'गुलाबी साडी' फेम गायक संजू राठोडने रचला इतिहास; अॅलन वॉकरच्या कॉन्सर्टसाठी ओपनिंग करण्याचा मिळाला मान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 06:15 PM2024-11-11T18:15:35+5:302024-11-11T18:16:37+5:30
Sanju Rathod : संजू राठोड आंतरराष्ट्रीय कलाकारासमवेत शो सुरू करणारा पहिला मराठी कलाकार ठरला असून, या खास क्षणामुळे मराठी संगीत क्षेत्रामध्ये एक नवा अध्याय लिहिला जाणार आहे.
गेल्या काही वर्षांत मराठी संगीत क्षेत्राने जागतिक स्तरावर मोठी ओळख मिळवली आहे, ज्यात अनेक प्रतिभावान कलाकारांचा मोठा वाटा आहे. असाच एक टॅलेंटेड गायक संजू राठोड (Sanju Rathod). संजूच्या ‘गुलाबी साडी’ आणि ‘नऊवारी’ गाण्यांना लाखो लोकांचा प्रतिसाद मिळाल्यामुळे मराठी संगीतक्षेत्रात त्याने एक विशिष्ट असं स्थान निर्माण केलं आहे. संजू राठोड आंतरराष्ट्रीय कलाकारासमवेत शो सुरू करणारा पहिला मराठी कलाकार ठरला असून, या खास क्षणामुळे मराठी संगीत क्षेत्रामध्ये एक नवा अध्याय लिहिला जाणार आहे.
म्युझिक कॉन्सर्टमध्ये, संजूने आपल्या सुपरहिट 'गुलाबी साडी' गाण्याने प्रेक्षकांना भारावून सोडलं. 'गुलाबी साडी' गाणं ५० मिलिअनपेक्षा अधिक वेळा Spotify वर सर्वाधिक ऐकलं गेलेलं मराठी गाणं आहे. त्यानंतर त्याचं नुकतंच रिलीज झालेलं 'काळी बिंदी' गाणं देखील सादर केलं, जे सध्या सर्व प्लॅटफॉर्म्सवर ट्रेंड होत असून युट्युबच्या इंडिया टॉप म्युझिक व्हिडिओ चार्टवर दिसत आहे. त्याच्या जोशपूर्ण परफॉर्मन्सने संपूर्ण प्रेक्षकांना उत्साहाने भारावून सोडलं. पारंपरिक महाराष्ट्रीय संगीताची खासियत आणि त्यात आधुनिक शैलीने गाणं तयार करण्याच्या त्याच्या या अनोख्या कौशल्यामुळे आतंरराष्ट्रीय डीजे स्टेजवर त्याची झालेली निवड ही योग्य होती.
अॅलन वॉकरच्या ग्लोबल इलेक्ट्रॉनिक साऊंडसोबत आपल्या महाराष्ट्राची समृद्ध संगीत कला सादर करण्यात आल्यामुळे इतर प्रादेशिक कलाकारांना नक्कीच एक नवी उमेद मिळाली असणार, हे नक्की. या संधीविषयी व्यक्त होताना संजू राठोड म्हणाला की, “अॅलन वॉकरसारख्या ग्लोबल आयकॉनसमोर परफॉर्म करण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती आणि मराठी संगीताला आंतरराष्ट्रीय मंचावर सादर करण्याची ही एक मोठी संधी होती.” चाहत्यांनी देखील कॉन्सर्टविषयी उत्साह व्यक्त केला आणि मनापासून आनंद घेतला.