‘सरकार’नामा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2017 01:19 AM2017-05-12T01:19:39+5:302017-05-12T01:19:39+5:30
वेगळी कथा अन् तेवढ्याच वेगळ्या पद्धतीची मांडणी यासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक रामगोपाल वर्मा हे ‘सरकार-३’ मधून पुन्हा एकदा दमदार कमबॅक करण्यास सज्ज आहेत.
वेगळी कथा अन् तेवढ्याच वेगळ्या पद्धतीची मांडणी यासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक रामगोपाल वर्मा हे ‘सरकार-३’ मधून पुन्हा एकदा दमदार कमबॅक करण्यास सज्ज आहेत. २००५ मध्ये आलेल्या ‘सरकार’ अन् २००८ मध्ये आलेल्या ‘सरकार राज’चा सिक्वल असलेल्या ‘सरकार-३’मध्ये प्रेक्षकांना पुन्हा एकदा राजकारणाचा सारीपाट अनुभवयास मिळणार आहे. आता ‘सरकार-३’मध्ये यापेक्षा काय वेगळे दाखविण्यात आले आहे, या प्रश्नांचा दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी उलगडा केला आहे. त्यांच्याशी केलेली ही खास बातचित...
प्रश्न : २००8मध्ये आलेल्या
‘सरकार-२’ नंतर ‘सरकार-३’ च्या निर्मितीसाठी तब्बल नऊ वर्षे लागले, याविषयी काय सांगाल?
सरकार सीरिजच्या ‘सरकार-२’नंतर ‘सरकार-३’ची निर्मिती करण्याचा मी विचार केला नव्हता; मात्र चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेले अमिताभ बच्चन आणि मला ‘सरकार-३’ विषयी सातत्याने विचारणा केली जात होती. जेव्हा मी याबाबत बिग बी यांच्याबरोबर चर्चा केली, तेव्हा त्यांनी ‘सरकार-३’वर काम करण्याविषयी सकारात्मकता दर्शविली. तिथूनच ‘सरकार-३’च्या निर्मितीची सुरुवात झाली. या चित्रपटाची कथा अतिशय आशयप्रधान असून, राजकारणाबरोबरच समाजकारणाची जाणीव करून देणारी आहे.
प्रश्न : ‘सरकार-३’मध्ये कोणत्या मुद्द्यांवर अधिक भर दिला गेला?
सध्या बॉलिवूडमध्ये भाई-भतीजावाद जोरदार सुरू असून, हा वाद संपविण्यासाठी मी ‘सरकार-३’मधून प्रयत्न केला आहे. लोक बाहेरच्यांपेक्षा तुलनेत नातेवाईकांची बाजू अधिक भक्कमपणे लावून धरत असतात. याच मुद्द्यांवर प्रकाश टाकण्याचा मी प्रयत्न केला आहे. चित्रपट अधिक दमदार असून, तो राजकीय किंवा गुंडागर्दी याच मुद्द्यांभोवती फिरत नाही. तर, यामधून कौटुंबिक संबंध, सामाजिकता याही विषयांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
प्रश्न : चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या व्यतिरिक्त मनोज वाजपेयी, जॅकी श्रॉफ यांच्याही भूमिका आहेत, त्या कितपत प्रभावी ठरतील, असे तुम्हाला वाटते?
चित्रपटाच्या कथेनुसार एखाद्या कलाकाराचे स्थान निश्चित होत असते. अमिताभ हे इंडस्ट्रीमधील एक महान कलाकार आहेत. जंजीर, त्रिशूल या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांना आठवतात. त्याचबरोबर ‘सरकार’ सीरिजमधील अमिताभ यांचे पात्रही प्रेक्षकांच्या मनात बसलेले आहे. त्याशिवाय जॅकी श्रॉफ आणि मनोज
वाजपेयी यांनीही त्यांच्या भूमिकांना योग्य न्याय
दिला आहे. एकूणच सर्वच पात्रांनी दमदार
अभिनय केल्याने सरकार प्रेक्षकांच्या पसंतीस
उतरेल यात शंका नाही.
प्रश्न : यामी गौतम हिला तुम्ही एका विशिष्ट इमेजमधून बाहेर आणू इच्छित होता, ती तुमच्या अपेक्षांना खरी उतरली आहे काय?
निश्चितच, यामी गुणी अभिनेत्री आहे. तिने तिच्या भूमिकेला योग्य न्याय दिला असे म्हणायला हरकत नाही. इमेजबद्दल बोलायचे झाल्यास कलाकार हा कुठलीही भूमिका साकारण्यास तत्पर असायला हवा. अमूक एकाच भूमिकेसाठी तुमची ओळख असावी, असे अलीकडच्या काळात म्हणता येणार नाही. ज्या भूमिकेची तुम्हाला आॅफर आली, ती भूमिका साकारण्यास तुम्ही सक्षम असायला हवे. अगदी अशाच सक्षमतेने यामीने तिची भूमिका साकारली आहे. प्रेक्षकांना तिचा हा नवा अवतार निश्चितच आवडेल.
प्रश्न : तुम्ही ‘अरेस्ट’ या चित्रपटावर सध्या काम करीत आहात, काय सांगाल?
होय, या चित्रपटात अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत असणार आहे. अभिषेक सरकारच्या तिसऱ्या भागात नाही, परंतु या चित्रपटात तो मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. सध्या या चित्रपटाच्या शूटिंग शेड्यूल्डवर काम सुरू आहे. मुंबईमधील काही लोकेशन्सवर चित्रपटाची शूटिंग केली जाणार आहे. चित्रपटाची कथा ही प्रेक्षकांच्या परिचयाची असून, योग्यवेळी त्याबाबतचा उलगडा केला जाणार आहे.
प्रश्न : ‘सरकार-३’ची कथा कायदेशीर पेचात सापडली होती, याच कारणाने रिलीजच्या मार्गात अडथळे येत होते का?
‘सरकार-३’ च्या रिलीजच्या मार्गात कुठल्याही प्रकारचे अडथळे नव्हते. मधल्या काळात कायदेशीर पेच निर्माण झाल्याने चित्रपटाच्या रिलीजची तारीख बदलण्यात आल्याची चर्चा होती, परंतु ही चर्चाच राहिली. ठरल्याप्रमाणे चित्रपट रिलीज होणार असून, त्यात कोणीही अडथळा निर्माण करू शकत नाही. कायदेशीर पेच याविषयी बोलायचे झाल्यास मला असे वाटते की, हे सर्व पहिल्यांदाच घडतेय असे अजिबात नाही.
(मुलाखत : सतीश डोंगरे)