खलनायक साकारतानाचा अनुभव रोमांचक !

By Admin | Published: May 4, 2016 01:59 AM2016-05-04T01:59:40+5:302016-05-04T01:59:40+5:30

अरविंद स्वामी म्हणजे गोड चेहऱ्याचा अभिनेता. क्रूर खलनायकाच्या भूमिकेत त्याला पाहणे जशी त्याच्या चाहत्यांसाठी कठीण गोष्ट, तशीच ते पात्र पडद्यावर साकारणेही अरविंदसाठी आव्हानात्मक होते

Exciting experience of the villain! | खलनायक साकारतानाचा अनुभव रोमांचक !

खलनायक साकारतानाचा अनुभव रोमांचक !

googlenewsNext

अरविंद स्वामी म्हणजे गोड चेहऱ्याचा अभिनेता. क्रूर खलनायकाच्या भूमिकेत त्याला पाहणे जशी त्याच्या चाहत्यांसाठी कठीण गोष्ट, तशीच ते पात्र पडद्यावर साकारणेही अरविंदसाठी आव्हानात्मक होते, परंतु त्याने ते साकारले व त्या भूमिकेचे कौतुकही झाले. आता तो पुन्हा एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. ‘डीअर डॅड’ हा त्याचा चित्रपट लवकरच येतोय. या निमित्ताने ‘सीएनएक्स’च्या एडिटर जान्हवी सामंत यांनी अरविंदशी त्याच्या आतापर्यंतच्या अभिनयाच्या प्रवासाबाबत चर्चा केली, तेव्हा अरविंदने ‘थानी ओरुवन’ या चित्रपटात खलनायक साकारतानाचा अनुभव रोमांचक असल्याचे सांगितले.

याच चित्रपटाद्वारे हिंदीत पुनरागमनाचा विचार का केला?
मी कोणतेही काम किती लहान किंवा मोठे आहे, हे पाहत नाही. मी ज्या वेळी ‘रोजा’ चित्रपट करण्याचे ठरविले, त्या वेळी तो खूप लहान चित्रपट होता. त्याला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे तो चित्रपट इतका मोठा झाला. ‘बॉम्बे’नंतर मी सुंदर असा मल्याळम चित्रपट ‘देवरागम’ केला. एक अभिनेता म्हणून व्यस्त ठेवणाऱ्या चित्रपटाच्या मी शोधात असतो. सध्या प्रेक्षकांना जगभरातील सिनेमा खुला झाला आहे. त्यामुळे छोटे-छोटे चित्रपट आणि मनाला भावणाऱ्या कल्पना त्यांना आवडतात. यामुळे माझ्यासारख्या अभिनेत्यास प्रेरणा मिळते आणि त्याकडे आव्हान म्हणून मी पाहतो. जेव्हा दिग्दर्शक माझ्याकडे आले, त्या वेळी त्यांची कथा पाहून मला धक्काच बसला. अशा एकमेव अवस्थेतून जाणाऱ्या पात्राची भूमिका करणे मला गरजेचे होते. त्यानंतर मी खूप विचार केला. गैरसोयीच्या वाटणाऱ्या भूमिका मी करणार नाही, असे मी ठरविले आहे.

‘डीअर डॅड’विषयी सांग?
आपल्या मुलाला बोर्डिंग स्कूलमध्ये घेऊन जाणाऱ्या वडिलांची ही कथा आहे. सुरुवातीलाच काही गौप्यस्फोट होतात. हा अत्यंत भावनिक प्रवास आहे. ही संपूर्ण कथा नाट्यमयरीत्या गुंफली आहे. चित्रपटाचे शूटिंग मजेदार होते, परंतु शूटिंगदरम्यान मी काही नयनरम्य चित्रेही पाहिली.

तू प्रत्यक्षात किशोरवयीन मुलाचा पिताही आहेस. काय सांगशील?
खरं सांगायचं म्हटलं, तर या चित्रपटातील परिस्थिती वेगळी आहे. किशोरवयीन मुले अशा बेबनावाच्या स्थितीतून जात असतात. किशोरवयीन मुलांना स्वत:ची ओळख आणि व्यक्तिमत्त्वासाठी मोकळेपणा हवा असतो. रागावण्यामुळे ती दुरावली जातात. हा राग पालकांवर निघतो. माझा मुलगा आणि माझ्यामध्ये फारसे वाद होत नाहीत. तो १६ वर्षांचा आहे आणि शांत आहे. उलट मीच त्याला युवक कसे बोलतात आणि वागतात, असे सांगून अधिक त्रास देत असतो.

चांगली प्रतिमा तुझ्या कामाविरुद्ध आहे, असे तुला वाटते का?
मला ज्या काही भूमिका मिळाल्या, त्या मर्यादित स्वरूपाच्या होत्या. त्यामुळे ‘थानी ओरुवन’ या चित्रपटात मला क्रूर खलनायकाची भूमिका करताना खूप मजा आली. मी दिग्दर्शकासोबत बसत असे आणि अधिक क्रूरपणा कसा आणता येईल, याबाबत चर्चा करीत असे. मला अशा प्रकारच्या भूमिकेत पाहताना प्रेक्षकांना धक्का बसला. या चित्रपटातील भूमिकेमुळे माझ्याकडे घृणास्पद नजरेने माझे अनेक मित्रही पाहू लागले. मी चित्रपटात मेल्यानंतर अनेक जण रडले. माझी बॅग उचलणे, माझ्यापाठीमागे छत्री घेऊन फिरणे, माझ्यासोबत कपडे घेऊन फिरणे, मला योग्य बूट येतात की नाही हे पाहण्यासाठी धडपडणे अशा लोकांचा मला राग येतो. माझी कामे स्वत:च करण्याची मला सवय आहे आणि माझ्याभोवती कोणी असे फिरत असेल तर मला वाईट वाटते. माझ्यासोबत असणाऱ्या अशा लोकांसोबत मी मिसळू शकत नाही.

आता पुढचा चित्रपट कोणता आहे?
एका नव्या तेलगू भाषिक चित्रपटात मी काम करणार आहे. तथापि, ही भूमिका पुन्हा करण्याबाबत मी इच्छुक नव्हतो, दिग्दर्शकाने मला तयार केले. त्याशिवाय ही वेगळी भाषा आहे, त्यामुळे मी अधिक काही करू शकत नाही. मी नव्या चित्रपटात नव्या कल्पनेसह काम करण्यास उत्सुक आहे. प्रभुदेवा निर्मित ‘बोगन’ चित्रपटातही मी काम करीत आहे.

- janhavi.samant@lokmat.com

Web Title: Exciting experience of the villain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.