एका लग्नाची पुढची गोष्टला प्रेक्षकांचा मिळतोय भरघोस प्रतिसाद, बुक माय शोवर नाटक ठरलंय अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 05:44 PM2018-12-06T17:44:17+5:302018-12-06T17:52:09+5:30
एका लग्नाची पुढची गोष्ट नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले असून या नाटकाने रंगमंचावर दमदार एंट्री घेतली आहे.
प्रशांत दामले आणि कविता लाड यांची मुख्य भूमिका असलेले एका लग्नाची गोष्ट हे नाटक प्रचंड गाजले होते. या नाटकाचा पुढचा भाग म्हणजेच एका लग्नाची पुढची गोष्ट नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले असून या नाटकाने रंगमंचावर दमदार एंट्री घेतली आहे. नाटकाचा पहिला प्रयोग झाल्यानंतर काहीच दिवसांत हे नाटक बुक माय शो या बुकिंग साईट अॅपवर नंबर वन ठरले आहे. नाळ, २.० यांसारख्या चित्रपटांना देखील या नाटकाने टक्कर दिली आहे. एका मराठी नाटकाने बुक माय शो सारख्या अॅपवर कित्येक दिवस नंबर वन असणे ही मराठी नाट्यसृष्टीसाठी आनंदाची बाब आहे. मराठी नाटकाची लोकप्रियता यावरून दिसून येत आहे.
एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाची घोषणा झाल्यापासून या नाटकाविषयी रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. या नाटकाचे सगळेच प्रयोग हाऊस फुल जात आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून Book My Show वर हे नाटक पहिल्या क्रमांकावर आहे. याविषयी प्रशांत दामले यांनीच सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांना सांगितले होते. या नाटकाला रसिकांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून प्रशांत दामले सध्या प्रचंड खूश आहेत. ते सांगतात, एक लग्नाची गोष्ट हे नाटक पाहिलेली अनेक रसिक मंडळी अनेक वर्षांनी आवर्जून एका लग्नाची पुढची गोष्ट हे नाटक पाहायला येत आहेत. या नाटकाला येणाऱ्या जोडप्यांना हे नाटक खूप आवडत आहे. नाटक संपल्यावर लोक आवर्जून आपला अभिप्राय आम्हाला कळवत आहेत. नाटक पाहाणारा वयोगट हा ठरावीक असतो असे म्हटले जाते. पण विविध वयोगटातील लोक हे नाटक पाहायला येत आहेत. केवळ मराठी नव्हे तर अमराठी लोकांमध्ये देखील या नाटकाविषयी उत्सुकता आहे. नाटक कधीही न पाहिलेले लोक देखील या नाटकामुळे नाट्यगृहाकडे वळत आहेत. लोकांना मन्या आणि मनीची गोष्ट ही रसिकांना त्यांच्याच घरात रोज घडत असलेली गोष्ट वाटत असल्याचे ते आवर्जून सांगत आहेत. हे नाटक माझ्यासाठी खूप खास आहे. कारण एक कलाकार म्हणून मला पुन्हा एकदा मन्या ही व्यक्तिरेखा अनेक वर्षांनी जगता आली आहे. लग्नाच्या अनेक वर्षांनंतर पती-पत्नीचे नाते कशा पद्धतीने बदलत जाते, त्यांच्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांचे नाते कसे बदलते हे सगळे हलक्या फुलक्या पद्धतीने या नाटकात मांडण्यात आलेले आहे.