चार लाखांच्या फर्नेस ऑइलची चोरी, टोळीला घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 10:30 AM2021-11-15T10:30:44+5:302021-11-15T10:31:24+5:30
शिवडी पोलिसांनी टोळीला घेतले ताब्यात
मुंबई : चार लाख किमतीचे १३ हजार लिटर फर्नेस ऑइल चोरी करणाऱ्या टोळीला शिवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी (दि.१२ नोव्हेंबर) शिवडी येथून चोरीच्या फर्नेस ऑईलची टँकरमधून वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार शिवडीच्या गाडीअड्डा येथे पोलिसांनी शनिवारी पहाटे चारच्या सुमारास आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. यावेळी दिलेल्या माहितीनुसार टँकर (एम एच ०४ एच वाय ३५६२) बंदरातून गाडी अड्डा येथे येताना पोलिसांना दिसला. मात्र, या टँकरला थांबवीत असताना हा टँकर न थांबता भरधाव वेगाने निघून गेला.
तसेच या टँकरच्या मागे एक चारचाकी वाहनदेखील भरधाव वेगाने जात असल्याचे पोलिसांना दिसून आले. यावेळी पोलिसांनी पाठलाग करीत या चारचाकी वाहनाला गाडीअड्डा येथे अडविले, तर टँकरला वडाळ्याच्या शांतीनगर येथे अडविले. यावेळी पोलिसांनी टँकर चालकाकडे चौकशी केली असता हे ऑईल एका कंपनीने बीपीसीएल येथून खरेदी केल्याचे सांगितले. तसेच हे ऑइल वाहतुकीसाठी बार्ज मध्ये न देता त्याची छुप्या मार्गाने चोरी करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी पोलिसांना मिळाली.
पोलिसांचा अधिक तपास सुरू
याप्रकरणी पोलिसांनी चालक अब्दुल खान (वय ४१), वाहक पारस गौतम (२७), कुणाल वाघ (३५), नियाझ खान (३३), सिराज खान (३०), बाळकृष्ण वास्कर (३५) यांना ताब्यात घेतले असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.