मनोरंजन विश्वातली खरीखुरी गुन्हेगारी
By Admin | Published: August 29, 2015 03:03 AM2015-08-29T03:03:02+5:302015-08-29T09:52:57+5:30
स्टार टीव्हीचे माजी प्रमुख पीटर मुखर्जी यांची पत्नी व नाइन एक्स कंपनीची माजी सीईओ इंद्राणी मुखर्जीला मुलगी शिना हिची हत्या केल्याच्या आरोपात पोलिसांनी अटक केली आहे.
स्टार टीव्हीचे माजी प्रमुख पीटर मुखर्जी यांची पत्नी व नाइन एक्स कंपनीची माजी सीईओ इंद्राणी मुखर्जीला मुलगी शिना हिची हत्या केल्याच्या आरोपात पोलिसांनी अटक केली आहे. मनोरंजन जगतात या बातमीने खळबळ माजली आहे. मात्र ही आगळीवेगळी घटना नाहीच. याआधीदेखील चंदेरी दुनियेत अशा घटना घडल्या आहेत. हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यांत आरोपींना अटक करण्यात आली आहे.
फेब्रुवारी २०१३ साली पोलिसांना संध्या पंडित हिचा सांगाडा मिळाला होता. संगीतकार जतीन पंडित (जतीन-ललित या जोडीतील जतीन) यांची संध्या मोठी मुलगी होती. तिच्या हत्येचा आरोपी म्हणून जतीन यांचा मुलगा रघुवीर याला मुख्य आरोपी म्हणून पोलिसांनी अटक केली होती. २०१२ साली अशाच प्रकारच्या दोन घटना समोर आल्या होत्या. कॉमेडियन अनुज टिक्कू यांचे वडील अरुण टिक्कू यांचे शव मुंबईच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये आढळले होते. ‘नो वन किल्ड जेसिका लाल’ व ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटात काम करणाऱ्या अनुजला पित्याच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली, यानंतर त्याचे दोन मित्र मनोज व धनंजय यासोबतच मॉडेल सिमरन यांनाही अटक केली होती.
याच वर्षी एप्रिल महिन्यात मुंबईतील मॉडेल मीनाक्षी थापा हिचे शव अलाहाबादमध्ये गंगेच्या तिरावर आढळून आले होते. मीनाक्षीला तिचे मित्र गोरखपूर येथे घेऊन गेले होते. या प्रकरणी अमित जयस्वाल व अमितची प्रेयसी प्रीती सरीन यांना अटक केली होती. अमित व प्रीती या दोघांनी प्रेम प्रकरणातून मिळून मीनाक्षीची हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. एका टेलिव्हिजन कंपनीत काम करणारे नीरज ग्रोव्हर यांची हत्या मे २००८ मध्ये झाली होती. या प्रकरणात केरळची मॉडेल मारिया सुसाईराज व तिचा बॉयफ्रेंड जेरेनो मॅथ्यू यांना बेड्या ठोकल्या गेल्या. पोलिसांनी दोघांवर हत्येचा आरोप ठेवला होता.
२००४ साली प्रसिद्ध मॉडेल नसिफा जोजफ हिची हत्या झाली होती, यात तिचा प्रियकर व बिझनेसमॅन गौतम यांना आरोपी करण्यात आले होते. दोघेही बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते, शिवाय गौतमचे आधीच लग्न झाले होते. सन २००० मध्ये जुन्या काळातील अभिनेत्री प्रिया राजवंश हिची हत्या झाली. हीर रांझा ते हसते जख्म व कुदरत यासारख्या चित्रपटांत काम करणाऱ्या प्रियाचे चित्रपट निर्माते चेतन आनंद यांच्याशी संबंध होते. तिच्या हत्येप्रकरणी चेतन आनंदची मुले केतन व विवेक आनंद यांची नावे आरोपी म्हणून समोर आली होती, त्यांना अटकही करण्यात आली होती.