मैत्रीवर भाष्य करणारा ‘फ्रेंड्स’
By Admin | Published: January 7, 2016 01:54 AM2016-01-07T01:54:14+5:302016-01-07T01:54:14+5:30
मैत्रीवर आधारित अनेक सिनेमे मराठीत येऊन गेलेत. प्रत्येक सिनेमात मैत्रीची वेगवेगळी रूपे बघायला मिळाली. आता आणखी एक-दोन मित्रांची आगळीवेगळी कथा असलेला ‘फ्रेंड्स
मैत्रीवर आधारित अनेक सिनेमे मराठीत येऊन गेलेत. प्रत्येक सिनेमात मैत्रीची वेगवेगळी रूपे बघायला मिळाली. आता आणखी एक-दोन मित्रांची आगळीवेगळी कथा असलेला ‘फ्रेंड्स’ हा सिनेमा येऊ घातला आहे. ज्यात तुम्हाला दोन मित्रांची धमाल-मस्ती, मजा बघायला मिळणार आहे. मराठीतील सुपरस्टार स्वप्निल जोशी आणि सचित पाटील हे दोघे यात मुख्य भूमिकेत आहेत. दोन मोठे स्टार एकत्र बघायला मिळणार, या गोष्टीनेच सध्या या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये जोरदार उत्सुकता बघायला मिळत आहे. हा सिनेमा १५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.
आर. मधेश यांनीच या सिनेमाच्या लेखनाची आणि दिग्दर्शनाची अशी दुहेरी जबाबदारी सांभाळलीये. मित्र हे असं व्यक्तिमत्त्व आहे, जे प्रत्येकाच्याच जीवनात असतं. मैत्री प्रत्येकाला जगण्याचा एक वेगळा अर्थ देते. मैत्रीत भांडणं असतातच, पण त्याहूनही जास्त असतं एकमेकांवरचं प्रेम आणि एकमेकांवरचा विश्वास... त्यामुळेच मैत्रीवर आधारित सिनेमे काढण्याचा सिने इंडस्ट्रीतील निर्मात्यांना मोह आवरता येत नाही. अशाच दोन जीवलग मित्रांची, त्यांच्या मैत्रीची, सुख-दु:खांची कहाणी ‘फ्रेंड्स’मधून रुपेरी पडद्यावर येत आहे. स्वप्निल जोशी आणि सचित पाटील यांच्यासोबत या सिनेमात गौरी नलावडे ही अभिनेत्री बघायला मिळणार आहे. हा सिनेमा रिलीज होण्याआधीच यातील गाणी सुपरहिट ठरली असून, ‘प्रेमिका’ हे स्वप्निल जोशीवर चित्रित गाणं सध्या चांगलंच गाजत आहे. अमित राज, पंकज पडघन आणि नीलेश मोहरीर या तीन दिग्गज संगीतकारांनी संगीत दिलं असून, मंदार चोळकर आणि गुरू ठाकूर यांनी सिनेमाची गीतं लिहिली आहेत. संजय केळापुरे, आर. मधेश, प्रेम व्यास आणि मनिष चंदा यांची निर्मिती असून, कथा आर. मधेश, संवाद शिरीष लाटकर यांनी लिहिले आहेत. साहाय्यक निर्माते शिव राजपुत्रा हे आहेत. सिनेमाचे प्रमोशन पार्टनर्स अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक निशानदार हे आहेत. अॅक्शन, रोमान्स, फ्रेंडशिप, इमोशन असं मनोरंजनाचं कम्प्लिट पॅकेज असलेला हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला असून, येत्या १५ जानेवारीला हा सिनेमा रिलीज होतोय.