भद्रकालीची पाच गाजलेली नाटके पुन्हा रंगभूमीवर, निर्माते प्रसाद कांबळी यांनी केली घोषणा
By संजय घावरे | Published: July 27, 2024 10:03 PM2024-07-27T22:03:21+5:302024-07-27T22:06:13+5:30
Marathi Natak News: मराठी रंगभूमी गाजवणारी पाच जुनी नाटके पुन्हा नव्या संचात रसिकांच्या भेटीला येणार आहेत. भद्रकाली प्रोडक्शनच्या ४२ वर्धापन दिनाचे औचित्य साधत निर्माते प्रसाद कांबळी यांनी हि घोषणा केली आहे.
मुंबई - मराठी रंगभूमी गाजवणारी पाच जुनी नाटके पुन्हा नव्या संचात रसिकांच्या भेटीला येणार आहेत. भद्रकाली प्रोडक्शनच्या ४२ वर्धापन दिनाचे औचित्य साधत निर्माते प्रसाद कांबळी यांनी हि घोषणा केली आहे.
२७ जुलै १९८२ रोजी सुंदर तळाशिलकर लिखित आणि रमेश रणदिवे दिग्दर्शित 'चाकरमानी' या भद्रकालीची निर्मिती असलेल्या पहिल्या नाटकाचा प्रयोग रवींद्र नाट्य मंदिरमध्ये सादर झाला होता. ४४व्या वर्धापन दिनी श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात गंगाराम गवाणकर लिखित 'वस्त्रहरण' नाटकाचा नवीन संचातील प्रयोग रंगला. हे औचित्य साधत भद्रकालीच्याच पाच निवडक नाटकांचे प्रत्येकी ५० प्रयोग करण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. यात पांडगो इलो रे बा इलो! (१९८७), रातराणी (१९८८), हलकं फुलकं (१९९८), सुखांशी भांडतो आम्ही! (२०११)आणि समुद्र (२०१५)या नाटकांचा समावेश आहे.
या निमित्ताने 'लोकमत'शी एक्सक्लुझीव्ह बातचित करताना प्रसाद कांबळी म्हणाले की, भद्रकालीचा आजवरचा हा प्रवास रसिक मायबापाच्या आशीर्वादामुळे शक्य होऊ शकला. बाबूजींनी केलेले काम खूप मोठे आहे. मी फक्त त्यांचा वारसा जपण्याचे काम करत आहे. 'पांडगो इलो रे बा इलो!' , 'रातराणी', 'हलकं फुलकं', 'सुखांशी भांडतो आम्ही!', 'समुद्र' हि नाटके पुन्हा रंगभूमीवर आणताना खूप समाधानाची भावना मनात आहे. यापैकी कोणते नाटक पहिले येईल ते इतक्यात सांगता येणार नाही. असे काहीतरी करायला हवे असे माझ्या मनात आले आणि त्याची थेट घोषणा केली आहे. आॅगस्टमध्ये रीतसर पत्रकार परिषद आयोजित करून पुढील गोष्टींची माहिती देण्यात येईल. अद्याप काहीही निश्चित केलेले नाही. लवकरच पुढील गोष्टी ठरवल्या जातील. या निमित्ताने आजच्या रसिकांना भद्रकालीची नाटके पुन्हा पाहण्याची संधी मिळणार असल्याचेही प्रसादने सांगितले.