Metoo Movement: तर मीच त्याचा खरा चेहरा जगापुढे आणला असता! साजिदवरच्या आरोपांवर बोलला फरहान अख्तर!!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 02:35 PM2018-11-26T14:35:23+5:302018-11-26T14:35:36+5:30
मी टु मोहिमेअंर्तगत दिग्दर्शक साजिद खानवर अनेक महिलांनी लैंगिक गैरवर्तणुकीचे गंभीर आरोप केलेत. या आरोपांनी सगळ्यांनाच धक्का बसला. साजिदच्या कुटुंबासाठीही हा मोठा धक्का होता.
मीटु मोहिमेअंर्तगत दिग्दर्शक साजिद खानवर अनेक महिलांनी लैंगिक गैरवर्तणुकीचे गंभीर आरोप केलेत. या आरोपांनी सगळ्यांनाच धक्का बसला. साजिदच्या कुटुंबासाठीही हा मोठा धक्का होता. या आरोपानंतर साजिदची बहिण फराह खान व चुलत भाऊ फरहान अख्तर या दोघांनीही त्याच्या पाठीशी उभं राहण्यास नकार दिला. त्याने केले असेल तर त्याला भोगावेच लागेल, असे फराह म्हणाली. आता फरहान अख्तर यानेही साजिदला फटकारले आहे. साजिदबद्दल मला माहित असते तर मीच सर्वप्रथम त्याचा खरा चेहरा जगापुढे आणला असता, असे त्याने म्हटले आहे.
एका ताज्या मुलाखतीत फरहान साजिदबद्दल बोलला. सार्वजनिक जीवनात अशा काही गोष्टी होतात, तेव्हा मी अगदी उघडपणे त्याविरोधात बोलतो. माझ्याच कुटुंबातील एखाद्या सदस्यावर असे आरोप होत असतील तर त्याविरोधात बोलणे ही सुद्धा माझी जबाबदारी आहे. साजिद माझा भाऊ आहे. पण त्याच्या महिलांप्रतीच्या असभ्य वर्तणुकीबद्दल मला अजिबातच कल्पना नव्हती. मला तसूभरही कल्पना असती तर महिलांनी बोलण्याआधी मीच त्याच्याविरोधात आवाज उठवला असता. त्याचा खरा चेहरा जगापुढे आणला असता. पण त्याचा खरा चेहरा माझ्यासमोर आलाच नाही. आज बाहेर पडल्यावर तुझ्या भावबद्दल तुलाच माहिती नव्हते, हे कसं शक्य आहे? असे लोक विचारतात, तेव्हा प्रचंड दु:ख होत, असे फरहान यावेळी म्हणाला. या प्रकरणात केवळ माफी मागून भागणार नाही. अशा प्रकरणात न्यायालय जो निर्णय घेईल, तो मानावाच लागेल. साजिदने चुकीचे काही केले असेल तर त्याला त्याचे परिणाम भोगावेच लागतील, असेही तो म्हणाला.
काही दिवसांपूर्वी साजिद स्वत:ही या आरोपांवर बोलला होता. या आरोपांमुळे माझ्या करिअरचे अतोनात नुकसान झाले आहे, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे माझी बहीण आणि आईलाही यामुळे अतोनात दु:ख झाले आहे. माझ्यावर झालेले आरोप मला मान्य नाहीत. एकच बाजू ऐकून त्यावर कोणतेही मत तयार करू नका, अशी मी तुम्हाला विनंती करतो. यासाठी कोणत्याही प्रकारचे साहाय्य करायला मी तयार आहे, असे साजिदने म्हटले होते.