हा खेळ केवळ गतस्मृतींचा !

By Admin | Published: January 30, 2016 02:52 AM2016-01-30T02:52:48+5:302016-01-30T02:52:48+5:30

या चित्रपटाचे शीर्षक तुम्ही अगदी बरोबर वाचले आहे. त्यात कोणतीही चूक नाही. ही पडद्यावरची ‘प्रेम कहाणी’ नसून ‘प्रेम कहानी’च आहे; कारण यात मराठी आणि हिंदी या भाषा केवळ साथ साथ

This game is not only the Gastronomy! | हा खेळ केवळ गतस्मृतींचा !

हा खेळ केवळ गतस्मृतींचा !

googlenewsNext

प्रेम कहानी

या चित्रपटाचे शीर्षक तुम्ही अगदी बरोबर वाचले आहे. त्यात कोणतीही चूक नाही. ही पडद्यावरची ‘प्रेम कहाणी’ नसून ‘प्रेम कहानी’च आहे; कारण यात मराठी आणि हिंदी या भाषा केवळ साथ साथ चाललेल्या नाहीत; तर ही ‘प्रेम कहानी’ चक्क अर्धी मराठी आणि अर्धी हिंदी आहे. थांबा कदाचित यातही काही वेगळेपण वाटले असेल आणि उत्सुकता ताणली गेली असेल; तर मात्र ही ‘कहानी’ पाहण्याआधी चिरपरिचित कथा आणि जुना तोंडवळा अनुभवायची तयारी ठेवावी लागेल.
सोनल या कॉलेज तरुणीच्या बाबतीत काही अनाकलनीय घटना घडत जातात आणि त्यांचे मूळ तिच्या गतस्मृतींत असल्याचे पुढे कळून चुकते. सोनल राजस्थान येथे पिकनिकला जाते आणि तिथे तिच्या या स्मृती अधिकच चाळवल्या जातात. यातून मुळातल्या राजेश्वरीचा आता पुनर्जन्म झाल्याचे हा चित्रपट स्पष्ट करीत जातो. सतीश रणदिवे यांची कथा असलेला आणि त्यांच्याच दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट निव्वळ करमणूक म्हणून ठीक वाटत असला, तरी त्यात नावीन्याचा अभाव जाणवतो. अशाप्रकारच्या कथा यापूर्वी पडद्यावर येऊन गेल्या आहेत आणि या चित्रपटाची मांडणीही जुन्या पठडीतली वाटते. या ‘कहानी’मध्ये म्हटले तर बरेच काही आहे आणि म्हटले तरी यातून काही हाताला लागेलच याची खात्री नाही. सुरुवातीला हा चित्रपट ‘हॉरर’ प्रकारात मोडणारा वाटतो; पण पुढे तो अनपेक्षित अशा वळणावर जाऊन पोहोचतो. मराठीला राजस्थानी तडका, असेही या चित्रपटाचे वर्णन करता येईल. कारण या चित्रपटाची कथा अर्धी मराठी आणि अर्धी राजस्थानी बाजाची आहे. त्यात पुन्हा गतस्मृतीचा धागा यात आणला आहे. मात्र हे सर्व करताना अंधश्रद्धेचा नाहक स्पर्श कथेला केला गेला आहे.
वास्तविक त्याची काही आवश्यकता नव्हती.
चित्रपटाचा पूर्वार्ध पूर्णपणे मराठी भाषेत आणि उत्तरार्ध पूर्णपणे हिंदी भाषेत आहे. त्यामुळे याला मराठी चित्रपट तरी का म्हणावे, असा प्रश्न पडतो. चित्रपटाचा शेवट तर सरळ सरळ गुंडाळला आहे. मग या चित्रपटात आहे तरी काय, असा प्रश्न पडला असेल तर ते म्हणजे राजस्थानचे विहंगम दर्शन ! तसेच प्रवीण कुवर यांचे संगीतही चांगले वाजले आहे आणि या चित्रपटातला हा सुखद धक्का आहे. काजल शर्मा (सोनल व राजेश्वरी) आणि फैजल खान (बैजू) अशी जोडी या चित्रपटातून जमली आहे. काजलकडून भविष्यात थोड्या अपेक्षा ठेवता येतील, मात्र फैजल खानचा यात प्रभाव पडलेला नाही. उदय टिकेकर, किशोरी शहाणे-वीज, मिलिंद गुणाजी, निशिगंधा वाड, विलास उजवणे, समीरा गुर्जर आदी कलावंतांनी यात ‘भूमिका’ केल्या आहेत, एवढेच या मंडळींबाबत म्हणता येईल. एखादा हॉरर चित्रपट पाहण्याची इच्छा असल्यास या ‘कहानी’च्या मागे जायला
हरकत नाही; परंतु त्यातून ही इच्छा किती टक्के पूर्ण होईल, हे मात्र सांगता येणार नाही.

Web Title: This game is not only the Gastronomy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.