"कार्डियक अरेस्टने त्यांचा मृत्यू झाला", रवींद्र महाजनींच्या मृत्यूबाबत गश्मीरचा खुलासा, म्हणाला, “निधनापूर्वी आठ दिवस...”
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 07:18 PM2023-08-29T19:18:54+5:302023-08-29T19:19:30+5:30
एका मुलाखतीत गश्मीरने वडील रवींद्र महाजनी यांच्याबाबत अनेक खुलासे केले. या मुलाखतीत त्याने वडिलांच्या मृत्यूमागचं कारणंही सांगितलं.
ज्येष्ठ अभिनेता रवींद्र महाजनी यांचं १५ जुलैला निधन झालं. त्यांच्या निधनानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते. महाजनींच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना आणि मुलगा गश्मीरलाही प्रचंड ट्रोलिंगला सामोरं जावं लगालं होतं. गश्मीरने याबाबत सोशल मीडिया आणि मुलाखतीतून अनेकदा ट्रोलर्सला उत्तरही दिलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गश्मीरने वडील रवींद्र महाजनी यांच्याबाबत अनेक खुलासे केले. या मुलाखतीत त्याने वडिलांच्या मृत्यूमागचं कारणंही सांगितलं.
गश्मीरने सौमित्र पोटेच्या ‘मित्र म्हणे’ पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्याने महाजनी कुटुंबीय आणि रवींद्र महाजनी यांच्याबाबत भाष्य केलं. रवींद्र महाजनी यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचा मृतदेह बंद खोलीत आढळला होता. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबच अस्पष्टता होती. गश्मीरने या मुलाखतीत वडिलांच्या मृत्यूमागचं नेमकं कारण सांगितलं. तो म्हणाला, “त्यांना कार्डियक अरेस्ट आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तुमच्या समोर असते तरीही ते क्षणात गेले असते, असं डॉक्टरांनी मला सांगितलं. यातना विरहित मरण यावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. त्यांनाही तसंच मरण आलं. गेल्या २० वर्षांपासून ते एकटेच राहत होते. त्यांनी तसं जगणं पसंत केलं होतं, स्वीकारलं होतं.”
“त्यांना आमच्याबरोबर राहावसं वाटायचं तेव्हा ते यायचे. आणि नंतर ते निघूनही जायचे. ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होते. त्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने त्यांचं आयुष्य जगायचे. त्यांच्या घरी काम करणारी माणसंही नव्हती. त्यांना स्वत:ची कामं स्वत:ला करायला आवडायची. स्वत:चं जेवणही ते बनवायचे. त्यांना केअर टेकर करणारी माणसं घरी ठेवायला आवडायची नाहीत. मृत्यूपूर्वी एक आठवडा आधीपर्यंत ते जीमला जात होते. त्याचं छान जगणं सुरू होतं,” असंही पुढे गश्मीर म्हणाला.
गश्मीर आणि रवींद्र महाजनी यांनी एकत्र अनेक सिनेमांमध्ये काम केलं होतं. ‘देवता’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये गश्मीरने काम करण्याची इच्छा रवींद्र महाजनींनी व्यक्त केली होती.