समाजाचे देणं परत करणाऱ्या अनुरागीना सलाम!
By संदीप आडनाईक | Published: January 21, 2021 09:31 PM2021-01-21T21:31:57+5:302021-01-21T21:32:34+5:30
investing life : क्लेरेन्स माँटेरो उर्फ डिसूजा अंकल, अब्दुल मजीद दाऊद लोखंडे आणि राघवेंद्र कमलाकर नांदे या तीन समाजसेवकांनी केलेल्या कामावर हा माहितीपट आहे.
पणजी : जग हे धोकादायक ठिकाणांनी भरलेले आहे, जे वाईट चिंतात, त्यांच्यामुळे नाही, तर जे केवळ बघतात आणि काहीही करत नाहीत. या अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे भाष्य दाखऊन इन्व्हेस्टिंग लाईफ हा ५२ मिनिटांचा माहितीपट गोव्यात सुरु असलेल्या ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन पॅनोरमाच्या नॉन फिचर विभागात दाखवण्यात आला.
दान हे सत्पात्री असावं असं म्हणतात, या हाताचे त्या हाताला कळू देता कामा नये. समाजात काही लोक असे असतात की ते आपले काम निरपेक्षपणे करत असतात. त्यांच्या काहीही अपेक्षा असत नाहीत. अशाच तीन अनुरागी व्यक्तींवर फिल्म डिव्हिजनने हा माहितीपट तयार केला आहे. मूळच्या अमरावतीच्या असलेल्या वैशाली केंदळे या मुंबईच्या दिग्दर्शकाचा हा पहिलाच प्रयत्न आहे.
क्लेरेन्स माँटेरो उर्फ डिसूजा अंकल, अब्दुल मजीद दाऊद लोखंडे आणि राघवेंद्र कमलाकर नांदे या तीन समाजसेवकांनी केलेल्या कामावर हा माहितीपट आहे. सामाजिक बहिष्कृत केलेल्या ३०० कुटुंबियांना मदत करणारे डिसुझा अंकल १९९० पासून महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात काम करतात. त्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी ते आता धडपडत आहेत. रायगड जिल्ह्यातील अब्दुल मजीद दाऊद लोखंडे हे १९९२ पासून मुंबई गोवा महामार्गावर अपघातग्रस्त झालेल्याना मदत करतात. आतापर्यंत त्यांनी ६००० पेक्षा जास्त लोकांचा जीव वाचविला आहे, तर २५०० लोकांचे पुनर्वसन केले आहे.
अमरावती येथील राघवेंद्र कमलाकर नांदे हे वृद्ध विविध वन्यजीवांचं रक्षण करतात. पृथ्वीवर सर्व जीवांना जगण्याचा समान हक्क आहे, असे सांगत त्यांनी आतापर्यंत ३५,००० वन्यजीवाना वाचवले आहे. ते १९९५ पासून हे काम करत आहेत. वैशाली केंदळे यांनी यासाठी दोन ते तीन वर्षे सर्वे केला आहे. वैशाली यांनी यापूर्वी फॅन्ड्री, ख्वाडा, भिडू या सिनेमात काम केले आहे. रोशन मारोडकर या कॅमेरामनने अफलातून फोटोग्राफी केली आहे तर ख्वाडा या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त सिनेमाचा साउंड रेकॉर्डिस्ट महावीर साबण्णावर या सांगलीच्या युवकाने दिलेलं संगीत लक्षवेधी आहे.