पर्यावरण संवर्धनासाठी !
By Admin | Published: July 13, 2016 01:31 AM2016-07-13T01:31:37+5:302016-07-13T01:31:37+5:30
जय देव जय देव जय पर्यावरण देवा, तुमचं रक्षण करणं आमुचा बाणा, या ओळीला तंतोतंत सार्थ ठरवत सरस्वती मालिकेतील तितीक्षा तावडे हिने वृक्षारोपण करत
जय देव जय देव जय पर्यावरण देवा, तुमचं रक्षण करणं आमुचा बाणा, या ओळीला तंतोतंत सार्थ ठरवत सरस्वती मालिकेतील तितीक्षा तावडे हिने वृक्षारोपण करत, पर्यावरण संवर्धन मोहिमेला हातभार लावला. याचनिमित्ताने वृक्षारोपण आणि त्याचे महत्त्व याबद्दल तितीक्षाला काय वाटतं, हे सीएनएक्सने जाणून घेतले.
... अन् मनातील
इच्छा पूर्ण झाली
आधीपासूनच आपणही फिल्मसिटीमध्ये एखादं झाडं लावावं, त्याची काळजी घ्यावी असं वाटायचं. मात्र, मालिका किंवा फिल्मसिटीकडून परवानगी मिळेल की नाही, अशी भीती मनात होती. मात्र, अचानक एके दिवशी फिल्मसिटीच्या आॅफिसमधून फोन आला. फिल्मसिटीत वृक्षारोपणचा कार्यक्रम असून, त्यात तुम्ही सहभागी व्हावं, असं त्या फोनवरून सांगितल्याने मी भलतीच खूश झाले आणि अनेक दिवसांपासूनची फिल्मसिटीत रोप लावण्याची इच्छा पूर्ण झाली.
झाडांशी गप्पा मारा
माझ्या मते, फक्त रोप लावून सगळी जबाबदारी संपली असे नाही. त्या रोपट्याचे संगोपन होणेही तितकेच गरजेचे आहे. त्यामुळेच मी लावलेल्या रोपट्याचे नीट संगोपन होते का नाही, हे पाहण्यासाठी त्या रोपट्याला भेट देईन, त्याच्याशी संवाद साधेन. जर तुम्ही झाडांना प्रेम दिले, त्यांच्याशी दिवसातून एकदा तरी गप्पा मारल्या, तर त्या रोपट्याची पटापट वाढ होते, अशी माझ्या आईची श्रद्धा आहे. हे गंमतीशीर असले, तरी मलाही तसेच वाटते. कारण प्रेम दिल्याने ते रोप पटकन वाढते. माझ्या घराच्या बाल्कनीत १५-२० कुंड्या असून, विविध प्रकारची झाडे तिथे आहेत. यात जास्वंद, अबोली, तुळशी वृंदावन, मनी प्लांट, शेवंतीच्या फुलाचे रोप आमच्या बाल्कनीत लावलीत. घरात रोपे लावल्याने प्रसन्न वाटते. त्यामुळेच गोरेगावला मैत्रिणीसह राहत असलेल्या ठिकाणीही कोरफड, तुळशी वृंदावनाची झाडे लावलीत. कोरफडीचा वापर चेहऱ्याला लावण्यासाठीही मी करते.
फुले झाडावरच
चांगली दिसतात
आपण वारंवार बघतो की, झाडाची फुले तोडली जातात. मी एवढंच सांगू इच्छिते की फुलं तोडू नये, ती झाडावरच
चांगली दिसतात. जागोजागी फुले न तोडण्याचा बोर्ड असतो, त्या नियमाचे पालन करावे आणि आपल्या लहान मुलांनाही ते समजावून सांगावे. सध्या कामामुळे सगळेच बिझी असतात. मात्र, अशा परिस्थितीतही प्रत्येकाने थोडा वेळ काढून आठवड्यातून महिन्यातून जसे जमेल तसे एक तरी रोप लावावे. मी शूटिंगच्या शेड्युलमधून वेळ काढून रोप लावले आणि यापुढेही ते अविरत सुरू ठेवणार आहे.