Happy Birthday Lata Mangeshkar: या कारणामुळे लता मंगेशकर राहिल्या अविवाहित, एखाद्या चित्रपटाप्रमाणे आहे त्यांची प्रेमकथा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 02:44 PM2019-09-28T14:44:21+5:302019-09-28T14:46:13+5:30
पहिलं प्रेम काही केल्या विसरता येत नाही, असे म्हणतात आणि याच कारणामुळे लता मंगेशकर यांनी लग्न केलं नाही.
गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा आज म्हणजचे 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लता मंगेशकर यांनी आयुष्यभर लग्न न करण्यामागे एक खास कारण आहे. त्यांच्या प्रेम कहाणीबाबत खूपच कमी जणांना माहिती आहे. त्यांची हीच प्रेमकथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
पहिलं प्रेम काही केल्या विसरता येत नाही, असे म्हणतात आणि याच कारणामुळे लता मंगेशकर यांनी लग्न केलं नाही. लता मंगेशकर यांचे डुंगरपूर राजघराण्याचे महाराजा राज सिंह यांच्यावर प्रचंड प्रेम होते, असे म्हटले जाते. राज सिंह हे लता मंगेशकर यांच्या भावाचे खूप जवळचे मित्र होते. लता मंगेशकर यांनी आयुष्यात बरेच चढउतार पाहिले. आपल्या भाऊ-बहिणींना कधीही पालकांची कमतरता जाणवू दिली नाही लता मंगेशकर या अतिशय लहान असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. सगळ्या भावंडांमध्ये त्या मोठ्या असल्याने घरची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यामुळे त्यांनी अतिशय कमी वयात चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीला कोरसमध्ये गाणे गायले. तसेच काही चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय देखील केला. लता मंगेशकर यांना परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नसले तरी त्यांनी त्यांच्या भावंडांना शिक्षण दिले. त्यांनी घरची जबाबदारी खूपच चांगल्याप्रकारे पेलली. त्यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती, यामुळे त्यांनी कधीही लग्न केले नाही, असे म्हटले जाते. पण खरं कारण वेगळे होते, असे देखील काहीजण म्हणतात.
अमरउजालाने दिलेल्या एका वृत्तानुसार, डुंगरपूर राजघराण्याचे महाराजा राज सिंह आणि हृदयनाथ मंगेशकर खूप चांगले मित्र होते. ते एकत्र क्रिकेट खेळायचे. जेव्हा राज सिंह शिक्षणासाठी मुंबईत आले, त्यावेळी त्यांची आणि हृदयनाथ यांची ओळख झाली होती. राज सिंह यांचे घरी येणे-जाणेदेखील वाढले. त्यामुळे लता मंगेशकर यांच्यासोबत देखील त्यांची मैत्री झाली. हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. या मैत्रीची त्याकाळात मीडियामध्येही चांगलीच चर्चा रंगली होती. या दोघांनाही लग्न करायचं होते, मात्र ही गोष्ट सत्यात उतरू शकली नाही. असे म्हटले जाते की, सर्वसामान्य घराण्यातील मुलीशी लग्न करणार नाही, असे वचन राज यांनी आपल्या आई-वडिलांना दिले होते आणि त्याचमुळे आयुष्याच्या शेवटपर्यंत राज यांनी हे वचन पाळलं आणि ते देखील आयुष्यभर अविवाहित राहिले. लता मंगेशकर यांच्यापेक्षा राज 6 वर्षांनी मोठे होते. त्यांना क्रिकेटची प्रचंड आवड होती. क्रिकेटच्या प्रेमामुळे ते कित्येक वर्षे बीसीसीआयशी जोडले गेले होते.
लता मंगेशकर यांचे क्रिकेट प्रेम तर सर्वांनाच माहिती आहे. राज आणि लता यांना एकत्र आणण्यात क्रिकेटचंही मोठं योगदान आहे. राज लता मंगेशकर यांना प्रेमाने मिठ्ठू अशी हाक मारायचे. त्यांच्या खिशामध्ये एक टेप रेकॉर्डर नेहमीच असायचा, त्या मध्ये लता मंगेशकर यांच्या निवडक गाण्यांचा समावेश होता. राज सिंह यांचे निधन 12 सप्टेंबर 2009 ला झाले. दोघांचे एकमेकांवर प्रचंड प्रेम होते, मात्र ही कहाणी अधुरीच राहिली.