चांगल्या विषयाची ढोबळ मांडणी

By Admin | Published: September 19, 2015 01:35 AM2015-09-19T01:35:09+5:302015-09-19T01:35:09+5:30

अन्यायाविरुद्ध एखादी स्त्री पेटून उठली की ती रणचंडिकेचे रूप धारण करते, या एका वाक्यात ‘एकच फाइट’ या चित्रपटाचे सार सामावले आहे. स्त्रियांवर होणारा अन्याय किंवा शोषण,

Good grid layout | चांगल्या विषयाची ढोबळ मांडणी

चांगल्या विषयाची ढोबळ मांडणी

googlenewsNext

- राज चिंचणकर

‘एकच फाइट’ (मराठी चित्रपट)

अन्यायाविरुद्ध एखादी स्त्री पेटून उठली की ती रणचंडिकेचे रूप धारण करते, या एका वाक्यात ‘एकच फाइट’ या चित्रपटाचे सार सामावले आहे. स्त्रियांवर होणारा अन्याय किंवा शोषण, हा एक व्यक्ती म्हणून तसेच सामाजिकदृष्ट्या गंभीर असा विषय आहे आणि या चित्रपटाद्वारे महत्त्वाच्या अशा या मुद्द्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वास्तविक या चित्रपटाची कथा चांगली असली, तरी मांडणीत मात्र ती ठोसपणे न उतरल्याने चित्रपट ढोबळ स्वरूपाचा झाला आहे.
भवानी नावाच्या कॉलेज तरुणीचा प्रवास या चित्रपटात रेखाटला आहे. बालपणापासूनच अन्याय सहन न करण्याची वृत्ती भवानीच्या मनात रुजलेली आहे. भवानी मोठी झाल्यावर तिच्यातली ही वृत्ती केवळ व्यक्ती म्हणूनच नव्हे; तर सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून व्यक्त होत राहते. तिच्या कॉलेजमधल्या मुलींची छेडछाड करणाऱ्या अजयच्या विरोधात ती उभी ठाकते. गावातला राजकीय नेता सूर्याजी सरकार यांचा अजय हा मुलगा असतो. साहजिकच हे प्रकरण पुढे फारच पेटते. भवानी तिच्या मैत्रिणींच्या साथीने एक संघटना स्थापन करते. थोड्याच अवधीतच तिची संघटना जोर धरते आणि भवानी समाजप्रिय व्यक्ती बनते. पण त्यामुळे सूर्याजी अधिकच खवळतो आणि भवानी विरुद्ध सूर्याजी असा थेट संघर्ष निर्माण होतो.
कथेत तसे नावीन्य नसले तरी विषयाच्या अनुषंगाने कथा महत्त्वाची ठरते. महेश बनसोडे यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून, त्यांनीच दिग्दर्शनही केले आहे. चित्रपटात अन्यायाविरुद्ध लढणारी कॉलेज तरुणी अशाप्रकारची ‘फाइट’ देते, हे यातले नावीन्य आहे. चित्रपटाचे कथालेखन चांगले असले, तरी सादरीकरण मात्र प्राथमिक अवस्थेतले आहे. परिणामी, चित्रपट ढोबळपणाची वाट चालू लागतो. काहीतरी वेगळे करण्याच्या अट्टहासाच्या आहारी जात केलेले कॅमेरावर्क आणि पार्श्वसंगीत चित्रपटाला आवश्यक तेवढ्या उंचीवर नेत नाही. एका तरुणीचा कॉलेजपासून सुरू झालेला लढा किंवा प्रवास थेट मुख्यमंत्रिपदापर्यंत जाऊन पोहोचतो, एवढा या कथेचा आवका आहे; परंतु तो चित्रपटाला पेलवलेला नाही. साहजिकच त्यामुळे चित्रपटाची मदार राहते ती त्यातल्या कलावंतांवर आणि त्यात लक्ष वेधून घेतात ते सूर्याजी सरकार साकारणारे सतीश तारे व भवानीची भूमिका रंगवणारी प्रज्ञा यादव! चित्रपटाची नायिका नव्हे, तर नायकच म्हणावी लागेल अशी भूमिका प्रज्ञा यादवच्या वाट्याला आलेली आहे आणि तिने ती प्रामाणिकपणे रंगवली आहे. मात्र तिला पटकथा व इतर तांत्रिक बाबींची योग्य साथ न मिळाल्याने ती दोन पावले मागे पडली आहे. सतीश तारेंनी त्यांच्या अनुभवाच्या जोरावर जोरकस फलंदाजी केली आहे. पण त्यांच्या व्यक्तिरेखेला फारसे कंगोरे नसल्याने त्यांचा हा खलनायक हवा तितका ठसत नाही. जयवंत भालेकर आणि इतर कलाकारांची साथ ठीक आहे. या चित्रपटाचा साधा, सरळ विषय तितक्याच गांभीर्याने आणि प्रभावीपणे सादर केला गेला असता तर एक महत्त्वाचा सामाजिक प्रश्न ठोसपणे मांडण्याचे श्रेय या चित्रपटाला गेले असते.

Web Title: Good grid layout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.