कंगना राणौतला पत्रकाराशी पंगा पडला भारी, मीडियाने घेतला इतका मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 11:14 AM2019-07-10T11:14:06+5:302019-07-10T11:16:35+5:30
‘जजमेंटल है क्या’ सिनेमाच्या एका इव्हेंटमध्ये कंगना एका पत्रकारावर भडकली होती. एवढेच नाही तर यानंतर तिची बहीण रंगोली हिने मीडियाबद्दल अनेक उलसुलट गोष्टी लिहिल्या होत्या.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिने भर पत्रकार परिषदेत एका पत्रकाराशी पंगा घेतला. पाठोपाठ तिची बहीण रंगाली ही सुद्धा मीडियावर तुटून पडली. याचा परिणाम काय झाला तर ‘जजमेंटल है क्या’ या कंगनाच्या आगामी चित्रपटाला पूर्णपणे बॉयकॉट करण्याचा अर्थात या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मीडियाने घेतला. यामुळे कंगनाच्या चित्रपटाला आता कुठल्याही प्रकारचे मीडिया कव्हरेज दिले जाणार नाही.
‘जजमेंटल है क्या’ सिनेमाच्या एका इव्हेंटमध्ये कंगना एका पत्रकारावर भडकली होती. एवढेच नाही तर यानंतर तिची बहीण रंगोली हिने मीडियाबद्दल अनेक उलसुलट गोष्टी लिहिल्या होत्या. या पार्श्वभूमी Entertainment Journalist’s Guild of India या संस्थेने ‘जजमेंटल है क्या’ची निर्माती एकता कपूर हिला एक पत्र लिहिले आहे. या पत्रात कंगनाचा ‘जजमेंटल है क्या’ या आगामी सिनेमाला कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी न देण्याचे म्हटले आहे.
पत्राच्या सब्जेक्ट लाइनमध्येच कंगनाने पत्रपरिषदेत संबंधित पत्रकाराशी केलेल्या गैरवर्तनाचा उल्लेख आहे. ‘तुमच्या टीमने आमच्याकडे तुम्ही आयोजित केलेल्या एका इव्हेंटमध्ये येऊन हा इव्हेंट कव्हर करण्याची विनंती केली होती. या इव्हेंटमध्ये अभिनेता राजकुमार राव आणि कंगना राणौत हजर होते. यावेळी आमच्या एका पत्रकाराने कंगनाला प्रश्न विचारल्यानंतर ती त्याच्यावर भडकली. तसेच त्याच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासही तिने नकार दिला. हा संपूर्ण प्रकार घडला त्यावेळी तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित होता. त्यामुळे तुम्हाला याबाबत सर्व माहित आहे. या सर्व प्रकारावर तुमच्याकडून एक लेखी खुलासा आणि कंगनाकडून झालेल्या गैरवर्तनाची निंदा अपेक्षित आहे. हा संपूर्ण प्रकार निंदनीय आहे आणि त्यामुळे आम्ही कंगनाचा आगामी सिनेमावर पूर्णपणे बहिष्कार टाकत असल्याचे या पत्रात नमूद आहे.
Entertainment Journalists' Guild of India boycotts Kangana Ranaut, decides to "not give her any media coverage" over an incident where she accused a journalist of running a "smear campaign" against her at a song launch event of movie 'Judgementall Hai Kya'. pic.twitter.com/ysOOV5KYrE
— ANI (@ANI) July 9, 2019
काय आहे प्रकरण
पीटीआय वृत्तसंस्थेचे पत्रकार जस्टीन राव यांनी पत्रकार परिषदेत कंगनाला प्रश्न विचारला होता. प्रश्न विचारण्याआधी त्यांनी आपले नाव सांगितले होते. पण त्यांचे नाव ऐकताच कंगनाला तिच्याबद्दल लिहिलेली एक बातमी आठवली. ‘मणिकर्णिका’च्या प्रदर्शनावेळी तिच्याबद्दल ही बातमी लिहिण्यात आली होती. मग काय, क्षणात कंगनाचा पारा चढला आणि तिने पत्रकारावर हल्लाबोल केला.
#WATCH Kangana Ranaut has a spat with a reporter, accuses him of smear campaign, at the 'Judgementall Hai Kya' song launch event in Mumbai. (07.07.2019) pic.twitter.com/sNuWduY3yg
— ANI (@ANI) July 8, 2019
‘मणिकर्णिका’ या चित्रपटाच्या वेळी माझ्याबद्दल जाणीपूर्वक खोट्या बातम्या लिहिल्या गेल्यात. माझ्याविरोधात खोट्या गोष्टी ट्वीट केल्या गेल्यात, असा आरोप तिने केला. एवढेच नाही तर जस्टीन राव यांच्यावरही तिने आगपाखड केली. ‘मणिकर्णिका’च्या रिलीजवेळी जस्टिन राव माझी मुलाखत घ्यायला आले होते. ते तीन तास माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये होते. त्यांनी माझ्यासोबत जेवणही केले. पण तरीही माझ्या आणि माझ्या चित्रपटाबद्दल वाईट गोष्टी लिहिल्या. त्यांनी नंतर मला मॅसेजही केला होता, असे कंगना म्हणाली. तिच्या या आरोपानंतर जस्टीन राव यांनीही आपली बाजू मांडली. कंगनाने केलेले सगळे आरोपत्यांनी फेटाळून लावले. पत्रकार नेहमी सत्य तेच लिहितात. मी तुझ्याविरोधात काहीही वाईट लिहिलेले नाही. मी कधीही तुझ्यासोबत जेवण केलेले नाही आणि तुझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये मी कधीच तीन तास घालवले नाहीत, असे जस्टीन राव म्हणाले. शिवाय मी तुझ्याविरोधात ट्वीट केले असेल तर त्याचा व तुला केलेल्या मॅसेजचा स्क्रिनशॉट दाखव, असे आव्हानही त्यांनी कंगनाला दिले. त्याचा हा पवित्रा पाहून, मी हे नंतर शेअर करेल, असे कंगना म्हणाली होती.