‘अंड्याचा फंडा’ सिनेमाला लाभला लतादीदींचा शुभाशीर्वाद!
By Admin | Published: June 23, 2017 01:33 AM2017-06-23T01:33:46+5:302017-06-23T01:33:46+5:30
‘कुछ तो गडबड हे दया...’, ‘तोड दो दरवाजा...’ हे सीआयडीचे डायलॉग्ज लोक आजही आवडीने बोलतात. सामान्य प्रेक्षकांच्या मनावर गेली कित्येक वर्षे अधिराज्य गाजवलेल्या
‘कुछ तो गडबड हे दया...’, ‘तोड दो दरवाजा...’ हे सीआयडीचे डायलॉग्ज लोक आजही आवडीने बोलतात. सामान्य प्रेक्षकांच्या मनावर गेली कित्येक वर्षे अधिराज्य गाजवलेल्या या मालिकेची भारताच्या गानकोकिळा ‘लता मंगेशकर’ देखील भरपूर मोठ्या फॅन आहेत. विशेष म्हणजे, या मालिकेचे लेखक आणि दिग्दर्शक संतोष शेट्टी यांचा आगामी मराठी सिनेमा ‘अंड्याचा फंडा’देखील याच धाटणीचा असल्यामुळे लता मंगेशकर यांनी या सिनेमाला विशेष पसंती दिली आहे. नुकतेच या सिनेमाचे ‘गोष्ट आता थांबली’ हे गाणे लता मंगेशकर यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आले. विशेष म्हणजे, लता दिदींच्या हस्ते एका मराठी चित्रपटाचे गाणे सादर करण्याची ही पहिलीच वेळ असून हे भाग्य ‘अंड्याचा फंडा’ सिनेमाच्या टीमला लाभले आहे. आदर्श शिंदेच्या आवाजातले हे गाणे क्षितिज पटवर्धन यांनी लिहिले असून त्याला अमित राज यांनी संगीत दिले आहे.
रहस्य आणि शोध कथा लिहिण्यात विशेष हातखंडा असणारे संतोष शेट्टी यांनीच या सिनेमाचे लेखन केले असल्यामुळे हा सिनेमा नक्कीच रोमांचक असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, खुद्द लतादीदींना गूढ आणि शोध कथेवर आधारित असलेल्या मालिका तसेच सिनेमे बघायला भरपूर आवडते आणि त्यामुळेच त्यांनी ‘अंड्याचा फंडा’ या सिनेमातील गाण्याच्या प्रसिद्धीसाठी आपला अनमोल वेळ देऊ केला. या प्रसंगी सिनेमाचे दिग्दर्शक तसेच निर्मात्यांसोबतच अथर्व बेडेकर, शुभम परब, मृणाल जाधव हे बालकलाकार आणि दीपा परब व सुशांत शेलार या कलाकारांनी लतादीदींच्या निवासस्थानी हजेरी लावली होती.
लातादीदींनी या सर्वांना शुभाशीर्वाद देऊन सिनेमाच्या भरघोस यशासाठी शुभेच्छा देखील दिल्या. बालपणाच्या मैत्रीवर आधारित असलेला हा सिनेमा अध्यास क्रिएशनचे विजय शेट्टी यांची निर्मिती असून, प्रशांत पुजारी आणि इंदिरा विश्वनाथ शेट्टी यांनी त्याची सहनिर्मिती केली आहे. तसेच पटकथा आणि संवाद अंबर हडप, गणेश पंडित आणि श्रीपाद जोशी यांनी लिहिली असून, जूनच्या अखेरीस ३० तारखेला हा सिनेमा चित्रपटप्रेमींच्या भेटीला येणार आहे.