“वडील गेल्यानंतर त्या १३ दिवसांत...”, रवींद्र महाजनींबद्दलच्या चाहत्याच्या प्रश्नाला गश्मीरचं सडेतोड उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 11:37 AM2023-07-31T11:37:35+5:302023-07-31T11:38:41+5:30
“वडिलांना काही सांगायचं राहून गेलं का?” चाहत्याच्या प्रश्नाला गश्मीरने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला...
अभिनेता गश्मीर महाजनीचे वडील आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते रवींद्र महाजनी यांचं १४ जुलै रोजी निधन झालं. तळेगाव येथे त्यांचा मृतदेह बंद खोलीत आढळला होता. रवींद्र महाजनी त्यांच्या कुटुंबीयांपासून दूर एकटेच राहत होते. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी गश्मीर व त्याच्या कुटुंबीयांना ट्रोल केलं होतं. वडिलांच्या निधनानंतर गश्मीरने पहिल्यांदाच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला.
गश्मीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन #askme सेशन घेतलं होतं. यामध्ये त्याने चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली. यामध्ये गश्मीरला त्याच्या वडिलांबाबतही काही प्रश्न विचारण्यात आले होते. एका चाहत्याने “तुझ्या वडिलांना तुला काही सांगायचं आहे का?” असा प्रश्न विचारला होता. चाहत्याच्या या प्रश्नाला गश्मीरने सडेतोड शब्दांत उत्तर दिलं आहे. “वडील गेल्यानंतर त्या १३ दिवसांच्या विधीच्या काळात त्यांना जे काही सांगायचं होतं ते मी सांगितलं आहे. तुम्हाला त्याबाबत जाणून घेण्याची गरज नाही,” असं उत्तर गश्मीरने दिलं आहे.
‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ पाहून संजय जाधव भारावले, म्हणाले, “करण जोहर तुमच्याकडून...”
“गश्मीरने माझ्या ‘देवता’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये...”, रवींद्र महाजनी यांनी व्यक्त केलेली इच्छा
रवींद्र महाजनी यांनी ७० ते ९०च्या दशकातील काळ गाजवला. या काळात त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमे मराठी चित्रपटसृष्टीला दिले. ‘जाणता राजा’ या नाटकातून त्यांनी अभिनयातील कारकीर्दीला सुरुवात केली होती. १९७४ साली त्यांनी ‘झुंज’ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं. ‘आराम हराम है’, ‘लक्ष्मी’, ‘लक्ष्मीची पावलं’, ‘देवता’, ‘गोंधळात गोंधळ’ हे त्यांचे गाजलेले सिनेमे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत गश्मीरनेही अभिनय क्षेत्रात ठसा उमटवला. रवींद्र महाजनी आणि गश्मीरने अनेक चित्रपटांत एकत्र काम केलं होतं.