Exclusive: 'रात्रीस खेळ चाले' ते थेट 'सिंघम अगेन'! अभिनेत्री व्हायचं नव्हतं, मग बॉलिवूडपर्यंत कशी पोहोचली भाग्या?
By कोमल खांबे | Published: November 14, 2024 11:51 AM2024-11-14T11:51:16+5:302024-11-14T11:51:54+5:30
'रात्रीस खेळ चाले' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री भाग्या नायर 'सिंघम अगेन'मध्ये झळकली आहे. अगदी छोट्याशा भूमिकेतही भाग्याने तिची छाप सोडली आहे. 'सिंघम अगेन'च्या निमित्ताने भाग्याने लोकमत फिल्मीशी संवाद साधला.
बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'सिंघम अगेन' सिनेमा अखेर दिवाळीच्या मुहुर्तावर प्रदर्शित झाला. या सिनेमातून रोहितने अख्खं बॉलिवूडच मोठ्या पडद्यावर उतरवलं. तर मराठी कलाकारांची फौजही या सिनेमात दिसली. 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री भाग्या नायरदेखील 'सिंघम अगेन'मध्ये झळकली आहे. अगदी छोट्याशा भूमिकेतही भाग्याने तिची छाप सोडली आहे. 'सिंघम अगेन'च्या निमित्ताने भाग्याने 'लोकमत फिल्मी'शी संवाद साधला.
>> कोमल खांबे
सिंघम अगेन सिनेमातील भूमिका तुला कशी मिळाली?
कास्टिंग दिग्दर्शक शंतनु चाके यांनी मला या भूमिकेसाठी विचारलं होतं. सिंघम अगेनमध्ये काम करशील का? असा मेसेज त्यांनी मला केला होता. मी त्यांना भूमिकेबद्दल विचारलं होतं. त्यांनी मला सिंघम अगेनची स्टोरी सांगितली. मला ही भूमिका आवडली होती. मग मी ऑडिशन दिल्यानंतर लगेच मला ही भूमिका मिळाल्याचा कॉल आला. त्यानंतर मी लूक टेस्ट दिली. आणि लगेच सिनेमाच्या शूटिंगसाठी गेले. अगदी ४-५ म्हणजे खूप कमी दिवसांमध्ये हे सगळं घडलं.
रोहित शेट्टीच्या सिनेमात काम करायचं समजल्यानंतर तुझी पहिली रिएक्शन काय होती? गोंधळायला झालेलं किंवा दडपण आलं होतं का ?
मला आठवतंय जेव्हा मला कॉल आला तेव्हा मी रिक्षामध्ये होते. पण, जोपर्यंत मी सीन शूट केला नव्हता तोपर्यंत मला विश्वासच बसत नव्हता. कारण, बऱ्याचदा ऐनवेळी काम हातातून जातं. त्यामुळे सिनेमा थिएटरमध्ये लागेपर्यंत मला विश्वास नव्हता.
दीपिकाबरोबर तू स्क्रीन शेअर केली आहेस. तो अनुभव कसा होता?
खरं तर मला असं वाटलेलं की दीपिकासोबत माझा सीन आहे, पण आम्ही वेगवेगळ्या फ्रेममध्ये उभे राहू. आम्ही दोघी एका फ्रेममध्ये समोरासमोर उभं राहून सीन होईल, असं मला वाटलं नव्हतं. मला अनेकांनी विचारलंदेखील की दीपिका स्वत: समोर उभी होती का? पण, तिच्याबरोबर स्क्रीन शेअर करणं हा वेगळा अनुभव होता. आपण विचार करतो की ही किती मोठी अभिनेत्री आहे. पण, तसं काहीच नसतं. ते पण, आपल्यासारखेच असतात. पहिल्यांदा जेव्हा ती आली तेव्हा ती माझ्याकडे बघून हसली. आम्ही एकमेकींकडे बघून हसलो. त्यानंतर अगदी नॉर्मलपणे तिने सीन केला.
'सिंघम अगेन'च्या सेटवर लक्षात राहणारा एखादा घडलेला किस्सा किंवा प्रसंग.
सेटवरचं वातावरण खूपच छान होतं. मी सेटवर सगळ्यांशी बोलले. मी ज्या मालिका केल्यात त्या सेटवर मला जशी आपुलकी जाणवली. तशीच मला सिंघमच्या सेटवर जाणवली. मला मी बाहेरून आल्याचं वेगळं फिलिंग आलं नाही. मराठी मालिकेच्या सेटवरच आली आहे, असं मला वाटलं.
