Girish Karnad: नाटक ते सिनेमा असा गिरीश कर्नाडांचा रुपेरी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 10:34 AM2019-06-10T10:34:42+5:302019-06-10T10:35:01+5:30

कर्नाड यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीतही शोककळा पसरली आहे. 

Girish Karnad: Noted actor, writer and playwright Girish Karnad passed away in Bengaluru | Girish Karnad: नाटक ते सिनेमा असा गिरीश कर्नाडांचा रुपेरी प्रवास

Girish Karnad: नाटक ते सिनेमा असा गिरीश कर्नाडांचा रुपेरी प्रवास

googlenewsNext

बंगळुरूः ज्येष्ठ लेखक, अभिनेते गिरीश कर्नाड यांची प्राणज्योत मालवली. कर्नाड यांच्या निधनानं हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. कर्नाड यांनी बऱ्याच कन्नड आणि हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांचे तब्बलियू नीनादे मगने व ओंदनोंदू कालादल्ली ही काही प्रसिद्ध कन्नड चित्रपट आणि उत्सव आणि गोधुली हे हिंदी चित्रपट आहेत. गिरीश कर्नाड यांचा कानुरू हेग्गदिती हा, कुवेंपू यांच्या कादंबरीवर आधारित कन्नड चित्रपटही नावाजला गेला. कर्नाड यांची 1961नंतर ययाती, तुघलक अग्नी और बरखा, नागमंडल, अंजू मल्लिगे अशी अनेक नाटके गाजली. ‘संस्कार’ या कन्नड चित्रपटापासून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीस सुरुवात झाली.

कर्नाड यांनी दिग्दर्शित केलेला ‘उत्सव’ आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. हिंदी, मल्याळम, तेलुगू, तमीळ, मराठी अशा 70 हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. 1982मध्ये जब्बार पटेल दिग्दर्शित ‘उंबरठा’ चित्रपटामध्ये अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या पतीची त्यांनी केलेली भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली. सलमान खानच्या 'टायगर जिंदा है' या चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली होती. गिरीश कर्नाड यांनी आपल्या नाटकात पौराणिक, ऐतिहासिक व्यक्तिरेखांच्या माध्यमातून आधुनिक आशय व्यक्त केला. सोशिकता ही नाटकांतील स्त्री व्यक्तिरेखांची परंपरा त्यांनी मोडली. त्यांच्या नाटकांतील स्त्री व्यक्तिरेखा डिमांडिंग असे. कर्नाड यांनी आपल्या नाटकात केलेली पारंपरिक मांडणी, आशय यांची पुनर्मांडणी अद्भुत आहे. कन्नड आणि इंग्रजी भाषेत लिखाण केले असूनही त्यांनी नेहमी स्वत:ला मराठी संस्कृतीशी जोडून ठेवले.

गिरीश कर्नाड यांनी ’आडाडता आयुष्य’ (खेळता खेळता आयुष्य) या नावाने कानडी भाषेत आत्मचरित्र लिहिले आहे. त्याचे उमा कुलकर्णी यांनी, ’घडले कसे’ या नावाने मराठीत भाषांतर केले आहे. त्यातले कथानक आई-वडिलांचा वादग्रस्त विवाह, या घटनेपासून सुरू होऊन स्वत:च्या लग्नापाशी थांबते. गिरीश कर्नाड यांना भारत सरकारने पद्मभूषण, पद्मश्री व ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरव केला आहे. गिरीश कर्नाड यांनी 1974-75 मध्ये पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेचे संचालकपद भूषिवले आहे. गिरीश कर्नाड हे 1976-78मध्ये कर्नाटक साहित्य अकादमीचे अध्यक्ष होते आणि 1988-93मध्ये नाटक अकादमीचे सभापती होते. त्यांना त्यांच्या नाट्यक्षेत्रातील योगदानासाठी कर्नाटक विद्यापीठाने डॉक्टरेटने आणि युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाने डी. लिट. या पदवीने सन्मानित केले आहे.

गिरीश कर्नाड यांना कालिदास सन्मान पुरस्कार, तन्वीर सन्मान पुरस्कार, नागमंडलसाठी कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार, भूमिका चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी राष्ट्रीय पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चित्रपट कनक पुरंदरसाठी सुवर्ण कमल, ’वंशवृक्ष’साठी उत्तम दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार, ’संस्कार’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रपती सुवर्ण पदक, संगीत नाटक अकादमीचा नाट्यलेखनासाठी पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, होमी भाभा फेलोशिप असे अनेक सन्मान व पुरस्कार मिळाले आहेत. ‘युनेस्को’तर्फे जागतिक रंगभूमीच्या राजदूत म्हणून गिरीश कर्नाड यांची निवड झाली होती.

Web Title: Girish Karnad: Noted actor, writer and playwright Girish Karnad passed away in Bengaluru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.