‘आशय चांगला, तरच कथा यशस्वी होते’

By Admin | Published: September 17, 2016 01:40 AM2016-09-17T01:40:59+5:302016-09-17T01:40:59+5:30

‘लय भारी’फेम अभिनेता रितेश देशमुखने गणपतीनिमित्त पुणे लोकमत आॅफिसला भेट दिली. या वेळी त्याने ‘बॅन्जो’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकेबद्दल टीमशी संवाद साधला.

'Good intent, only if the story is successful' | ‘आशय चांगला, तरच कथा यशस्वी होते’

‘आशय चांगला, तरच कथा यशस्वी होते’

googlenewsNext

‘लय भारी’फेम अभिनेता रितेश देशमुखने गणपतीनिमित्त पुणे लोकमत आॅफिसला भेट दिली. या वेळी त्याने ‘बॅन्जो’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकेबद्दल टीमशी संवाद साधला. या वेळी त्याचा चर्चेत असलेला रॉकस्टार लूक आणि बॉलीवूड बॉक्स आॅफिसचे गणित या सर्वच विषयांवर त्याने मनमोकळ्या गप्पा मारल्या. रितेश देशमुखशी साधलेला हा दिलखुलास संवाद खास तुमच्यासाठी.


‘बॅन्जो’ चित्रपटासाठी तुझ्या लूकमध्ये तू बदल केला आहेस, या चित्रपटासाठी तू खूपच उत्सुक दिसतो. याचे काही खास कारण आहे का?
- ‘बॅन्जो’ हा सिनेमा माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. या चित्रपटातील माझी भूमिका वेगळी असल्याने मला या भूमिकेचा अभ्यास करावा लागला. शिवाय आपण जे करतो ते प्रेक्षकांना आवडायलाही हवे. हा चित्रपट करताना माझी तारेवरची कसरत झाली. ‘बॅन्जो’ आणि ‘हाऊसफुल’ या चित्रपटाचे चित्रीकरण एकत्र सुरू होते. मग मी ‘हाऊसफुल’ चित्रपटाचे चित्रीकरण आधी पूर्ण करून घेतले आणि त्यानंतर ‘बॅन्जो’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केलं. हे खरंय की सिनेमा प्रमाणेच माझ्या लूकचीही बरीच चर्चा होतेय. भूमिकेला साजेसा लूक मी केलाय.

चित्रपटातील तुझी एंट्री फारच धमाकेदार आहे, अशी चर्चा आहे, त्याबद्दल काय सांगशील?
- चित्रपटाची कथा ऐकताना त्यात तीन मुद्दे खूप महत्त्वाचे असतात. शेवट, मध्यांतर आणि हिरोची एंट्री. या चित्रपटात माझी एंट्री गटारातून आहे. मला वाटलं होते हे दृश्य चित्रित करताना गटाराचा सेट तयार करण्यात येईल. पण रवी जाधवला अशी दृश्य खरीखुरी चित्रित करायला आवडतात. त्यांने खरी गटारे शोधली आणि त्यातून मला एंट्री करायला लावली. माझी ही एंट्री प्रेक्षकांच्या नक्कीच लक्षात राहील असा मला विश्वास आहे.

‘बॅन्जो’च्या भूमिकेसाठी तयारी कशी केलीस ?
- लहानपणी माझ्याकडे बॅन्जो होता. माझे काही मित्रही कार्यक्रमांमध्ये बॅन्जो वाजवायचे. रवी जाधवने मला बॅन्जो कसा वाजवतात, त्याचे काही व्हिडिओ दाखवले. दुसरे जसे बॅन्जो वाजवतात, तसा मी बॅन्जो न वाजवता उभा राहून ‘बॅन्जो’ वाजवतो असे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. यासाठी मला अधिक मेहनत घ्यावी लागली.

चित्रपटाची कथा आणि चित्रपटाचे आर्थिक गणित यामध्ये तुला काय महत्त्वाचे वाटते ?
- मला वाटतं की, तुमच्या चित्रपटाचा आशय चांगला असेल तर चित्रपट हिट होतो. मात्र केवळ आर्थिक फायदा डोक्यात ठेवून चित्रपट बनवलात तर तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकणार नाही.

तू महाराष्ट्रीयन आहेस, एखादी मराठमोळी भूमिका करताना तुला कसे वाटते ?
- ‘लय भारी’मध्ये मी जी व्यक्तिरेखा साकारली होती ती जरा वेगळी होती. आता ‘बॅन्जो’मध्ये करत असलेल्या भूमिकेला मुंबईच्या मराठी भाषेचा तडका आहे. मुंबईची मराठी वेगळी आहे. या चित्रपटातील माझे संवाद, माझी भाषा, बोलायची लकब वेगळी आहे, या सर्व गोष्टी मला रवीने शिकवल्या. त्यामुळे ही भूमिका साकारताना मला वेगळाच अनुभव आला.

बॉक्स आॅफिसवर चित्रपट कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहेत, त्याबद्दल तुला काय वाटते आहे ?
- बॉलिवूडमध्ये आपण पाहिले तर शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान यांचे चित्रपट 200-300 कोटींचा व्यवसाय करतात. व्यावसायिक चित्रपटाचा विचार करता, तुमच्या चित्रपटाचे बजेट 50 कोटी असेल आणि तुम्ही 100 कोटी कमाई केलीत तर तो चित्रपट आपण यशस्वी झाला, असे म्हणू शकतो. मात्र चित्रपटाचे बजेट 150 कोटी आणि कमाई 100 कोटी झाली तर चित्रपट फायद्यात गेला, असे म्हणता येणार नाही.

सध्या गाजत असलेले ‘थँक गॉड बाप्पा’ गाणे करतानाचा अनुभव कसा होता?
- ‘थँक गॉड बाप्पा’चा जन्म ‘बॅन्जो’च्या सेटवरच झाला. ‘बॅन्जो’चा संवाद लेखक कपिल सावंत यांने चार सहा ओळी लिहिल्या आणि मला सांगितले की, यावर काहीतरी करायचा माझा विचार आहे.त्याचे गाणे मला खूप आवडले मग मी गाणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला. आज ते गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे.

Web Title: 'Good intent, only if the story is successful'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.