इतक्या मोठ्या सिनेमात 'सिंघम अगेन'मध्ये काम करायला मिळाल्यावर कुटुंबाची प्रतिक्रिया काय होती?
सर्वात आधी मी याबद्दल आईला सांगितलं होतं. जेव्हा सिंघम अगेनमधले माझे दोन्ही सीन शूट झाले तेव्हा मग मी माझ्या संपूर्ण कुटुंबाला सांगितलं. सगळे खूप खूश होते. मला खूप चांगली कामं मिळावी, अशी कुटुंबीयांची इच्छा असते. ते खूप आतुरतेने वाट बघत असतात. मला वाटतं कदाचित त्यांच्या इच्छाशक्तीमुळेच मला इतकी चांगली कामं मिळत असावीत. मी माझं स्वत:चं काम लवकर बघत नाही. पण, सिंघम अगेन प्रदर्शित झाल्यावर आम्ही १० जण सगळे एकत्र पहिल्यांदा सिनेमा बघायला गेलो.
आता सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षक किंवा चाहत्यांनी दिलेली एखादी लक्षात राहणारी प्रतिक्रिया...
कमाल केलीस, मस्त वाटलं बघून अशा प्रतिक्रिया सगळ्यांच्या होत्या. पण, एक प्रतिक्रिया लक्षात राहण्यासारखी आहे. ती म्हणजे माझ्या मित्राच्या मित्राने मला मेसेज केला होता की तुझा सीन बघून रडायला आलं. मी त्याला म्हटलं की कदाचित मी तुझी मैत्रीण असेल म्हणून तुला तसं वाटलं असेल. तर तो म्हणाला की नाही तुला सीनमध्ये रडताना बघून मला खूप वाईट वाटलं. तेव्हा मग वाटलं की म्हणजे कुठेतरी मी चांगलं काम केलंय.
आऊटसायडर असल्याने इंडस्ट्रीत संधी मिळणं खरंच किती कठीण आहे? मराठी इंडस्ट्रीत गटबाजी (ग्रुपिजम) जाणवते का?
मी आऊटसायडर आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. प्रत्येक वेळेस ते जाणवत नाही. पण, हो काही काही वेळेस हे जाणवतं. आऊटसायडर असल्यामुळे काही गोष्टी ज्या बाकीच्यांना सोप्या पद्धतीने मिळतात त्या मला कठीण पद्धतीने मिळतात. पण, माझ्या आयुष्यात जी माणसं आली त्यांनी मला भाषेपलीकडे एका कलेच्या आणि अभिनेत्रीच्या दृष्टीने बघितलं. पण, सुरुवातीला जेव्हा मी एकांकिका करायचे तेव्हा हिला कशाला घेतलंय, मराठीमध्ये लोक नाहीत का? असं बोलायचे. आपल्या समाजातील लोकांनी पुढे जावं हे प्रत्येकालाच वाटतं, हे स्वाभाविक आहे. तेव्हा माणूस मला वाईट वाटायचं. पण, वाईट वाटून रडत बसणं हा पर्याय नाही. मला अभिनय करायचंय. ज्या भाषेत मिळेल त्या भाषेत काम करायला मला आवडेल.
तू साऊथ इंडियन आहेस, मग मराठीकडे ओढ कशी निर्माण झाली?
मला अभिनयात कधीच रस नव्हता. उपेंद्र लिमये यांची मुलगी माझी मैत्रीण आहे. ती मला कॉलेजमध्ये कल्चरल इव्हेंटला घेऊन गेली होती. मला तेव्हादेखील वाटलं नव्हतं की मला काम मिळेल. तेव्हा युथ फेस्टिव्हलसाठी इंग्लिश एकांकिकेसाठी माझी निवड झाली. तेव्हा मी मराठी स्किट, एकांकिका पाहिल्या. पण, मला मराठी बोलता येत नव्हतं. मी मराठी लिहू आणि वाचू शकत होते. मला मराठीमध्ये एकदा तरी काम करायचं होतं. आणि त्यासाठी मी मित्रांचं ऐकून मराठी बोलायला लागले. अजूनही माझं मराठी तितकं चांगलं नाहीये. पण, मी प्रयत्न करतेय.
साऊथ इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची इच्छा आहे का?
मी अॅमेझॉन प्राइमवर केलेली सीरिज ही मल्याळमध्ये केलेली आहे. मी साऊथ, हिंदी, मराठी तिन्ही भाषांमध्ये काम केलंय. ज्या भाषेत काम मिळेल, ती भाषा शिकून मी काम करेन.