फिटनेस फ्रीक रीना मधुकर! ती म्हणते, 'मनाशी पक्कं केलं की काही अशक्य नसतं'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 05:59 PM2021-11-02T17:59:07+5:302021-11-02T17:59:57+5:30
रीना ही उत्तम अभिनेत्री आहेच पण त्याचबरोबर ती एकदम फिट अँड फाईन अभिनेत्री आहे.
अभिनेत्री रीना मधुकर हिने आतापर्यंत हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या ती झी मराठी वाहिनीवरील 'मन उडू उडू झालं' मालिकेत काम करताना दिसते आहे.. रीना ही उत्तम अभिनेत्री आहेच पण त्याचबरोबर ती एकदम फिट अँड फाईन अभिनेत्री आहे. हेल्थी लाईफस्टाईलसाठी रीना नेमकं काय करते, तिचे वर्कआऊट रुटीन कसे असते, याबद्दल नुकतेच तिने सांगितले आहे.
रीना फिटनेसबद्दल सांगते की, माझ्या मते, आपल्या रोजच्या, दैनंदिन जीवनात जेवढी अन्न, पाणी, झोप या मूलभूत गोष्टींची जेवढी गरज असते तेवढीच गरज फिटनेसची असते. मुळात व्यायाम हा दैनंदिन जीवनशैलीचा, लाईफस्टाईलचा एक भाग आहे. मुळात ते टाईम मॅनेजमेंट असतं. जसं कामाला प्राधान्य दिलं जातं तसंच फिटनेसलाही प्राधान्य दिले जाते. मी व्यायामासाठी, फिटनेससाठी आवर्जुन वेळ काढते. एक अभिनेत्री म्हणून मी असे म्हणेन की माझ्यासाठी फिटनेस हा माझ्या प्रोफेशनचा भाग आहे. शूटिंग दरम्यान जेव्हा केव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी मेकअप रुममध्ये वर्कआऊटसाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करते. मी माझ्या सहकालारांना देखील वर्कआऊट करण्यासाठी प्रेरित केले आहे, ब-याचदा आम्ही सेटवर एकत्र वर्कआऊट केला आहे.
'मनाशी पक्कं केलं की काही अशक्य नसतं'
दररोजचा व्यायाम आणि डाएटच्या रुटीनबद्दल रीना सांगते की, मी सहसा, शक्य तेव्हा घरचंच जेवण जेवते. शूटवर असताना रोज माझा घरचा डब्बा असतो. अगदी होममेड. कमी प्रमाणात पण वारंवार म्हणजे दर एक-दोन तासाने खाणे. जागा कोणती आहे याचा फारसा फरक पडू न देता, जेव्हा-केव्हा वर्कआऊटसाठी वेळ मिळतो तेव्हा शरीरासाठी आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागांसाठी असलेला विशिष्ट असा व्यायाम करणे. असा आहे माझा व्यायाम आणि माझं डाएट रुटिन आणि मुळात वर्कआऊटसाठी जिममध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या मनाशी पक्कं केलं की काही अशक्य नसतं.
मेटॉबॉलिझम चांगले असणे फार महत्त्वाचे
आपल्या शरीराला हेल्थी ठेवण्यासाठी मेटॉबॉलिझम चांगले असणे फार महत्त्वाचे असते आणि सुदैवाने माझे मेटॉबॉलिझम खूप चांगले आहे. मुळात, माझ्या अगदी लहानपणापासूनच मला डान्सची प्रचंड आवड आहे आणि मी डान्सर असल्यामुळे शरीराला एक प्रकारे व्यायामाची सवय झाली. त्यामुळे सणासुदीच्या दिवशी जरा गोड पदार्थ चाखायला, खायला माझी काही हरकत नसते. पण अगोदर म्हटल्याप्रमाणे मला गोड पदार्थांच क्रेव्हिंग होत नाही आणि जर सणासुदीची मिठाई खायची असेल तर मी फक्त त्याची चव चाखण्या इतकंच प्रमाण घेते, असे रीना म्हणाली.
रिना यंदाच्या दिवाळीसाठी जास्त उत्सुक
मागील वर्षीच्या दिवाळीची आठवण सांगताना रिना म्हणाली की, गेल्या वर्षी महामारीमुळे आम्ही सर्वजण घरात अडकलो होतो. कुटुंब आणि मित्रांशी ऑनलाईन जोडले गेलेलो. दिवाळीच्या शुभेच्छा गेल्यावर्षी वरच्युअल होत्या. आनंद होतोय की या वर्षीची दिवाळी ही आनंदाने, उत्साहाने आणि स्वत:ची आणि एकमेकांची सुरक्षा घेऊन साजरी होणार आहे. त्यामुळे या वर्षीच्या दिवाळीसाठी मी जास्त उत्सुक आहे कारण मी नातेवाईक आणि मित्रांना भेटू शकेन आणि दिवाळी एकत्र साजरी करू शकेन.