ईथन हॉकचा ‘मॅग्नेफिसंट’ अंदाज

By Admin | Published: September 23, 2016 03:43 AM2016-09-23T03:43:59+5:302016-09-23T03:43:59+5:30

1960 साली आलेल्या ‘द मॅग्निफिसंट सेव्हन’ या गाजलेल्या चित्रपटाचा रिमेक लवकरच येतो आहे.

Ethn Hawk's 'Magnificent' Style | ईथन हॉकचा ‘मॅग्नेफिसंट’ अंदाज

ईथन हॉकचा ‘मॅग्नेफिसंट’ अंदाज

googlenewsNext

1960 साली आलेल्या ‘द मॅग्निफिसंट सेव्हन’ या गाजलेल्या चित्रपटाचा रिमेक लवकरच येतो आहे. अँट्वॉन फ्युका हा चित्रपट दिग्दर्शित करीत असून, त्यात डेन्झेल वॉशिंग्टन, ईथन हॉक, ख्रिस पॅट यांच्या प्रमुख भूमिकेसह अनेक कलाकार यात आहेत. स्वार्थी, जमीन बळकावू पाहणाऱ्या खलनायकाच्या जाचातून एका गावाची मुक्तता करण्यासाठी सात अतरंगी लोक एकत्र येतात, असे या सिनेमाचे कथानक आहे. बऱ्याच जणांना हे वाचून ‘शोले’ची आठवण येईल. चित्रपटात ‘गुडनाइट रॉबीचॉक्स’ या शार्प शूटरची भूमिका साकारणाऱ्या ईथन हॉकने आपली भूमिका, शूटिंगदरम्यान आलेला अनुभव आणि सहकलाकारांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.


मूळ ‘द मॅग्निफिसंट सेव्हन’ संदर्भात तुझ्या काय आठवणी आहेत?
- मी तो किमान दोन वेळा पाहिला आहे. मी लहान असताना टीव्हीवरच तो पाहिला होता. माझा जन्म टेक्ससचा. त्याकाळी रविवारी दुपारी बहुतेक वेळा हा चित्रपट टीव्हीवर दाखवला जायचा. परंतु, तेव्हा वाटले नव्हते की, मी या चित्रपटात काम करेन. पण शूटिंग दरम्यान बालपणातील अनेक आठवणी माझ्यासाठी पुन्हा जाग्या झाल्या.

तुझ्या पात्राचे नाव ‘गुडनाईट रॉबिशो’ हे फार मजेशीर आहे...
- हो. माझ्या कॅरेक्सर साकारताना मी या नावाचा खूप आधार घेतला. कारण हे नाव फार मजेशरी आहे. अगदी माझ्या भूमिकेसारखे. मी एका माजी बंडखोर सैनिक आणि आता शार्प शूटर असलेले पात्र साकारत आहे. प्रत्येक पात्राची आपली अशी खुबी आहे. जून्या ‘द मॅग्निफिसंंट सेव्हन’ चित्रपटासारखे सात श्वेत लोक मेक्सिकन लुटेऱ्यांपासून गावाचे केवळ संरक्षण करीत नाही. यावेळी कथेला अनेक नवे पदर आहेत. आमच्या चित्रपटाचे वेगळेपण म्हणजे यावेळी सात जणांच्या संघाचे नेतृत्त्व कोणी श्वेत करणार नाही तर डेन्झेल वॉशिंग्टनचे कृष्णवर्णीय पात्र करीत आहे. जबरदस्त कलाकारांचा संच या चित्रपटात पाहायला मिळेल.
अनेक वेळा ही कथा रंगवण्यात आलेली आहे. यावेळी वेगळेपण काय?
- हे खरं आहे की, अशा प्रकारच्या कथा खूप वेळी रंगवण्यात आल्या आहेत. मी तर त्यांना दंतकथा म्हणतो. ‘द सेव्हन समुराई’ किंवा ‘द डर्टी डझन’सारखे अनेक चित्रपट या कथानकावर बेतलेले आहे. मूळ चित्रपटाप्रमाणे आमच्या सिनेमात मेक्सिकन लुटेरे खलनायक नसून एक स्वार्थी धनाढ्य ‘बार्थोलोम्यू बॉग’ आहे. पैशाच्या जोरावर तो गावकऱ्यांच्या जमिनी बळकावून अनाहूत अत्याचार करतो. त्याच्या विरोधात आम्ही सात जण लढा देतो.

भूमिकेच्या तयारीसाठी तू कशी मेहनत घेतली?
- खरं सांगायचे तर, अभिनय म्हणजे बऱ्याच वेळा नोकरीसारखा असतो. दिलेले काम पूर्ण करायचे. परंतु, हा चित्रपट त्याला अपवाद आहे. ‘द मॅग्नेफिसंट सेव्हन’मध्ये काम करणे म्हणजे स्वप्नातील भूमिका साकारण्यासारखे होते. लहानपणापासून मी वेस्टर्न सिनेमे पाहत आलेलो आहे. त्यामुळे मला त्यांच्याविषयी बरीच माहिती होती. ‘काऊबॉय’ची भूमिका करणे तसे पाहिले गेले तर सर्वच कलाकारांचे स्वप्न असते.
या चित्रपटामुळे ते पूर्ण झाले.

सर्व कलाकारांची एकमेकांशी केमिस्ट्री कशी होती?
- एकदम भन्नाट. माझे सर्व सहकलाकारा हे उत्तम अभिनेते आहेत. डेन्झेल वॉशिंग्टनसारख्या महान अभिनेत्याविषयी मी काय बोलणार. ख्रिसला मी यापूर्वी ओळखत नव्हतो; मात्र शूटिंग दरम्यान आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र बनलो. तो ज्या प्रकारे सेटवर सर्वांशी वागायचा त्यामुळे वातावरण एकदम ऊर्जामय होऊन जायचे. विन्सेंटला तर मी दोन दशकांपासून ओळखतो. ‘अ बिटरस्वीट लाईफ’ फेम ब्युंग-हन ली हा खूप प्रतिभावान अभिनेता आहे. मॅन्युएल आणि मार्टिनसोबतदेखील माझी केमिस्ट्री जुळली. संपूर्ण शूटिंग दरम्यान आमची संपूर्ण गँग धमाल करायची.

Web Title: Ethn Hawk's 'Magnificent' Style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.