"हे सगळं वाचून माझा आत्मा हादरला"; कोलकाता प्रकरणावर जिनिलिया देशमुखची संतप्त प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 08:42 PM2024-08-15T20:42:06+5:302024-08-15T20:45:15+5:30
कोलकाता येथील सरकारी आरजी कार हॉस्पिटलमध्ये ३१ वर्षीय डॉक्टरवर बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याने देशभरात संपाताची लाट उसळली आहे.
Kolkata Doctor Rapr Murder Case : पश्चिम बंगालच्या कोलकातामध्ये आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने देशभर खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ देशभरातील निवासी डॉक्टरांसह सामान्य जनताही रस्त्यावर उतरली आहे. पश्चिम बंगालमध्ये या घटनेमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेकांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केलीय. दुसरीकडे सेलिब्रिटीही या प्रकरणावर व्यक्त झाले आहे. अभिनेत्री जिनिलीया देशमुखनेही या प्रकरणावर भाष्य केलं आहे.
९ ऑगस्ट रोजी कोलकाता येथील सरकारी आरजी कार हॉस्पिटलमध्ये ३१ वर्षीय पोस्ट ग्रॅज्युएट प्रशिक्षणार्थी डॉक्टर मृतावस्थेत आढळून आली होती. या प्रकरणी १० ऑगस्ट रोजी एका डॉक्टरला अटक करण्यात आली. त्यानंतर कोलकाता उच्च न्यायालयानं डॉक्टरची हत्या आणि बलात्कार प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला. शवविच्छेदन अहवालातून डॉक्टरवर सामूहिक बलात्कार झाल्याचे म्हटलं जात आहे. अभिनेत्री जिनिलीयाने या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असे म्हटलं आहे.
"राक्षसांना फाशी झालीच पाहिजे !!! पीडितेला काय सहन करावे लागले हे वाचून माझा आत्मा हादरला. सेमिनार हॉलमध्ये ड्युटीवर असलेल्या एका जीव वाचवणाऱ्या महिलेला या भीषणतेचा सामना करावा लागला. मी कल्पना देखील करू शकत नाही की ते या शोकांतिकेचा कसा सामना करत आहेत. माझ्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे जेव्हा आपल्या देशातील महिलांना खऱ्या अर्थाने सुरक्षित वाटू शकेल, असे जिनिलीया देशमुखने म्हटलं आहे.
दुसरीकडे, आलिया भट्ट, आयुष्मान खुराना, रिचा चढ्ढा, परिणीती चोप्रा आणि सोनाक्षी सिन्हा, करिना कपून यांच्यासह इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
Monsters need to be hanged!!!
— Genelia Deshmukh (@geneliad) August 15, 2024
Just reading what #Moumita_Debnath went through sent chills up my spine. A woman, a lifesaver who was on duty faced this horror in the seminar hall. My heart goes out to the family and her loved ones - can’t even imagine how they are facing this… pic.twitter.com/DW0wVGrw26
आलिया भट्टने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.'आणखी एक क्रूर बलात्कार. आणखी एक दिवस जेव्हा आम्हाला जाणवले की महिला कुठेही सुरक्षित नाहीत. आणखी एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना आपल्याला आठवते की एक दशकाहून अधिक काळ झाला पण आजही काहीही बदललेले नाही, असे आलियाने म्हटलं आहे.
अभिनेत्री परिणीती चोप्रानेही एक पोस्ट शेअर केली आहे. "या बलात्कार प्रकरणाची बातमी वाचून तुम्हाला इतका त्रास होत असेल, तेव्हा त्या महिला डॉक्टरला किती त्रास झाला असेल याची कल्पना करा. हे अत्यंत घृणास्पद आहे. आरोपीला फाशी मिळायला हवी, असे परिणीतीने म्हटलं आहे.
बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूरनेही यावर भाष्य केलं. १२ वर्षे, तीच कहाणी, तोच निषेध पण आम्ही अजूनही बदलाची वाट पाहत आहोत, असे करिनाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.