गायनामुळे जीवनाचा अर्थ उलगडला!
By Admin | Published: July 2, 2017 05:22 AM2017-07-02T05:22:10+5:302017-07-02T05:22:10+5:30
‘सुल्तान’ सिनेमातील ‘जग घुमियाँ’ या गाण्यामधून रसिकांची आवडती गायिका म्हणजे नेहा भसीन. सुरांच्या जादूमुळे बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध
- Suvarna Jain
‘सुल्तान’ सिनेमातील ‘जग घुमियाँ’ या गाण्यामधून रसिकांची आवडती गायिका म्हणजे नेहा भसीन. सुरांच्या जादूमुळे बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध आणि चर्चित गायिकांमध्ये तिचं गाव घेतलं जातं. आपल्या सुरांनी तिनं रसिकांना अक्षरक्ष: वेड लावले आहे. आता पुन्हा एकदा नेहा भसीनची चर्चा सुरू आहे. नुकतंच नेहाने आपले ‘चन माही’ हे गाणं रिलीज केले आहे. यूट्यूबवर रिलीज करण्यात आलेल्या या गाण्याला रसिकांची भरभरून पसंती मिळत आहे. या संदर्भात नेहाशी केलेली ही खास बातचित...
प्रश्न : तुला कोणत्या प्रकारची गाणी गायला आवडतात? गाण्यांचा स्वीकार करताना कोणत्या गोष्टींचा तू विचार करते?
- कोणत्याही सिनेमातील गाणं त्या सिनेमाचा जणू आत्मा असतो. गाण्यांमुळे सिनेमा रसिकांपर्यंत पोहोचतो. माझ्या सिनेमातील गाणीच त्या सिनेमाचं प्रमोशन करत असतात. मी एक गायक आहे. प्रत्येक प्रकारची गाणी गायला मला आवडतात. वेगवेगळ्या प्रकारची गाणी गाण्याची माझी इच्छा आहे. त्यामुळे मला येणाऱ्या गाण्याच्या आॅफर्स नाकारण्याचा प्रश्नच नाही. आॅफर्स आल्या की, मी त्या स्वीकारते. कारण गाणे गाणं माझं काम आहे. ज्या गाण्यांशी मी कनेक्ट होते ती गाणी गायला मला आवडतात.
प्रश्न: आज तू लोकप्रिय आहेस, रसिकांचं प्रेम तुला मिळतंय. मात्र तुलाही स्ट्रगल करावा लागला का ?
- स्ट्रगल हा प्रत्येकाला करावाच लागतो. माझ्या मते, प्रत्येकाचा आयुष्यभर स्ट्रगल सुरुच असतो. स्ट्रगल शेवटी जगण्याचा एक संघर्ष असतो. जगण्यासाठी दोन वेळचे खाणं मिळावं हेच खूप झालं. त्याबाबतीत मी स्वत:ला नशीबवान मानते की मला आयुष्यात किमान खाण्या-पिण्यासाठी जास्त स्ट्रगल करावा लागला नाही.
प्रश्न : असं बऱ्याचदा होत असेल की, जेव्हा तुला आत्मविश्वास गमावल्यासारखं वाटतं त्या वेळी स्वत:ला कशी उभारी देते ?
- एका मुलीसाठी या चित्रपटसृष्टीत टिकून राहणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही. मात्र, मला माझा स्वत:वर खूप विश्वास आहे. हाच विश्वास मला आयुष्यात पुढे जाण्यासाठी कायम मदत करतो. कधीही मला आत्मविश्वास ग्गमवाल्यासारखं वाटतं. त्या वेळी मी मन:शांती, ध्यान करते आणि लिखाणही करते. त्यामुळे मला लिहायलाही खूप आवडतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या समाजात असे काही लोक आहेत, की त्यांच्याकडे पाहून आपसुकच प्रेरणा मिळते. काही दिवसांपूर्वी अॅसिड हल्लापीडित तरुणीचं लग्न झालं. अशांना पाहिल्यानंतर जगण्याची नवी उमेद आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.
प्रश्न : टॅलेंट आणि आवड या गोष्टी जीवनात यशस्वी होण्यासाठी कितपत गरजेच्या असतात ?
- जीवनात कुणालाही कोणतीच गोष्ट सहज आणि सोप्या पद्धतीने मिळत नाहीत. कुणालाही जे यश मिळतं त्यामागे मोठी मेहनत असते. कारण एखाद्याकडे टॅलेंट असण्यासोबत त्या गोष्टीविषयीची आवड असणेही गरजेचे आहे. मी सुद्धा रिअॅलिटी शोमधून पुढे आली आहे. त्यामुळे मला या गोष्टींची जाण आहे.