‘दिग्दर्शन करणे कठीण काम’
By Admin | Published: February 12, 2017 04:17 AM2017-02-12T04:17:22+5:302017-02-12T04:17:22+5:30
अभिनेता स्वप्निल जोशी याने विविध चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. ‘दुनियादारी, तू ही रे, मितवा’ असे अनेक सुपरहिट चित्रपट त्याने मराठी चित्रपटसृष्टीला दिले
- Benzeer Jamadar
अभिनेता स्वप्निल जोशी याने विविध चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. ‘दुनियादारी, तू ही रे, मितवा’ असे अनेक सुपरहिट चित्रपट त्याने मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. नुकताच त्याचा ‘फुगे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. याच चित्रपटाविषयी स्वप्निलने लोकमत सीएनएक्सशी साधलेला संवाद...
- या चित्रपटातील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील?
या चित्रपटात माझी आदित्य नावाची व्यक्तिरेखा आहे. तो भित्रा, बावळट, थोडासा घाबरट असतो. त्याचा एक जिवलग मित्र हृषीकेश आहे. या मित्रावर तो जिवापेक्षाही जास्त प्रेम करणारा दाखविण्यात आला आहे. अशा आमच्या घनिष्ठ मैत्रीवर आधारित फुगे हा चित्रपट आहे. या चित्रपटात हृषीकेशची भूमिका अभिनेता सुबोध भावे साकारत आहे. त्यामुळे स्वप्निल आणि सुबोध यांची आॅनस्क्रीन केमिस्ट्री पहिल्यांदा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
- या चित्रपटाच्या माध्यमातून तू पहिल्यांदा लेखन केले आहे; तर तुझा अनुभव कसा होता?
माझ्यासाठी अनुभव खूपच अप्रतिम होता. याची मूळ संकल्पना अशी होती, की मला आणि सुबोधला एकमेकांसोबत काम करण्याची तीव्र इच्छा होती. एकमेकांसोबत काम करायचे म्हटल्यावर लिहिणार कोण, कास्ट होणार कधी, हा विचार करता, आम्हीच लिहिण्याचा निर्णय घेतला. आम्ही दोघेही काही हाडाचे लेखक नाही; मात्र आमच्यामधील अभिनेत्याने एकत्रित येण्याच्या या तीव्र इच्छेतून झालेली ही गोष्ट आहे.
- स्वप्निल जोशी म्हटले, की चित्रपट हिट हे समीकरण ठरले आहे, याविषयी काय सांगशील?
मला असं वाटतं, की आपला अभिनय प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी कठोर मेहनत करणे, त्याचबरोबर आपल्या भूमिकेला शंभर टक्के न्याय देण्याचा प्रयत्न करणे, प्रेक्षकांची मने जिंकणे हाच प्रत्येक कलाकाराचा प्रयत्न असतो. बाकी सर्व गोष्टी म्हणजे चित्रपट हिट होणे न होणे, हे मायबाप रसिकांच्या प्रतिसादावर अवलंबून असते. पण, माला रसिक मायबापांचे प्रेम, कौतुक, चांगला प्रतिसाद मला नेहमीच मिळत असतो, हे माझं भाग्य आहे.
- मराठी चित्रपटसृष्टीत सुबोध आणि तू दोघेही तगडे कलाकार आहात; त्यामुळे काम करण्याचा अनुभव कसा होता? सुबोधसोबत काम करताना खूप मजा आली. मला वाटतं, तो आजच्या फळीतील अत्यंत गुणी अभिनेता आहे. आम्ही दोघेही एकमेकांच्या कामाची नेहमीच प्रशंसा करतो. त्यामुळे एकमेकांचे चाहते झालो आहोत. या चित्रपटाच्या निमित्ताने दोघे एकत्र आलो. या कामाच्या व्यापातून आमच्यातील अभिनेते बाजूला पडून आम्ही दोघे एकमेकांचे चांगले मित्र कधी झालो, हेच कळाले नाही. त्यामुळे मला आयुष्यभरासाठी सुबोध हा मिळालेला एक चांगला मित्र आहे.
- अभिनेता, कथालेखकानंतर आता भविष्यात दिग्दर्शन करण्याचा विचार केला आहे का?
मला असं वाटतं, की दिग्दर्शन ही खूप मोठी जबाबदारी आहे. दिग्दर्शन करण्यास संयम, दृष्टी अशा खूप साऱ्या गोष्टी लागतात. त्याला वेळदेखील खूप द्यावा लागतो. ज्या वेळी या सर्व गोष्टी मी करीन, त्याच वेळी दिग्दर्शन करण्यास तयार होईन. आता त्याची गरज नाही. हल्ली लोकांना असे वाटते, की दिग्दर्शन करणे खूप सोपी गोष्ट आहे; मात्र तसे नाही. दिग्दर्शन करणे ही फार कठीण गोष्ट आहे.
दिग्दर्शक इज ‘कॅप्टन आॅफ शिप’.