Death Anniversary : एअर होस्टेसच्या प्रेमात वेडे झाले होते फिरोज खान, पुढे काय झाले ते वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 11:51 AM2020-04-27T11:51:52+5:302020-04-27T11:53:33+5:30
फिरोज खान यांनी 2009 मध्ये आजच्याच दिवशी जगाचा निरोप घेतला होता.
बॉलिवूडमध्ये कधीकाळी ‘काऊबॉय’ नावाने ओळखले जाणारे अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते फिरोज खान आज आपल्यात नाहीत. पण त्यांचे किस्से आजही इंडस्ट्रीत ऐकवले जातात. फिरोज खान यांनी आजच्याच दिवशी जगाचा निरोप घेतला होता. आज त्यांची पुण्यतिथी आहे. 27 एप्रिल 2009 मध्ये त्यांचे निधन झाले होते. प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे फिरोज खान प्रचंड चर्चेत राहिले. त्यांच्या लव्ह अफेअरचे किस्से तर चांगलेच गाजले होते. विवाहित असूनही एका एअर होस्टेसवर ते असे काही भाळले होते, की त्यांनी तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता.
होय 1965 रोजी फिरोज खान यांनी सुंदरीसोबत लग्न केले. हे लव्ह मॅरेज होते. लग्नानंतर पाच वर्षांनी फिरोज व सुंदरी यांची पहिली मुलगी लैलाचा जन्म झाला. त्यानंतर काही वर्षांनी फरदीनचा जन्म झाला.
खरे तर संसार सुखात सुरु होता. पण लग्नानंतर अचानक एअर होस्टेस ज्योतिका त्यांच्या आयुष्यात आली. ज्योतिकाला पाहताच फिरोज तिच्यावर असे काही फिदा झाले की, तिच्यासाठी पत्नी सुंदरीला सोडायलाही ते तयार होते. फिरोज खान विवाहित आहेत, हे माहित असूनही ज्योतिकाही त्यांच्या प्रेमात गुरफटली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. दोघांच्या अफेअरची बातमी सुंदरीच्या कानापर्यंत पोहोचलीच. साहजिकच तिने विरोध केला. पण फिरोज खान कुणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. पत्नीने विरोध करताच फिरोज सुंदरी व मुलांना सोडून ज्योतिकासोबत बेंगळुरुमध्ये लिव्ह इनमध्ये राहायला लागले. एक नाही दोन नाही तर तब्बल दहा वर्षे ते ज्योतिकासोबत राहिले. पण आता ज्योतिकाला या नात्याला नाव हवे होते. फिरोज यांच्याशी लग्न थाटून तिला संसार करायचा होता. त्यामुळे तिने फिरोज यांच्याकडे लग्नासाठी तगादा सुरु केला. पण फिरोज खान लग्नासाठी तयार नव्हते. तिने लग्नासाठी विचारताच फिरोज टाळाटाळ करू लागले. अखेर ज्योतिकाला कळायचे ते कळले आणि तिने फिरोज यांच्यापासून कायमचे नाते तोडण्याचे ठरवले.
एका मुलाखतीत फिरोज यांना ज्योतिकाविषयी विचारण्यात आल्यावर त्यांनी ‘मी तिला ओळखत नाही’, असे उत्तर दिले. त्यांचे हे उत्तर ज्योतिकासाठी धक्कादायक होते. मग काय ज्योतिका फिरोज यांच्यासोबतचे नाते तोडून कायमची लंडनला निघून गेली. ज्योतिका सोडून गेल्यावर फिरोज पुन्हा पत्नीकडे परतले.पण आता या वैवाहिक नात्याला अर्थच उरला नव्हता. पती-पत्नीच्या नात्यातील ओलावा कधीच संपला होता. फिरोज खान कुटुंबाकडे परतले होते. पण कुटुंबासोबतचे त्यांचे नाते कधीच पूर्ववत होऊ शकले नाही.