प्रसिद्ध टीव्ही अभिनेता मिहिर राजदाचं रामायणातील जनक राजासोबत आहे खास नातं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 04:06 PM2021-09-24T16:06:16+5:302021-09-24T16:06:45+5:30
अभिनेता मिहीर राजदा अमराठी असूनही मराठी सिनेइंडस्ट्रीत आपली ओळख बनवली आहे.
माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतून घराघरात पोहचलेला मराठी अभिनेता मिहीर राजदाचे रामायणातील जनक राजा यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यासोबत अगदी जवळचे नाते आहे. अभिनेता मिहीर राजदा अमराठी असूनही मराठी सिनेइंडस्ट्रीत आपली ओळख बनवली आहे. मिहिरने गुजराथी नाटक, हिंदी आणि मराठी मालिकेतून आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. कृष्णा या लोकप्रिय हिंदी मालिकेतील सुदामाची बालपणीची भूमिका मिहीरनेच केली होती.
मिहिरने हमारी देवरानी या हिंदी मालिकेत काम केले आहे.त्यानंतर तो मराठी चित्रपटसृष्टीत वळला. त्याला झी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये आनंदची भूमिका साकारली आहे. मधल्या काळात त्याने स्क्रिप्ट रायटरची भूमिका देखील केली आहे. सध्या तो सोनी मराठीवरील ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत काम करतो आहे.
मिहीर राजदाचे कुटुंबाचा देखील सिनेइंडस्ट्रीशी संबंध आहे. त्याची पत्नी नीलम पांचाळ- राजदा ही गुजराती, हिंदी चित्रपट अभिनेत्री आहे. काबिल, हेल्लारो या चित्रपटात ती झळकली आहे. निलमने देखील मराठी इंडस्ट्रीत काम केले आहे. स्टार प्रवाहवरील ‘वैजू नं १’ या मालिकेत मिहीर आणि नीलम दोघेही पती पत्नीच्याच भूमिकेत झळकले होते. रामायणातील जनक राजा म्हणून प्रसिद्ध असलेले मूलराज राजदा हे प्रसिद्ध अभिनेते, लेखक म्हणून ओळखले जात होते. हिंदी, गुजराती भाषिक अनेक चित्रपट आणि नाटकात त्यांनी काम केले होते. याशिवाय लोकप्रिय रामायण मालिकेत त्यांनी राजा जनकची भूमिका साकारली होती.
नुकतेच मिहिरची पत्नी निलमने सोशल मीडियाच्या माध्यमातून मूलराज राजदा यांना त्यांच्या ९ व्या पुण्यदिनी श्रद्धांजली वाहिली आहे. ‘माझे आजोबा आणि सासरे’ असे कॅप्शन देऊन तिने ही माहिती शेअर केली आहे. मूलराज राजदा यांनी निभावलेले रामायणातील राजा जनक प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहीले आहेत. त्यांनी त्याकाळी साकारलेल्या भूमिका प्रेक्षक आजही विसरलेले नाहीत. आजही त्यांनी केलेल्या त्या भूमिकांचं कौतुक अनेकजण करताना पाहायला मिळतात.
विक्रम वेताळ, महाभारत या मालिकेतून त्यांनी महत्वाच्या भूमिका निभावल्या होत्या. त्यांच्या पत्नी इंदुमती राजदा या देखील अभिनेत्री आहेत. खिचडी , साराभाई व्हर्सेस साराभाई, इन्स्टंट खिचडी , मन या मालिका आणि चित्रपटातून इंदुमती यांनी काम केले होते.