मुलाच्या अपघातानंतर गोविंदाने तोडली चुप्पी, यशराज फिल्म्सचे नाव घेत सांगितले सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 12:11 PM2020-06-26T12:11:03+5:302020-06-26T12:29:58+5:30
माफी मागणा-यापेक्षा माफी देणारा मोठा असतो, असे का म्हणाला गोविंदा?
बॉलिवूड अभिनेता गोविंदा सध्या त्याचा मुलगा यशवर्धन अहुजामुळे चर्चेत आहे. 24 जूनला रात्री साडे आठच्या सुमारास यशवर्धनच्या गाडीला मुंबईत अपघात झाला होता. जुहू भागात यशवर्धनच्या कारला यशराज फिल्म्सच्या एका कारने मागून धडक दिली होती. या अपघातात यशवर्धन किरकोळ जखमी झाला होता. जखमी अवस्थेतील त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर सगळीकडे खळबळ माजली होती. आता या घटनेवर गोविंदाने प्रतिक्रिया दिली आहे.
ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत गोविंदा या घटनेवर बोलला. ‘हो, माझा मुलगा यशवर्धनच्या कारचा अपघात झाला होता. सुदैवाने यशला फार दुखापत झाली नाही़ तो ठीक आहे. पोलिसांचा फोन आल्यावर आम्ही घटनास्थळी पोहोचलो होतो. सिग्नल तोडल्यामुळे हा अपघात झाल्याचे आम्हाला सांगण्यात आले होते. यानंतर सर्वांचा जबाब नोंदवला गेला. आम्ही पोलिस ठाण्यात पोहोचल्यावर तेथे ऋषभ चोप्रा व अक्षय हे आधीच हजर होते.
हे दोघे यशराज फिल्म्सचे प्रॉडक्शन मॅनेजर होते. पोलिस ठाण्यात त्यांनी या घटनेसाठी माझी माफी मागितली. मी सुद्धा त्यांना माफ केले. कारण माफी देणारा माफी मागणा-यांपेक्षा मोठा असतो. घटनेनंतर यशराज फिल्म्सकडून गाडीला झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याचेही मान्य केले गेले. यानंतर हे प्रकरण संपले. ही गाडी यश चोप्रा यांची पत्नी पामेला चोप्रांची होती. खरे तर हे प्रकरण आम्ही सामंजस्याने मिटवले. पण या घटनेनंतर यशराज फिल्म्सकडून मला एक फोन अपेक्षित होता. पण त्यांच्याकडून एक साधा फोनही आला नाही. कदाचित पुढे कधीतरी यावर आम्ही बोलू, असे गोविंदाने सांगितले.