वेब सीरिज 'तांडव'च्या विरोधात लखनौमध्ये FIR दाखल, लावण्यात आले 'हे' आरोप
By जयदीप दाभोळकर | Published: January 18, 2021 08:43 AM2021-01-18T08:43:47+5:302021-01-18T08:49:30+5:30
यापूर्वी काही ठिकाणी हिंदूंच्या भावना दुखावल्या प्रकरणी करण्यात आली होती तक्रार
हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी अॅमेऑन प्राईमवर प्रदर्शित करण्यात आलेली वेब सीरिज तांडव ही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दरम्यान, अनेकांनी या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आलेल्या एका विशिष्ट भागावर आक्षेप घेतला आहे. हिंदू देवी-देवतांचा अवमान केल्याप्रकरणी काही ठिकाणी तक्रारही दाखल करण्यात आली होती. तसंच भाजप नेते राम कदम यांनीदेखील घाटकोपर पोलीस स्थानकात याविरोधात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, आता उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये 'तांडव'च्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अॅमेझॉन प्राईमच्या भारतातील प्रमुख अपर्णा पुरोहित, वेब सीरिजचे निर्माते, दिग्दर्शक आणि लेखकावर हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
हजरतगंज पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये एका विशिष्ट समुदायाच्या भावना भडकावणं, देशाच्या पंतप्रधानांच्या विरोधात अयोग्य चित्रण करण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे. तसंच या वेब सीरिजचा इंटरनेटच्या माध्यमातून व्यापक प्रचार करण्यात येत आहे आणि त्यामुळे भावना दुखावल्या जात आहेत. यामुळेच एफआयआर दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, हा एफआयआर अॅमेझॉन प्राईम इंडिया हेड अपर्णा पुरोहित, तांडव वेब सीरिजचा दिग्दर्शक अब्बास अली, निर्माते हिमांशू कृष्ण मेबेर आणि लेखक गौरव सोलंकी यांच्याविरोधात दाखल करण्यात आला आहे. 153A, 295, 505 (1)(b), 505(2), 469, 66, 66f, 67 या कलमांतर्गत प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आला. तांडव ही वेब सीरिज प्रकाशित झाल्यानंतर त्यामध्ये असलेल्या काही दृश्यांवरून वाद निर्माण झाला होता. तसंच हिंदूंच्या भावना दुखावल्याचं म्हटलं होतं. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडेही याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर मंत्रालयानंही या कंटेंटबाबत अॅमेझॉन प्राईमला उत्तर देण्यास सांगितलं आहे.