प्रत्येकाच्या जगण्याचा प्रयोगशील गोतावळा!
By Admin | Published: August 28, 2015 11:45 PM2015-08-28T23:45:17+5:302015-08-29T09:52:43+5:30
आयुष्यात पावलोपावली पुढची चाल खेळताना आपापले मार्ग अनुसरले जातात आणि यात काही ओळखीचे, तर काही अनोळखी असे अनेक जण भेटत राहतात. यातल्या प्रत्येकाचे स्वत:चे असे जग
- राज चिंचणकर
आयुष्यात पावलोपावली पुढची चाल खेळताना आपापले मार्ग अनुसरले जातात आणि यात काही ओळखीचे, तर काही अनोळखी असे अनेक जण भेटत राहतात. यातल्या प्रत्येकाचे स्वत:चे असे जग असते आणि त्या विश्वात जो तो आकंठ बुडालेला असतो. एका क्षणी यातले काही जण अचानक एकत्र येतात आणि एकमेकांची न्यारी दुनिया समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. मनोव्यापाराचा असा बाज ‘हायवे’ या चित्रपटाने हाताळत यातल्या प्रत्येकाच्या जगण्याचा प्रयोगशील गोतावळा सादर केला आहे.
खरा माणूस प्रवासातच अनुभवता येतो, असे म्हटले जाते आणि ही संकल्पना वापरत हा चित्रपट उलगडत जातो. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे आणि सामाजिकदृष्ट्या निरनिराळ्या आर्थिक स्तरातले काही जण विविध ठिकाणांहून पुण्याच्या दिशेने गाड्यांमधून प्रवासाला निघतात आणि हायवेवर मार्गक्रमण करू लागतात. हे सर्व जण आपापल्या व्यवधानात अडकलेले आहेत आणि यात गुरफटलेली ही माणसे स्वत:च्या गतीने हायवेवरून पळत आहेत. मात्र एका अवचित क्षणी ही माणसे, एखादे प्रयोजन केल्याप्रमाणे एकत्र येतात आणि मानवी संबंधांची वीण घट्ट करत हा प्रवास पुढे वाट चालू लागतो.
या चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद लिहिणारे गिरीश कुलकर्णी आणि दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांची जोडी नेहमी काही तरी वेगळा 'प्रयोग' करण्याच्या प्रयत्नात असते आणि त्यानुसार या दोघांनी या चित्रपटातही असाच 'प्रयोग' केला आहे. त्यांचे हे वेगळेपण चित्रपटातून स्पष्ट होत जाते खरे; परंतु हा चित्रपट अनुभवण्यासाठी 'वेगळ्या' नजरेची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले आहे. चित्रपटाचे सरळसरळ दोन भाग पडले आहेत. पूर्वार्धात चित्रपट हायवेवरून पळत राहतो; तर उत्तरार्धात वाहतूककोंडीचा ब्रेक घेत चित्रपट शेवटच्या फ्रेमपर्यंत चक्क थांबून राहतो. यातील प्रवासातला प्रत्येक जण हाच या चित्रपटाचा हुकमी एक्का आहे. त्यादृष्टीने प्रत्येक व्यक्तिरेखेवर असलेली दिग्दर्शकाची हुकूमत स्पष्ट होते. यातल्या व्यक्तिरेखांचे कॅमेऱ्याने बारकाईने टिपलेले 'चेहरे'ही लक्षात राहतात. चित्रपटातल्या या विविध व्यक्तिरेखांवरच चित्रपटाच उभा आहे. मनोरंजनाच्या दृष्टीने पाहण्यासारखा हा चित्रपट नव्हे, याची खूणगाठ चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच मारली जाते. यातला 'बिटविन द लाइन्स' अर्थ शोधला, तरच हा चित्रपट 'कळू' शकतो आणि त्यादृष्टीने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा हा चित्रपट म्हणता येईल.
चित्रपटाला ठोस अशी कथाच नाही. पण जे आहे, ते कुठलीही वळणे न घेता समांतर रेषेत चालत राहते. भैरवी आळवताना यातल्या पात्रांचा काही एक सामायिक धागा जुळून येईल, या अपेक्षेपासूनही चित्रपट दूर आहे. मध्यंतरापूर्वी यातल्या व्यक्तिरेखा प्रस्थापित होण्यात बरेच फूटेज वापरले आहे. यातल्या काही व्यक्तिरेखांमध्ये तोचतोचपणाचा अतिरेक झाल्याचीही जाणीव होते. परदेशातून परतलेल्या भारतीय पात्राचे मोठे पॉज घेत इंग्रजी बोलणे सतत कानांवर येत राहते. ट्रकमधल्या पिशवीचे गूढही असेच वाढवण्यात आले आहे. जगण्याचे वेगळे भान देत, प्रत्येकातला 'मी' नव्याने ओळखण्याची रुजवात मात्र हा चित्रपट करतो. चित्रपटाचे ध्वनी आरेखन जमून आले आहे आणि कॅमेरावर्कही चांगले आहे. चित्रपटात 'घन तमी' या कवितेच्या वापरलेल्या ओळी कानांत रुणझुणत राहतात आणि शेवटी त्याच ओळी ओठांवर रेंगाळतात.
गिरीश कुलकर्णी, रेणुका शहाणे, सुनील बर्वे, मुक्ता बर्वे, हुमा कुरेशी, टिस्का चोप्रा, सतीश आळेकर, किशोर कदम, छाया कदम, नागराज मंजुळे, नंदकिशोर चौघुले, विद्याधर जोशी, मयूर खांडगे, श्रीकांत यादव, उमेश जगताप, शकुंतला नगरकर, निपुण धर्माधिकारी, ओम भूतकर, पूर्वा पवार, शशांक शेंडे, शिल्पा अनासपुरे, ऊर्मिला निंबाळकर, समीर भाटे, वृषाली कुलकर्णी या व अशा अनेक कलावंतांची टीम या चित्रपटात आहे. या सर्वच मंडळींनी त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिका चोख निभावून नेल्या आहेत. एकंदरीत, या चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक यांना 'अपेक्षित असलेल्या दृष्टीने' हा चित्रपट पाहिल्यास त्यात तथ्य नक्की वाटू शकेल; अन्यथा या 'हायवे'वर भरकटण्याची शक्यताही तेवढीच जास्त आहे.