भरकटलेल्या कथेचा अनुभव!
By Admin | Published: October 30, 2015 11:33 PM2015-10-30T23:33:27+5:302015-10-30T23:33:27+5:30
एक दृष्टिहीन मुलगा त्याच्या व्यंगावर मात करून कसा पुढे येतो, ही कथा वास्तविक हृदय हेलावणारी आणि सकारात्मक दृष्टिकोन देणारी ठरू शकते
एक दृष्टिहीन मुलगा त्याच्या व्यंगावर मात करून कसा पुढे येतो, ही कथा वास्तविक हृदय हेलावणारी आणि सकारात्मक दृष्टिकोन देणारी ठरू शकते. ‘ठण ठण गोपाळ’ या चित्रपटाने हा प्लॉट निवडला आहे खरा; पण एक आश्वासक गोष्ट सांगताना ही कथा प्रचंड भरकटलेली आहे. परिणामी, एका चांगल्या विषयाला घातलेला हात रिकामाच राहिल्याची जाणीव हा चित्रपट करून देतो.
गोपाळ हा दृष्टिहीन शाळकरी मुलगा सुट्टीमध्ये त्याच्या मामाच्या, म्हणजे चाळीत वास्तव्यास असणाऱ्या सावत्याच्या घरी राहायला येतो. सोशल वर्क करणारा सावत्या हा तसा छंदीफंदी माणूस असतो. त्याचा रंगेलपणा चाळीत सर्वांना माहीत असतो. गोपाळ इथे राहायला येतो खरा; पण त्याचा जाच सावत्याला होत राहतो. अशातच एक वारली पेंटिंग करणारा तरुण वसंत त्या चाळीत राहायला येतो आणि त्याची गोपाळशी गट्टी जमते. सावत्याच्या रंगढंगाला एव्हाना वैतागलेला गोपाळ घर सोडून निघून जातो. वसंत त्याला शोधून काढतो आणि त्याच्या आदिवासी खेड्यात घेऊन जातो. तिथे तो गोपाळला वारली चित्रकलेचे धडे देतो. अल्पावधीतच गोपाळ त्यात पारंगत होतो आणि त्याची कीर्ती चुहूबाजूला पसरते. ही या चित्रपटाची गोष्ट आहे.
ही गोष्ट तशी कुतूहलजनक वाटत असली, तरी चित्रपटाची पटकथा मात्र पार भरकटलेली आहे. गोपाळचा चाळीतला काळ दाखवण्यात चित्रपटाचा पूर्वार्ध खर्ची पडला आहे आणि मध्यांतरानंतर चित्रपट एकदम आदिवासी पाड्याची सफर घडवून आणतो. या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ काही जुळत नाही. पटकथाकारांनी, तसेच दिग्दर्शक कार्तिक शेट्टी यांनी चित्रपटाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्धाचा योग्य संगम घडवून आणणे गोष्टीच्या एकसंधतेच्या दृष्टीने आवश्यक होते. पण तसे झालेले नाही आणि पुढे तर चित्रपट सरळ वाहावत जातो.
विवेक चाबुकस्वार याने गोपाळची भूमिका त्याच्या आगाऊपणासह ठाकठीक केली आहे. सावत्याच्या भूमिकेत मात्र मिलिंद गुणाजी यांची निवड चुकल्याचे जाणवते. कोणत्याही बाजूने ते सोशल वर्कर वाटत नाहीत आणि त्यांच्या वाट्याला आलेले प्रसंग छाप पाडण्याऐवजी हास्यास्पद होतात. त्यांचे एकंदर व्यक्तिमत्त्व पाहता ते या भूमिकेत फिट्ट बसलेले नाहीत हे स्पष्ट होत राहते.
वारली चित्रकार वसंतच्या भूमिकेत मिलिंद गवळी याने चांगले रंग भरण्याचा प्रयत्न केला आहे. परदेशी पाहुणी अॅनाच्या भूमिकेत सुझेन बर्नेट आहे आणि त्यांनी भूमिकेला एक वेगळा टच दिला आहे. चित्रपटाबाबत बाकी विशेष काही सांगण्यासारखे नाही. एका चांगल्या कथेचा योग्य तो परिणाम साधला न गेल्याचे शल्य मात्र हा चित्रपट देतो.