्रपट 'साक्षात्कारम' ला रौप्य शंख पुरस्कार डेन्मार्कच्या फॅरो आयलंड्स येथील गुडमंड हेलमसल यांच्या 'ब्रदर टोल' या चित्रपटासह मिळाला.