"ते आता बाळूमामा नाहीत" सुरू होताच मालिका ट्रोल, 'तो' सीन पाहून नेटकऱ्यांना आठवला अनिल कपूरचा 'नायक' सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 02:58 PM2024-03-19T14:58:36+5:302024-03-19T15:03:02+5:30
'घरोघरी मातीच्या चुली' मालिका पहिल्याच दिवशी ट्रोल, नेटकरी म्हणाले, "अनिल कपूरच्या नायक चित्रपटाचा छोटा व्हर्जन"
छोट्या पडद्यावरील मालिका म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची चंगळच. अलिकडेच दोन नव्या मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. यातील एक म्हणजे 'घरोघरी मातीच्या चुली'. एका एकत्र राहणाऱ्या प्रेमळ कुटुंबाची कहाणी या मालिकेतून दाखविण्यात येणार आहे. रेश्मा शिंदे आणि सुमित पुसावळे मुख्य भूमिकेत असलेल्या या मालिकेबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. पण, सुरू होताच पहिल्याच दिवशी या मालिकेला ट्रोल करण्यात आलं आहे.
'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत 'बाळूमामा' फेम अभिनेता सुमित पुसावळे हृषीकेश रणदिवे हे पात्र साकारत आहे. एका गावकऱ्याला वाचवण्यासाठी हृषिकेश चिखलात उडी घेत स्वत:च्या प्राणांची बाजी लावत त्याचे प्राण वाचवतो. त्यानंतर त्याच्यावर गावकरी दुधाने अभिषेक करतात, असा सीन मालिकेत दाखविण्यात आला होता. पण, या सीनमुळे मालिकेला ट्रोल करण्यात आलं आहे. मालिकेतील हा सीन पाहून नेटकऱ्यांना अनिल कपूरच्या नायक सिनेमाची आठवण झाली आहे.
स्टार प्रवाहच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम पेजवरुन 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेतील या सीनचा प्रोमो व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी मालिकेला ट्रोल केलं आहे. "नायक ह्या हिंदी चित्रपटात सेम असाच सीन आहे", "अनिल कपूरच्या नायक चित्रपटाचा छोटा व्हर्जन" अशा कमेंट केल्या आहेत. तर काहींनी "अरे बाळूमामा नाही आहेत ते आता", "अरे त्यांचा बाळुमामांंचा रोल संपला आहे आता", असं म्हटलं आहे.
'घरोघरी मातीच्या चुली' मालिका सोमवार(१८ मार्च) पासून संध्याकाळी ७.३० वाजता स्टार प्रवाहवर सुरू करण्यात आली. या मालिकेत रेश्मा शिंदे आणि सुमित पुसावळेबरोबर उदय नेने, सविता प्रभुणे, आशुतोष पत्की यांच्या मुख्य भूमिका आहेत.