अखेर उत्तर मिळाले...

By Admin | Published: April 29, 2017 01:15 AM2017-04-29T01:15:42+5:302017-04-29T01:15:42+5:30

‘बाहुबली’प्रमाणे ‘बाहुबली २’ही तितकाच उत्कंठापूर्ण आहे. चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच ‘बाहुबली २’ प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो.

Finally got the answer ... | अखेर उत्तर मिळाले...

अखेर उत्तर मिळाले...

googlenewsNext

‘बाहुबली’प्रमाणे ‘बाहुबली २’ही तितकाच उत्कंठापूर्ण आहे. चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच ‘बाहुबली २’ प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो. बाहुबली या पात्राची शक्ती, दयाळूपणा आणि एकापेक्षा एक अ‍ॅक्शनसीन्स पाहण्यासारखे आहेत. बाहुबली सिंहासनावरच्या राज्याभिषेकाच्या काही दिवसांपूर्वी ही गोष्ट सुरू होते. मध्यांतरापर्यंत चित्रपट पूर्णपणे अ‍ॅक्शनने भरलेला आणि अत्यंत प्रभावी असा आहे. राज्यभिषेकापूर्वी राजमाता शिवगामी बाहुबलीला देशभर फिरून प्रजेची त्यांच्या राजाबद्दल असलेल्या अपेक्षांची माहिती करून घ्यायला सांगते.
त्याच्या भटकंतीच्या काळात तो कुंटल देशात येऊन पोहोचतो. तिकडची शूर राजकुमारी देवसेना बाहुबलीला खूप आवडते, तिला आपलेसे करण्यासाठी बाहुबली एक मतिमंद मुलगा आहे असे नाटक करतो आणि तिच्या राज भवनात राहायला लागतो.
बाहुबलीच्या राज्याभिषेकावर नाराज असलेला त्याचा मोठा भाऊ भल्ला रोज बाहुबलीकडून सिंहासन कसे बळकवता येईल याच प्रयत्नात असतो. त्याला देवसेनेचे चांगलेच निमित्त मिळते. राजमातेला बाहुबली आणि देवसेना यांच्या नात्याबद्दल काहीच कल्पना नसते याचाच फायदा बल्ला घेतो. आपल्या आईला देवसेनेकडे स्वत:साठी लग्नाची मागणी घालायला सांगतो, तू मला सिंहासन नाही दिलेस त्या बदल्यात माझा विवाह या सुंदरीशी करून दे असे वचन तो आईकडून घेतो.
राजकुमारीचे मन जिंकून जेव्हा बाहुबली माहिस्मतीच्या राज्यात परत येतो तेव्हा त्याला कळते की राजमातेने बल्लाचा विवाह देवसेनेशी ठरवला आहे. देवसेनेशी विवाह करायचा असेल तर सिंहासनाला मुकावे लागेल, असे राजमाता बाहुबलीला सांगते. देवसेनेला दिलेल्या शब्दामुळे बाहुबली आपले सिंहासन आणि राज्य सोडून देतो आणि देवसेनेशी लग्न करतो, त्याच्या या निर्णयामुळे राजमाता नाराज होते आणि त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण होतो. याच दुराव्याचा फायदा बल्ला घेतो आणि बाहुबलीला वनवासाला पाठवतो.
आपल्या गर्भवती पत्नीसोबत बाहुबली छोट्याशा गावात राहत असतो तेव्हा बल्ला बाहुबलीला मारण्याचे कटकारस्थान रचतो.
भरभरून अ‍ॅक्शनसीन्स, वेगाने पुढे जाणारी कथा, मनमोहक दृश्ये, भव्य सेट्स... यामुळे आपल्या पहिल्या भागासारखाच लक्षात राहण्यासारखा हा चित्रपट आहे. कथेतील बारीकसारीक धागेदोरे, उत्तम संवाद या सर्वांमुळे ‘बाहुबली २’ हा एक मनोरंजक चित्रपट आहे. थिएटरला जाऊन जरूर पाहा. नाहीतर, कटप्पाने बाहुबलीला का मारले हे कसे तुम्हाला कळणार?
-जान्हवी सामंत

Web Title: Finally got the answer ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.