Exclusive Interview : आलिया भट कशी बनली माफिया क्वीन गंगूबाई?
By तेजल गावडे | Published: February 12, 2022 04:36 PM2022-02-12T16:36:15+5:302022-02-12T16:36:57+5:30
अभिनेत्री आलिया भटने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिका उत्तमरित्या रुपेरी पडद्यावर साकारल्या आहेत. आता ती संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi ) या चित्रपटात पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेतून भेटीला येणार आहे. आलियाने यात मुंबईची माफिया क्वीन गंगूबाईची भूमिका साकारली आहे.
अभिनेत्री आलिया भटने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिका उत्तमरित्या रुपेरी पडद्यावर साकारल्या आहेत. आता ती संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi ) या चित्रपटात पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेतून भेटीला येणार आहे. आलियाने यात मुंबईची माफिया क्वीन गंगूबाईची भूमिका साकारली आहे. यानिमित्ताने तिच्याशी केलेली ही बातचीत...
- तेजल गावडे
गंगूबाईच्या भूमिकेसाठी जेव्हा तुला विचारण्यात आले, त्यावेळी तुझी रिअॅक्शन काय होती?
- वयाच्या ९व्या वर्षापासून मला दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. आम्ही एक -दोन चित्रपटांवर काम करणार होतो. पण ते चित्रपट बनण्याआधीच त्यांचे काम थांबले. त्यामुळे जेव्हा संजय सर माझ्याकडे गंगूबाई काठियावाडीची स्क्रीप्ट घेऊन आले आणि म्हणाले की ही स्क्रीप्ट आहे आणि आपण एकत्र काम करत आहोत. संजय सर ठाम होते की तूच ही भूमिका करू शकते. याउलट मला शंका होती की ही भूमिका मी करू शकेन. कारण माझ्या व्यक्तिमत्त्वापेक्षा ही अगदी वेगळी व्यक्तिरेखा आहे. त्यामुळे त्या भूमिकेची शक्ती, सामर्थ्य आणि तीव्रता मी कशी दाखवू शकेन? माझ्यात मृदूता जास्त आहे. कठोरपणा कमी आहे. त्यामुळे मी या भूमिकेला न्याय देऊ शकेन का, हा प्रश्न मला सतावत होता. पण सरांचे माझ्याबाबतीतील मत ठाम होतं. त्यामुळे माझ्या शंकेला जागाच नव्हती. खरेतर मला वयाच्या नवव्या वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करायचे होते आणि आता ही संधी चालून आली आहे. तर मला या संधीचं सोनं करायचं होते. त्यामुळे मी या भूमिकेसाठी पूर्णपणे तयार झाली.
गंगूबाईच्या भूमिकेसाठी तू काय तयारी केली?
- आपली जी देहबोली असते ती निरीक्षण केल्यानंतर येते. त्यासाठी मी खूप व्हिडीओ पाहिले. या भूमिकेसाठी एक स्त्रीपण पाहिजे होते आणि तिच्यातील सामर्थ्यदेखील दाखवायचं होतं. ती कशी चालेल, कशी स्माईल करेल किंवा हसेल. गंगूबाई हसेल तर तिच्यात रफनेस असेल. तिच्या बोलण्यात भारदस्तपणा असेल. त्यामुळे मी आवाजावर काम केले. संजय सर म्हणाले की, आवाजावर काम केले तर ते वेगळेपण सिद्ध होईल. ओव्हरऑल या भूमिकेसाठी आम्ही सर्व गोष्टींवर बारकाईने काम केले आहे. मग ते आवाज असेल किंवा डायलॉग, हावभाव आणि देहबोली. पण संवेदनशीलता आणि तीव्रता या भूमिकेला परिपूर्ण करते. ती संवेदनशीलपण आहे आणि स्ट्राँगदेखील. तशीच ती रागीटपण आहे आणि विनोदीही. ही भूमिका साकारताना या गोष्टीचा समतोल साधणे महत्त्वाचे होते.
'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटाबद्दल थोडक्यात सांग?
- चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की गंगूबाईच्या जीवनातील समस्या संपतच नाहीत. विशेष करून कामाठीपुरातील महिलांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. लोकांना कामाठीपुरा सारख्या ठिकाणाहून आलेल्या महिला वाईट जगातून येतात, असे वाटते. समाज त्यांना वाईट लोक मानतात. समाजानेच या महिलांना माणूस म्हणून वागणूक देणे बंद केले आहे. त्यामुळे गंगूबाई त्या हक्कासाठी लढत असते. ट्रेलरमध्ये एक डायलॉगदेखील आहे की समाज में इन्सान की तरह जीने का हक में लेकर ही रहूँगी. माणसाप्रमाणे जगण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. पण हे वाईट जग मानले जाते. त्यामुळे त्यांचा हा हक्क हिरावून घेतला जातो. हा हक्क मिळवण्यासाठी गंगूबाई पुढाकार घेते. ती का पुढाकार घेते, कशी बनते आणि पुढे काय घडते, हे सर्व चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
गंगूबाईची कोणती गोष्ट तुला जास्त भावली?
- गंगूबाईमध्ये एक बालिशपणा आहे. सर्वांना चांगले जीवन आणि क्षण जगता यावेत, असे तिला वाटते. जेव्हा हे मिळत नाही, त्यासाठी लढावे लागते. पण ती स्वतःसाठी लढली नाही. ती कामाठीपुरामधील चार हजार महिलांसाठी लढली. हेच त्यांनी केले. जी कथा हुसैन जैदी यांच्या पुस्तकात लिहिली आहे. पन्नास वर्षांपर्यंत कमाठीपुरातील महिलांच्या घरातील भिंतीवर गंगूबाईचे चित्र लटकवलेले होते. इतका तिला तिथे मान, सन्मान होता. इतके तिचे प्रभावी व्यक्तिमत्त्व होते.
आतापर्यंत तू वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत, तर ही भूमिका जास्त चॅलेजिंग होती का?
- हो. ही भूमिका खूप चॅलेजिंग होती. कारण माझ्या व्यक्तिमत्त्वापेक्षा ही खूप वेगळी भूमिका होती. संजय सरांसोबत काम करताना थोडे दडपणदेखील होते. कारण त्यांना त्यांच्या कलाकारांकडून जास्त अपेक्षा असतात. त्यामुळे कोणताही सीन साधा नव्हता. जर कागदावर तो सीन सिंपल असला तरी तो प्रत्यक्षात उतरवताना काही वेगळा बनतो.
या चित्रपटात काम करण्याचा तुझा अनुभव कसा होता?
- आयुष्यात एकदाच चालून येणारी ही संधी होती. परफॉर्मन्स, सीन आणि लूकमध्ये भिन्नता आणू शकतो हे सरांसोबत केलेल्या चर्चांमुळे आणि मार्गदर्शनामुळे मला समजले. माझ्यासाठी हा अनुभव अप्रतिम होता. मग ते चित्रपटाची सुरूवातीची प्रोसेस असो किंवा शूटिंग. कोविडमुळे चित्रपटाची शूटिंग थांबवावी लागली. चित्रपटाचा सेट दोन वर्षे तसाच ठेवावा लागला. त्यामुळे चित्रपटाचे बजेटदेखील वाढले. पण निर्मात्यांनी चित्रपटावरील खर्चांच्या बाबतीत कोणती तडजोड केली नाही. ते अजिबात मागे हटले नाहीत, त्यामुळे त्यांना मानले पाहिजे. त्यांनी विश्वास ठेवला. चित्रपटाला पाठिंबा देत राहिले. त्यामुळे जेव्हा तुम्ही हा चित्रपट पाहाल तेव्हा प्रत्येक फ्रेम पेटिंगप्रमाणे दिसते. त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि पैसाही खर्च करण्यात आला आहे. चांगल्या कलाकृतीला साकार करण्यासाठी खूप परिश्रम घेतले आहेत. कोविडच्या काळातही ते डगमगले नाहीत, हे कौतुकास्पद आहे.