प्रमोशनमुळे झाली फ्रेंडशिप
By Admin | Published: August 18, 2016 04:26 AM2016-08-18T04:26:04+5:302016-08-18T04:26:04+5:30
‘हॅपी भाग जायेगी’ या चित्रपटात अभय देवोल, डायना पेंटी आणि अली फजल हे प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने या तिघांनी नुकतीच ‘लोकमत’
‘हॅपी भाग जायेगी’ या चित्रपटात अभय देवोल, डायना पेंटी आणि अली फजल हे प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने या तिघांनी नुकतीच ‘लोकमत’ आॅफिसला भेट दिली. या भेटीदरम्यान ‘हॅपी भाग जायेगी’ या चित्रपटासोबतच प्रादेशिक सिनेमावरही त्यांनी खूप गप्पा मारल्या.
हॅपी भाग जायेगी हा अभय देवोल, डायना पेंटी आणि अली फजल यांचा पहिलाच एकत्रित चित्रपट असला, तरी त्यांना पाहिल्यावर या तिघांची मैत्री खूप जुनी आहे असे वाटते. डायनाची टर उडवण्याची ते दोघेही एकही संधी सोडत नाहीत. यावर डायना सांगते, ‘अली आणि अभय या दोघांमध्ये माझे नेहमीच सँडविच होते. हे दोघे मिळून चित्रीकरणाच्या वेळी मला खूप सतवायचे. आतादेखील कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीवरून माझी टर उडवतच असतात.’ या तिघांच्या मैत्रीविषयी अभय सांगतो, ‘चित्रीकरणापेक्षा प्रमोशनच्या वेळी आमची मैत्री अधिक घट्ट झाली, असे मला वाटते. या चित्रपटाचे चित्रीकरण आम्ही तिघांनी खूपच एन्जॉय केले. तुमच्यात केमिस्ट्री नसेल, तर तुम्ही एकमेकांसोबत चांगला अभिनयही करू शकत नाही, असे मला वाटते. आमच्यात असलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना चित्रपटातही जाणवणार आहे.’
या चित्रपटातील काही दृश्यांचे चित्रीकरण करताना खूपच मजा आली, असे अली सांगतो. अभय हा अलीला खूप पराठे भरवतो, असे एक दृश्य होते. या दृश्याचे चित्रीकरण करताना पराठे खाऊन-खाऊन माझी अवस्था वाईट झाली होती, असे अली सांगतो. या चित्रपटात अभयने क्रिकेटही खेळले आहे. या चित्रपटात तो क्रिकेट खेळताना आपल्याला दिसणार असला, तरी त्याला क्रिकेट हा खेळ अजिबातच आवडत नाही. तो फुटबॉलचा चाहता आहे, असे तो सांगतो.
अभय, अली आणि डायना या तिघांनाही प्रादेशिक चित्रपटांविषयी प्रेम आहे. अली तर ‘सैराट’ आणि ‘फँड्री’ या चित्रपटांचा खूप मोठा फॅन आहे. अली सांगतो, ‘मला मराठी चित्रपट पाहायला खूपच आवडतात. सचिन कुंडलकर हा तर खूपच चांगला दिग्दर्शक असल्याचे माझे मत आहे. त्याचे सगळेच चित्रपट मला आवडतात. त्याच्या चित्रपटांसोबतच मला ‘फँड्री’ हा चित्रपट खूपच आवडतो. ‘सैराट’ हा चित्रपट तर फँड्रीपेक्षाही कित्येकपट सरस आहे. सध्या मराठीत खूप चांगले चित्रपट बनवले जात आहेत.’ अलीच्या या वक्तव्याला दुजोरा देत अभय म्हणाला, ‘‘फँड्री’ हा चित्रपट मलादेखील खूप आवडला, तसेच ‘किल्ला’ हा चित्रपट चांगला आहे. प्रादेशिक चित्रपटांमध्ये इतर भाषांपेक्षा मराठी चित्रपट मी अधिक पाहिले आहेत.’ डायनाने मराठी चित्रपट पाहिले नसले, तरी तिला ‘कोर्ट’ या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. डायना सांगते, ‘कोर्ट या चित्रपटाबाबत मी अनेकांकडून ऐकलेले आहे. हा चित्रपट पाहाण्याची माझी अनेक महिन्यांपासूनची इच्छा आहे.’