भविष्यकाळाचा वेध घेणारा चित्रपट

By Admin | Published: October 10, 2016 03:03 AM2016-10-10T03:03:16+5:302016-10-10T03:03:16+5:30

हॉलीवूड अभिनेता टॉम हँक्स अभिनित ‘इन्फर्नो’ हा चित्रपट भारतामध्ये प्रदर्शित होतो आहे. भविष्यकाळाचा वेध घेणारा प्राध्यापक रॉबर्ट लँगडनची भूमिका टॉमने साकारली आहे.

Future look film | भविष्यकाळाचा वेध घेणारा चित्रपट

भविष्यकाळाचा वेध घेणारा चित्रपट

googlenewsNext

हॉलीवूड अभिनेता टॉम हँक्स अभिनित ‘इन्फर्नो’ हा चित्रपट भारतामध्ये प्रदर्शित होतो आहे. भविष्यकाळाचा वेध घेणारा प्राध्यापक रॉबर्ट लँगडनची भूमिका टॉमने साकारली आहे. टॉमने या चित्रपटादरम्यान आलेला अनुभव, दिग्दर्शक रॉन हॉवर्डसोबत जमलेली केमेस्ट्री याचा ऊहापोह या मुलाखतीत केला आहे. भारतीय दर्शकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल, अशी अपेक्षा तो व्यक्त करतो.

इन्फर्नो चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक रॉन हॉवर्ड यांच्यासोबत तू पाचव्यांदा काम करतो आहेस. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
- गेल्या ३० वर्षांपासून मी आणि रॉन एकत्र काम करीत आहोत. अगदी सुरुवातीला ज्या पद्धतीने आमच्या कामाची पद्धत होती, ती आजही आहे. इतक्या वर्षांत काहीही बदलले नाही, याचा मला आनंद होतो आहे. चित्रपट करण्याचा तेव्हाचा आणि आताचा आमच्या दोघांचाही अ‍ॅप्रोच सारखाच आहे. इन्फर्नो हा आमचा दोघांचा पाचवा चित्रपट. आमच्या सगळ्यांची सुरुवात एकाच ठिकाणाहून झालीय. या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अनुभव खूप छान होता. मी माझ्या कुटुंबीयांशिवाय राहूच शकत नाही. त्यामुळे चित्रीकरणाच्यादरम्यानही मी घरी राहतो आणि मुलांशी खेळतो. त्यामुळे प्रत्येक दिवशी मी काही आव्हानात्मक करतोय, असे मला वाटलेच नाही.

इन्फर्नो ज्या पद्धतीने रेखाटलाय, त्याबद्दल काय सांगशील?
- इन्फर्नो म्हणजे निर्दयी शिकारी नाही, की जो सतत पुढे जातो आहे किंवा ही क्रूर कथादेखील नाही. या पृथ्वीतलावरील बरेचसे लोक ज्या पद्धतीने विचार करतात, अगदी तसाच विचार आम्ही या चित्रपटात मांडला आहे. रॉबर्ट लँगडन यांचे जग प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. हा चित्रपट ब्लॉकबस्टर आहे, ज्यामध्ये आकर्षक व्हिज्युएल इफेक्ट आणि अ‍ॅक्शन सिक्वेन्सेस आहेत. या चित्रपटातील कथा ही लोकांच्यासंदर्भातील आहे आणि त्यामुळे लोक या चित्रपटाला नक्कीच पसंती देतील.

इन्फर्नो हा चित्रपट दा विन्सी कोड आणि अँजल्स अँड डेमॉन्सपेक्षा कसा वेगळा आहे?
- इन्फर्नो आणि इतर सगळ्या चित्रपटांचा ज्या वेळी आपण विचार करतो, त्या वेळी एक गोष्ट लक्षात येते, की हा आपण अनुभवत असलेल्या रोजच्या गोष्टींपैकी आहे. हा चित्रपट भविष्यकाळाचा वेध घेतो.
युरोपमधील ऐतिहासिक ठिकाणी शूटिंग करताना तुझा अनुभव कसा होता?
- इन्फर्नोची शूटिंग काही खास ठिकाणी करण्यात आलीय. याआधीदेखील आम्ही इथल्या काही ठिकाणी शूटिंग केली होती. ही ठिकाणे मला खूप आवडतात. लुवेरेमधील मोनालिसासमोर पहाटे तीन वाजता मी माझे कपडे बदलले. रोममधील पँथेन येथे आम्हाला जाण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे आम्ही बाहेर शूटिंग केले. एकूणच हा अनुभव खूपच वेगळा आणि छान होता.

अशा ठिकाणी शूटिंग करताना तुला काही गोष्टींना सामोरे जावे लागले?
- होय, त्या ठिकाणी जाणेच आवश्यक होते. इटलीमधील फ्लोरेन्समध्ये मी एका दृश्यात धावत असतो, असे दाखवायचे होते. या ठिकाणी खूप पायऱ्या होत्या. अनेक भिंतीवरून आम्हाला उड्या माराव्या लागल्या. त्या ठिकाणी खूप उष्ण वातावरण होते. त्यात मी असे शूज घातले होते, ज्यात टाचांना कोणताही सपोर्ट नव्हता. त्यामुळे मला चालणेदेखील कठीण जात होते. हे सगळे खरेच सोपे नव्हते. खूप अडचणी आल्या. पण तरीही आम्ही सगळ्यांनी खूप मजा केली.

तू साकारत असलेला रॉबर्ट लँगडन आणि तुझ्यात काही साम्य आहे का?
- होय, मला वाटते, की आमच्यात अनेक साम्य आहेत. लँगडनप्रमाणे मलाही वाटते, की वाढती लोकसंख्या ही महत्त्वाची समस्या आहे. त्याला तोंड देणे आवश्यक आहे. मी व्यावहारिक आहे. मी कोणताही निष्कर्ष काढण्याआधी त्याच्या मुळाशी जातो, त्याचा इतिहास तपासतो, समकालीन इतिहासाशी त्याचा संदर्भ पडताळतो. या सगळ्यामुळे लँगडन माझ्यासारखाच असल्यासारखा मला वाटतो.

चांगल्या पुस्तकावर आधारित चित्रपट तितकेसे चांगले नाहीत, असे म्हटले जाते. ज्या भारतीयांनी हे पुस्तक वाचले आहे, त्यांना तू काय सांगशील?
- ज्यांनी इन्फर्नो हे पुस्तक वाचले आहे, त्यांना मी एकच गोष्ट सांगेन, की त्यांना आवडेल अशीच या चित्रपटाची कथा आहे. डेव्हिड कोएप आणि रॉन यांनी यावर खूप काम केले आहे. वाचकांना आणि दर्शकांना यातून नक्कीच नवीन काही मिळेल. ज्यांना याची कथा माहिती नाही, तेदेखील या चित्रपटाचा आनंद लुटू शकतील.

Web Title: Future look film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.