‘रिंग वाँडरिंग’ चित्रपटाला सुवर्ण मयूर सन्मान, जितेंद्र जोशीला अभिनयाचा रौप्य मयूर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 08:17 AM2021-11-29T08:17:43+5:302021-11-29T08:18:21+5:30
52nd International Film Festival of India: गोव्यात सुरू असलेल्या ५२ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा रविवारी थाटात समारोप झाला. जपानी चित्रपट ‘रिंग वॉंडरिंग’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सुवर्ण मयूर सन्मान जाहीर झाला.
पणजी : गोव्यात सुरू असलेल्या ५२ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा रविवारी थाटात समारोप झाला. जपानी चित्रपट ‘रिंग वॉंडरिंग’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सुवर्ण मयूर सन्मान जाहीर झाला. ४० लाख व प्रशस्तीपत्र असे याचे स्वरुप आहे. तर मराठी अभिनेते जितेंद्र जोशी यांना ‘गोदावरी’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून रौप्य मयूर सन्मान प्रदान करण्यात आला.
झेक प्रजासत्ताकचे वाक्लाव काद्रांका यांना ‘सेव्हिंग वन हू इज डेड’ या चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून सन्मानित केले. सोहळ्याला केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेता मनोज वाजपेयी, रणधीर कपूर, प्रसून जोशी, केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई, 'इफ्फी'चे संचालक चैतन्य प्रसाद उपस्थित होते.
जगभरातील गाजलेल्या चित्रपटांचा गौरव
- रशियन दिग्दर्शक रोमन वास्यानोव्ह यांच्या 'द डॉर्म'ला देशातील गुंतागुंत व भ्रष्ट समाजाच्या कथनासाठी विशेष ज्युरी उल्लेखनीय चित्रपट म्हणून गौरव.
- धर्म आणि वसाहत वादावर प्रकाश टाकणारा दिग्दर्शक मारी
- अलेसेंद्रिनीचा ‘झाहोरी’हा इफ्फीतील सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट ठरला.
- पदार्पणातील दिग्दर्शनासाठी सायमन फॅरिओलच्या 'द वेल्थ ऑफ द वर्ल्ड' या स्पॅनिश चित्रपटाला स्पर्धा श्रेणीत विशेष उल्लेखनीय चित्रपट पुरस्कार
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार
- स्पॅनिश अभिनेत्री अँजेला मोलिना
विशेष ज्युरी पुरस्कार
- मराठी दिग्दर्शक निखिल महाजन (चित्रपट - गोदावरी)
- ब्राझिलियन अभिनेत्री रेनाटा कार्व्हालो (चित्रपट - द फर्स्ट फॉलन)