परदेशी चित्रीकरणाची मराठीलाही भुरळ
By Admin | Published: February 3, 2016 02:35 AM2016-02-03T02:35:03+5:302016-02-03T02:35:03+5:30
त्या गगनभेदी उंच इमारती, शानदार गाड्या, तो समुद्रकिनारा, ते निसर्गाचे सौंदर्य या सर्व सौंदर्याची अजून शान वाढविणारे कलाकार असे काही चित्र मोस्टली बॉलीवूड चित्रपटात पाहायला मिळते
त्या गगनभेदी उंच इमारती, शानदार गाड्या, तो समुद्रकिनारा, ते निसर्गाचे सौंदर्य या सर्व सौंदर्याची अजून शान वाढविणारे कलाकार असे काही चित्र मोस्टली बॉलीवूड चित्रपटात पाहायला मिळते. जसे की, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटात काजोलने केलेली युरोपची ट्रीप, करिश्माने सलमानसोबत मारलेला स्वित्झर्लंडचा फेरफटका हे सर्व चित्र डोळ्यांसमोर उभे राहिलेच असेल. पण त्याबरोबरच आपल्या मराठी चित्रपटातदेखील असे लोकेशन का घेत नाही, असा प्रश्नही नक्कीच सर्वांना पडलाच असेल. पण याच प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी लोकमत सीएनएक्सने घेतलाय अॅब्रॉडमध्ये झालेल्या मराठी चित्रपटांचा आढावा.
२०१४ या वर्षी मराठी इंडस्ट्रीला तर चार चाँद लागले होते. या वर्षात टाइमपास, फँड्री, आजोबा, लय भारी, रेगे, यलो, इश्कवाला लव अशा अनेक चित्रपटांनी स्मरणात राहतील अशा आठवणी दिल्या आहेत. कदाचित याच वर्षापासून मराठी इंडस्ट्री यशाच्या शिखरावर पोहोचत आहे, अशा भावना नक्कीच जाग्या झाल्या असतील. कारण २०१४ या वर्षात तीन चित्रपटांचे शूटिंग अॅब्रॉडमध्ये झाले आहे. त्यापैकी प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या निशिकांत कामत दिग्दर्शित लय भारी या चित्रपटाचे काही भाग दुबईमध्ये शूट झाले आहेत. या चित्रपटात रितेश देशमुख, राधिका आपटे व शरद केळकर मुख्य भूमिकेत होते. तर रेणू देसाई दिग्दर्शित इश्कवाला लव या चित्रपटाचे शूटदेखील आइसलँडच्या बेटावर झाले होते. या चित्रपटात आदिनाथ कोठारे व सुलग्ना पाणीग्रही या कलाकारांचा समावेश होता. तसेच गौरी गाडगीळ हिने महाराष्ट्राच्या घराघरात आपल्या जिद्दीची चुणूक यलो या चित्रपटातून दाखविली. या चित्रपटातील स्वीमिंगचे काही चित्रीकरण बँकॉक येथे झाले. या चित्रपटाने अनेक पुरस्कारदेखील प्राप्त केले. २०१४ नंतर थेट २०१६ एप्रिलमध्ये रिलीज होणाऱ्या चीटर या चित्रपटाचे शूटिंगदेखील मॉरिशसच्या एका प्राचीन हवेलीमध्ये झाले आहे. या चित्रपटाचे ७० टक्के शूटिंग अॅब्रॉडमध्ये झाले आहे. याविषयी पूजा सावंतला विचारले असता, ती म्हणते हा देश छोटा आहे. पण संपूर्ण जग पाहिले असा एक अनुभव मिळाला. तसेच या देशात २० ते २२ दिवस संपूर्ण टीमसोबत एन्जॉयदेखील तितकेच केले आहे. या चित्रपटात वैभव तत्त्ववादी, पूजा सावंत मुख्य भूमिकेत पाहायला मिळतील. या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय फणसेकर यांनी केले आहे.
गेली दोन ते तीन वर्षे मराठी इंडस्ट्रीची ही भरारी पाहता तसेच एक से एक मराठी चित्रपट व त्यांचे यश पाहता, बॉलीवूड कलाकारांना या इंडस्ट्रीमध्ये येण्याचा मोहदेखील आवरला नाही. ही मराठी इंडस्ट्रीच्या यशाची पावतीच म्हणावी लागेल. तसेच अभी तो शुरुवात हुई है, और भी तो बहुत सारे मूव्हीज बाकी है, असा काही अॅटिट्यूडदेखील दाखविला पाहिजे. कारण मराठी चित्रपट बॉलीवूडप्रमाणेच तग धरू लागला आहे. असेच एकसे एक मराठी चित्रपटांचे शूटिंग अॅब्रॉडमध्ये व्हावे, यासाठी मराठी इंडस्ट्रीला शुभेच्छा देऊयात. असो, पण हे सर्व वातावरण पाहता, मराठी चित्रपट श्रीमंत होत आहे हे नक्की.