गुलशन ग्रोवर यांचं करिअर 'या' अभिनेत्याला करायचं होतं उद्ध्वस्त?, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 01:12 PM2023-02-19T13:12:47+5:302023-02-19T13:13:46+5:30
'बॅडमॅन' या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते गुलशन ग्रोवर हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक मोठं नाव आहे.
'बॅडमॅन' या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते गुलशन ग्रोवर हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक मोठं नाव आहे. त्यांनी ८० च्या दशकात आपल्या करिअरला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात त्यांना छोट्या-छोट्या भूमिका मिळाल्या, पण कालांतराने चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्यात दडलेली उत्तम खलनायकाची जाणीव झाली. गुलशन यांनी जेव्हा पहिल्यांदा पडद्यावर खलनायकाची भूमिका साकारली तेव्हा सगळे पाहतच राहिले. त्या काळात प्रेम चोप्रा, आशुतोष राणा आणि रझा मुराद यांसारखे दिग्गज कलाकार पडद्यावर खलनायकाच्या भूमिकेत दिसत. असं असतानाही गुलशन ग्रोवर यांचा परफॉर्मन्स पाहून सर्व थक्क झाले होते.
नुकताच गुलशन ग्रोवर मनीष पॉलच्या पॉडकास्ट शोमध्ये दिसले. या शोमध्ये त्यांनी अनेक मोठे खुलासे केले आहेत. "आम्ही ऐकलं आहे की एकेकाळी तुम्हाला मुख्य नायकाच्या चित्रपटाची ऑफर आली होती, परंतु तुमच्यासमोर एक अट ठेवण्यात आली होती. चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत तुम्ही दुसरा चित्रपट करणार नाही. हा चित्रपट सुमारे दीड वर्ष शूट होत राहिला. पण शेवटी तो काही प्रदर्शित झालाच नाही. हे सर्व तुमचं करिअर उद्ध्वस्त करण्यासाठी केलं गेलं होतं हे खरंय का?", असं प्रश्न मनिष पॉलनं गुलशन यांना विचारला.
याशिवाय मनिषनेनं असंही सांगितलं की मला त्या अभिनेत्याचं नाव देखील माहित आहे ज्यानं त्या निर्मात्याला असं करण्यासाठी पैसे दिले होते. मनीषचं म्हणणं ऐकून गुलशन म्हणाले की यात अर्धी गोष्ट खरी आहे तर अर्धी खोटी आहे. ते पुढे म्हणाले, “माझे शत्रू एक नव्हे अनेक होते, ज्यांनी दान टाकतात तसे पैसे टाकले होते. त्याने त्या निर्मात्याला पैसे दिले होते. पण ते एक गोष्ट विसरले ते म्हणजे त्याआधी मी अनेक चित्रपट नाकारले होते ज्यात मला नायक ऑफर झाले होते"
गुलशन ग्रोवर यांनी यावेळी अशा अनेक चित्रपटांच्या नावांची यादी देखील वाचून दाखवली. जे त्यांनी नाकारले होते. रेखासारखे मोठे कलाकारही त्या चित्रपटांमध्ये होते. पण त्याला खलनायकाची भूमिका आवडल्याने त्यांना नायकाची भूमिका करायची नव्हती. गुलशन ग्रोवर यांनी असंही नमूद केलं की ते नाकारल्यामुळे नव्हे तर स्वतःच्या इच्छेने खलनायक बनले.