'एक थी रानी, एक था रावण' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 04:51 PM2019-01-15T16:51:02+5:302019-01-15T16:59:10+5:30
महिलांमधील या जागृता वाढवण्यासाठी ‘स्टार भारत’वर ‘एक थी रानी, एक था रावण’ ही नवी मालिका प्रसारित करण्यात येणार आहे.
महिलांमधील या जागृता वाढवण्यासाठी ‘स्टार भारत’वर ‘एक थी रानी, एक था रावण’ ही नवी मालिका प्रसारित करण्यात येणार आहे. या मालिकेत एका तरूण मुलीच्या शक्तिशाली कथेद्वारे महिलांची छेडाछाड करणाऱ्या गुन्हेगारी विषयाला हात घालण्यात आला आहे. झाशीच्या राणीमुळे प्रसिध्द झालेल्या झाशी या शहरात मालिकेचे कथानक घडते. राणी ही एक सामान्य मुलगी असते. पण घराबाहेर पडली की कोणीतरी अनोळखी व्यक्ती आपला सतत पाठलाग करीत असल्याचे तिला जाणवत असे. यामुळे ती मनातून अतिशय घाबरून गेलेली असते. तिचे कुटुंब हे मोडकळीस आलेले असते, पण तिला शिक्षणाची आवड असते. मात्र ती घरातून बाहेर पडली की 27 वर्षांचा रिवाज नावाचा हा तरूण सतत तिच्या मागे मागे येत असे. रिवाज हा तिचा मित्र नव्हता की प्रियकर. तो फक्त तिचा पिच्छा पुरविणारा एक विकृत तरूण होता. भारतात महिलांचा असा सतत पाठलाग करण्याच्या गुन्ह्याला क्वचितच महत्त्व दिले जाते आणि अनेकदा अशा प्रकारांकडे काणाडोळा केला जातो. किंबहुना अशी तक्रार करणाऱ्या महिलेलाच तिच्या वागण्यात सुधारणा करण्यास किंवा अशा प्रकाराशी जुळवून घेण्यास सांगितले जाते. या गुन्हेगाराला दोष देण्याऐवजी महिलेलाच त्याबद्दल जबाबदार धरले जाते. या गुन्ह्याचा अंत करण्यासाठी पुरुष आणि स्त्रियांच्या मानसिकतेत बदल घडविण्यचा प्रयत्न या मालिकेद्वारे केला जाणार आहे.
‘पॅनोरमा एंटरटेन्मेंट’ची निर्मिती असलेल्या या मालिकेत मनुल चुडासामा ही राणीच्या भूमिकेद्वारे हिंदी मालिकांमध्ये पदार्पण करीत आहे. तर राम यशवर्धन हा रिवाजच्या भूमिकेद्वारे मालिकांमध्ये पदार्पण करीत आहे. या मालिकेच्या प्रसिध्दीसाठी एका भावनात्मक कवितेसाठी नामवंत गायिका इला अरुणने आपला आवाज देऊ केला आहे. संजीव सेठ, वैष्णवी राव, अश्विनी कौशल आणि ऋत्विका डे यासारखे कलाकार या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत.