‘अतिथी’ रसिकांच्या भेटीला
By Admin | Published: July 13, 2016 01:33 AM2016-07-13T01:33:19+5:302016-07-13T01:33:19+5:30
गेला माधव कुणीकडे, दिनूच्या सासूबाई राधाबाई यासारख्या नाटकातील आपल्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेला विनय येडेकर अतिथी देवो भव: या नाटकाद्वारे अनेक वर्षांनी रंगभूमीवर परतणार आहेत
गेला माधव कुणीकडे, दिनूच्या सासूबाई राधाबाई यासारख्या नाटकातील आपल्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेला विनय येडेकर अतिथी देवो भव: या नाटकाद्वारे अनेक वर्षांनी रंगभूमीवर परतणार आहेत. त्याच्या या नाटकाबद्दल सीएनएक्ससोबत त्याने मारलेल्या गप्पा...
अतिथी देवो भव: या नाटकात तू कोणत्या भूमिकेत रसिकांच्या भेटीस येणार आहेस?
4अतिथी देवो भव: या नाटकातील माझी भूमिका खूपच वेगळी आहे. या नाटकात माझी व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासोबतच एक संदेशही देणार आहे. अतिथी देवो भव: हे नाटक नर्मविनोदी आहे. यातील प्रत्येक व्यक्तिरेखा या प्रेक्षकांच्या मनाला भिडणार आहेत, यात काही शंकाच नाही. एक पाहुणा अचानकपणे घरात येतो आणि त्यानंतर काय गंमत होते हे रसिकांना या नाटकात पाहायला मिळणार आहे. हे नाटक पाहाताना ही आपल्याच घरातील गोष्ट आहे, असे आपल्याला वाटेल. त्यामुळे हे नाटक सगळ्याच वयोगटातील लोकांना आवडणार आहे.
या नाटकाद्वारे तू अनेक वर्षांनंतर रंगभूमीवर पुन्हा परतत आहेस. दरम्यानच्या काळात नाटकात काम न करण्याचे काही कारण होते का?
4मला अनेक नाटकांच्या आॅफर्स येत होत्या, पण मला कोणत्याच नाटकाची संहिता आवडत नव्हती. त्यामुळे मी नाटकात काम करत नव्हतो. अतिथी देवो भव: हे नाटक पहिल्याच वाचनात मला प्रचंड आवडले आणि त्यात विजय केंकरे या नाटकाचे दिग्दर्शन करत होते. त्यामुळे लगेचच मी या नाटकासाठी होकार दिला. नाटक, सिनेमा, मालिका हे तिन्ही माध्यम हे खऱ्या अर्थाने लेखकांचे माध्यम आहे. त्यामुळे कथा चांगली असल्याशिवाय काम करण्यात काहीच अर्थ नाही, असे माझे मत आहे.
कभी इधर कभी उधर, आर.के.लक्ष्मण की दुनिया यांसारख्या खूप चांगल्या मालिकांमध्ये झळकल्यानंतरही तू मालिकांपासून दूर असतोस, असे का?
4मी सुरुवातीला स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये नोकरी करत असताना अभिनय करत होतो. त्यामुळे माझ्याकडे खूपच कमी वेळ असे. मी त्या वेळात खूपच चोखंदळपणे भूमिका निवडत असे. एखादी भूमिका खूपच चांगली वाटली, तरच करायची असे मी ठरवले होते. त्यामुळे मी कभी इधर कभी उधर या मालिकेनंतर छोट्या पडद्यावर झळकलो नाही. मी अनेक वर्षांनंतर आर. के. लक्ष्मण की दुनिया या मालिकेत काम केले होते. त्या वेळी माझा संपूर्ण दिवस हा चित्रीकरणातच जात असे. मालिकांसाठी इतका वेळ देऊनही चांगले काम केल्याचे समाधान मला वाटायचे नाही. त्यामुळे मी मालिकांपासून दूरच राहाण्याचा विचार केला.
4हॉलीवूड, बॉलीवूड, टीव्ही अन् मराठी चित्रसृष्टीच्या रंजक बातम्या व गॉसिप वाचण्यासाठी लॉगइन करा
मालिका म्हणजे
पाठांतराची परीक्षा
राजन भिसे यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. रंगभूमीवरील त्यांच्या अनेक भूमिका प्रचंड गाजल्या आहेत. ते अतिथी देवो भव: या नाटकातही प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. चित्रपटात, रंगभूमीवर साकारत असलेल्या भूमिकेचा प्रभाव अनेक वर्षे राहतो. नाटकातील, चित्रपटातील काही प्रसंग अनेक वर्षांनंतरही तुमच्या स्मरणात ताजे राहतात, पण मालिकांच्या बाबतीत तसे होत नाही. मालिकेत काम करत असताना दिवसभरात अनेक दृश्य चित्रित करावी लागतात. या सगळ्यामुळे मालिका म्हणजे पाठांतराची परीक्षाच आहे, असे मला वाटते, असे राजन भिसे सांगतात.
गंभीर नाटकांना अधिक पसंती
छोट्या पडद्यावर सध्या अनेक स्टँडअप कॉमेडीचे कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळत आहेत. या कार्यक्रमांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. याचा परिणाम काहीसा रंगभूमीवर झालेला आहे, असे आपल्याला पाहायला मिळत आहे. रसिक गंभीर नाटकांना भरभरून प्रतिसाद देत असले, तरी ते विनोदी नाटकांकडे पाठ फिरवत आहेत, असे अलीकडच्या नाटकाच्या कलेक्शनवरून दिसतेय. आमचे अतिथी देवो भव: हे नाटक कॉमेडी असले, तरी एक अतिशय चांगला विषय यात हाताळला गेला आहे. त्यामुळे हे नाटक प्रेक्षकांना आवडेल, अशी मला खात्री आहे.